बंडखोरीमुळे राळेगाव कृऊबासची निवडणूक होणार रंगतदार

    दिनांक :25-Apr-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
राळेगाव, 
कृषी उत्पन्न बाजार (Ralegaon election) समितीच्या 30 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षासोबत एकही पक्ष नाही. त्यातच काँग्रेस पक्षाने आपल्याच मर्जीतील खास लोकांना उमेदवारी दिल्याने वर्षानुवर्षे काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ राहून काम करणार्‍या कार्यकर्त्यांना या निवडणुकीत डावल्याने काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे राळेगाव बाजार समितीची निवडणूक रंगतदार होणार आहे.
 
Ralegaon election
 
सहकार क्षेत्र वर्षानुवर्षे काँग्रेस पक्षाच्याच हाती आहे. त्यातही तालुक्यातील शेतकर्‍यांचा पाहिजे तसा विकास झाला नाही. मात्र या सहकार क्षेत्रात वावरणार्‍या संचालकांचा चांगलाच विकास झाल्याचे (Ralegaon election) नागरिकांकडून ऐकायला मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसचे अ‍ॅड. प्रफुल मानकर यांची गेल्या अनेक वर्षापासून चांगलीच पकड आहे. ही पकड मानकरांच्याच हातात कायम राहणार असा त्यांच्या जवळील कार्यकर्त्यांना विश्वास आहे. मात्र ही पकड तोडण्यासाठी अनेक दिग्गज यावेळच्या निवडणुकीत आपआपले पॅनल घेऊन मैदानात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक मानकरांसाठी अत्यंत कठीण असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.
 
 
जवळच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिल्याने अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसून येत आहे. (Ralegaon election) पक्षासोबत एकनिष्ठ राहून काम आम्ही करायचे, आंदोलने आम्ही करायची आणि निवडणूक आली की आम्हाला डावलून जवळच्यांना उमेदवारी द्यायची असे काही काँग्रेस कार्यकर्ते बोलू लागले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या गटात नाराजीचा सूर दिसून येत आहे. बंडखोरांनी नव्याने निर्माण झालेल्या पॅनलमध्ये आपली उमेदवारी दाखल केली व काँग्रेस उमेदवारापुढेच आव्हान उभे केले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांची प्रचारांमध्ये दमछाक होत असून यावेळी काँग्रेसला किती धक्का बसतो याकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.