एक लाख मराठा उद्योजक तयार करण्याचे लक्ष्य

26 Apr 2023 21:49:22
मुंबई,
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने राज्य सरकारच्या सहकार्याने 1 लाख मराठा उद्योजक तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष (Narendra Patil) आणि भारतीय जनता पार्टीचे नेते नरेंद्र पाटील यांनी पत्रपरिषदेत दिली. ते म्हणाले, महामंडळाच्या 556 लाभार्थ्यांना कर्ज आधी मिळाले, मात्र प्रमाणपत्र नंतर मिळाले. या लाभार्थ्यांना व्याज परतावा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. आघाडी सरकारने बंद केलेली ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज देण्याची योजना सुरू करण्याचा निर्णयही महामंडळाने घेतला आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत असलेली 10 लाखांची मर्यादा 15 लाखांपर्यंत वाढवून कालावधी परतफेड 7 वर्षांपर्यंत करण्यात आला आहे.
 
Narendra Patil
 
छोटे-मोठे व्यवसाय सुरू करू इच्छिणार्‍या मराठा समाजातील तरुणांना बळ देण्यासाठी लघु कर्ज योजनेची सुरुवात करण्यात येणार असून, त्या अंतर्गत 2 लाखांपर्यंत कर्ज देण्यात येईल. या कर्जावरील व्याज परतावा महामंडळ देईल. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज योजना सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित होणार आहे, असेही ते म्हणाले.
शिंदे-फडणवीस सरकार मराठा समाजाची आर्थिक प्रगती साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहे. महामंडळ कर्ज योजनांची व्याप्ती वाढवण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या उपस्थितीत सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या संबंधित अधिकार्‍यांसोबत आपण बैठक घेणार असल्याचेही पाटील (Narendra Patil) यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0