तभा वृत्तसेवा
भंडारा,
Panchmukhi Hanuman Temple : जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या काठावर मौदी भातहांडी येथे प्राचीन पंचमुखी हनुमान मंदिर आहे. गोसीखुर्द धरणाच्या वाढलेल्या रस्त्यामुळे सध्या मंदिराच्या चारही बाजूला पाणी आहे. तरीही या मंदिरात नित्याने पूजा अर्चना होत असते. 6 एप्रिल रोजी हनुमान जयंती असल्यामुळे मंदिराचे पुजारी तयारी करण्यासाठी जात असताना त्यांना अडयाळ पोलिसांनी अडवून मंदिरात जाण्यापासून मज्जाव केला व पोलिस गाडीत बसवून पहेला येथे सोडून दिले. या प्रकाराने भाविकांमध्ये असंतोष असून आम्हाला मंदिरात जाऊ द्यावे अन्यथा प्रशासनाने पूजा अर्चनाची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. ऐन हनुमान जयंतीच्या तोंडावर झालेल्या या प्रकारामुळे श्रद्धांजलीच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

गोसेखुर्द धरणामुळे मौदी गावाचे पुनर्वसन झाले. या ठिकाणी जागृत असे (Panchmukhi Hanuman Temple) हनुमंताचे मंदिर कित्येक वर्षांपासून आहे. गावाचे पुनर्वसन झाले असले तरी लोक नियमित या ठिकाणी दर्शनाला जात. हनुमान जयंतीचा मोठा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. मंदिराच्या चारही बाजूला पाणी असले तरी तीन वर्षांपुर्वी या ठिकाणी भागवत सप्ताह घेण्यात आला. नावेच्या मदतीने भाविक मंदिरापर्यंत पोहोचतात. आज वाढलेल्या जलस्तरामुळे भाविकांची वर्दळ कमी झाली असली तरी पूजेत कुठेही खंड पडला नाही. मंदिरालगत पुलाचे बांधकाम सुरु आहे. परंतु मंदिरात जाण्यासाठी रस्ता बनविण्यात आला नाही याची खंतही भाविकांमध्ये आहे.
दरम्यान हनुमान जयंती असल्याने उत्सवाची तयारी करण्यासाठी मंदिराचे पुजारी मधुकर सोनटक्के आज 4 रोजी नावेनी मंदिरात जात होते. यावेळी नावेतून पुजाèयाला उचलून पोलिसांनी पहेला येथे सोडून देत मंदिरात जाण्यापासून थांबविले. या प्रकारामुळे काहीसा संताप व्यक्त केला जात आहे. याच ठिकाणाहून गैरमार्गाने मासेमारीसाठी लोकांना सोडले जाते, मग मंदिरात जाण्यापासून का अडविण्यात येते? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. प्रशासन मंदिरात जाऊ देणार नसेल तर मंदिरातील उत्सवाची पूर्ण जबाबदारी प्रशासनाने घेऊन तो साजरा होईल याची व्यवस्था करावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, पुजा ठवकर, प्रविण उदापुरे, बालु ठवकर, स्वप्नील आरीकर यांनी केली आहे.