व्हीसीएच्या आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धा

    दिनांक :11-May-2023
Total Views |
- केदार जगतापचे द्विशतक

पुसद,
व्हीसीएच्या जिल्हा अंतर्गत क्रिकेट स्पर्धेत यवतमाळ संघाचा तसेच पुसद येथील सलामीचा फलंदाज Kedar Jagtap केदार कैलास जगताप याने खैरागड चषक आंतरजिल्हा कि‘केट स्पर्धेत बुधवारला वाशीमविरुद्ध झालेल्या प्रथमश्रेणी साखळी सामन्यात द्विशतक झळकावले. वाशीम जिल्ह्यातील मंगरुळनाथ येथे सुरू असलेल्या दोन दिवसीय साखळी सामन्यात वाशीम संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. वाशिमचा संघ केवळ 152 धावाच करू शकला. यवतमाळ संघाच्या संजयसिंह पवारने पाच खेळाडूंना बाद केले. यवतमाळ संघाचा सलामीचा फलंदाज केदार जगताप व हर्षित राऊत यांनी पहिल्या विकेटसाठी 212 धावांची भागीदारी केली.
kidar
यात राऊतच्या 88 धावांचा समावेश आहे. सामन्याच्या दुसर्‍या दिवशी केदार जगतापने 31 चौकार व एका षटकारासह 172 चेंडूत 202 धावा काढून द्विशतक पूर्ण केले. सामनावीर ठरलेला Kedar Jagtap केदार जगताप हा पुसदचा असून पत्रकार कैलास जगताप यांचा मुलगा आहे. अंडर 19 खेळलेल्या केदारची बहीण कस्तुरी जगताप हीदेखील व्हीसीए नागपूरच्या अ‍ॅकेडमीत अंडर 19 वयोगटात कि‘केट प्रशिक्षण घेत आहे. केदारला व्हीसीएचे जिल्हा संयोजक बाळू नवघरे व पुसद येथील आशिष शुक्ला यांचे मार्गदर्शन लाभले. या द्विशतकीय खेळीबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यवतमाळ संघाने हा सामना एक डाव राखून 84 धावांनी जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
दुसर्‍या दिवशीही शतक..!
जिल्हा अंतर्गत खेळल्या जाणार्‍या एक दिवसीय स्व. विजय तेलंग ट्रॉफीमध्येेही गुरुवारला केदार जगतापने 74 चेंडूत 16 चौकार व 4 षटकारांसह 110 धावा काढून शतक झळकावले. याही सामन्यात तो सामनावीर ठरला.