- एनआयएचे ऑपरेशन
- देशभरात 324 ठिकाणांवर छापेमारी
नवी दिल्ली,
राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयएने 'operation-dhvast' ‘ऑपरेशन ध्वस्त’अंतर्गत बुधवारी पंजाब व हरयाणा पोलिसांसोबत नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील साटेलोटे असलेल्या अतिरेकी, गुंड आणि मादकपदार्थ तस्करांचा तब्बल 324 ठिकाणांवर छापेमारी करीत, त्यांचे कंबरडे मोडले. पंजाब, दिल्ली, हरयाणा, उत्तरप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, चंदीगढ आणि महाराष्ट्रात दिवसभर झालेल्या छापेमारीत शस्त्रास्त्रे, दारुगोळा, आक्षेपार्ह साहित्य आणि 39 लाख रुपयांची रोकड जप्त केली, अशी माहिती एनआयएच्या प्रवक्त्याने दिली. एनआयएने 129 ठिकाणांवर, पंजाब पोलिसांनी 17 जिल्ह्यांतील 143 ठिकाणे आणि हरयाणा पोलिसांनी 10 जिल्ह्यांतील 52 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली.
ही छापेमारी पहाटे साडेपाच वाजता एकाचवेळी सर्व ठिकाणांवर सुरू करण्यात आली. 'operation-dhvast' ऑपरेशन ध्वस्तअंतर्गत केलेल्या छापेमारीदरम्यान काही संशयितांना ताब्यात घेतले आहे, असे प्रवक्त्याने सांगितले. अतिरेकी घोषित केलेला अर्श दल्ला, कु‘यात गुंड लॉरेन्स बिष्णोई, छेनू पहिलवान, दीपक टीटर, भूपी राणा, विकाश लागरपुरीया, आशिष चौधरी, गुरप्रीत सेखोन, दिलप्रीत बाबा, हरसिमरत सिम्मा आणि अनुराधा यासारख्या गुंडांवर ही कारवाई करण्यात आली.
ही छापेमारी पाकिस्तान आणि कॅनडासारख्या इतर देशांतील दहशतवाद्यांसोबत काम करणार्या कट्टर टोळ्यांशी संबंधित शस्त्र पुरवठादार, वित्त पुरवठादार, इतर सुविधा उपलब्ध करणारे, हवाला व्यावसायिकांवरही करण्यात आली, असे प्रवक्त्याने सांगितले. मागील वर्षी ऑगस्टपासून लक्ष्यित हत्या, खलिस्तानी समर्थक संघटनांना निधी पुरवठा, आणि खंडणी प्रकरणी कट रचण्याशी संबंधित तीन प्रकरणे दाखल झाल्यानंतर एनआयएने कारवाईची मालिकाच सुरू केली असून, त्यातील ही सहावी कारवाई होती.
विदेशातील सूत्रधारांकडून बियाणी, नागलची हत्या
महाराष्ट्रातील व्यावसायिक संजय बियाणी आणि आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप मांगल अम्बियाची मागील वर्षी पंजाबमध्ये हत्या करण्यात आली होती. या हत्यांचा कट विविध राज्यांतील तुरुंगांत रचण्यात आला होता आणि विदेशातील सूत्रधारांच्या संघटित गुंडांनी तो तडीस नेल्याचे तपासातून स्पष्ट झाल्याची माहिती प्रवक्त्याने दिली.
जप्त केेलेले साहित्य
देशभरात झालेल्या छापेमारीत पिस्तूल, मिश्रित दारुगोळा, वापरलेली व जिवंत काडतुसे, 60 मोबाईल, पाच डीव्हीआर, 20 सिम कार्ड्स, हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, डोंगल, वायफाय राऊटर, डिजिटल घड्याळ, मेमरी कार्ड्स, 75 दस्तावेज आणि 39.60 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.