तभा वृत्तसेवा
पुसद,
पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काका-पुतण्याच्या लढाईत आजतागायत एकसत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर नाईक यांच्या शेतकरी सहकारी पॅनेलने आपले वर्चस्व कायम ठेवले. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही (Manohar Naik) मनोहर नाईक यांचे पुतणे भाजपा आमदार निलय नाईक यांचे पॅनेल पराभूत झाले. निलय नाईकांच्या चारपाच उमेदवारांचा कमी मतांनी पराभव झाला, हे उल्लेखनीय.
पुसद बाजार समिती निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. पुसद हा नाईक Manohar Naik यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे दोन्ही नाईकांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. राकाँ ज्येष्ठ नेते व माजी मंत्री मनोहर नाईक यांच्या नेतृत्वात आमदार इंद्रनील नाईक व ययाती नाईक यांनी जोरकस प्रयत्न केले. आ. निलय नाईक यांच्या नेतृत्वातील पॅनेलने राकाँची सत्ता उलथवून टाकण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र मतदारांनी मनोहर नाईक यांच्या बाजूने कौल दिला.
मनोहर नाईक Manohar Naik शेतकरी सहकार पॅनलचे सहकारी संस्था मतदारसंघातून यशवंत चौधरी, दत्तराव पाटील, अमोल फुके, रतिराव राऊत, अभय राठोड, मेरसिंग राठोड आणि शेख कौसर शेख अख्तर हे सातही उमेदवार विजयी झाले. इतर मागासवर्गीय गटातून रवींद्र निकम, विजा, भज मतदारसंघातून अभिजित पवार, महिला राखीवमधून छाया प्रशांत देशमुख आणि जयश्री जांबुवंत राठोड विजयी झाले.
ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून दिनेश राठोड, विनोद सरगर, अजा अज मतदारसंघातून उत्तम ढोले व आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघातून मनोहर राठोड विजयी झाले. व्यापारी मतदारसंघांमध्ये विजय भांगडे, संतोष कराळे, हमाल तोलारी मतदारसंघातून अजय उतळे निवडून आले आहेत. मनोहर नाईक पॅनेलचे सर्वच्या सर्व 18 उमेदवार निवडून आल्याने राकाँ गोटात आनंद, तर त्यांचे सहकारी पक्ष काँग्रेस व उबाठा शिवसेना यांच्या पोटात गोळा उठला आहे.