स्मृतींचा दरवळ देणारा ज्येष्ठ

    दिनांक :21-May-2023
Total Views |
- स्वाती पेशवे
उन्हाळा चांगलाच तापला आहे. तुलनेने यंदाचा उन्हाळा सुसह्य ठरत असला, तरी हे सुखही बोचरे होते. अवकाळी पाऊस, हवामान बदलाचे थेट आपल्या उंबर्‍यापर्यंत पोहोचलेले परिणाम, गारपिटीमुळे झालेले प्रचंड नुकसान, एरवी पाण्याच्या प्रतीक्षेत हा काळ घालवणार्‍या विदर्भ-मराठवाड्यामध्ये भर उन्हाळ्यात दुथडी भरून वाहताना बघायला मिळणारी नदीपात्रे आणि गेल्या 65 वर्षांमध्ये एप्रिल महिन्यात पडलेल्या सर्वाधिक पावसाची नोंद हे आणि यासारखे अन्य बरेच मुद्दे आपली चिंता वाढवणारेच आहेत. खेरीज याच लहरी हवामानाच्या परिणामस्वरूप मिळणारा यंदाचा पाऊसकाळ तुलनेने कमी असल्याचे संकेतही फार उत्साहवर्धक नाहीत. मात्र, तरीदेखील घाबरून न जाता पुढे जाण्याची शिकवण निसर्गानेच आपल्याला दिली आहे. तसेही Aranyashashti ज्येष्ठ मास एक नवी सकारात्मकता घेऊन येतो, असेही आपण म्हणू शकतो. हिंदू वर्षातला हा तिसरा महिना अनेकार्थाने महत्त्वाचा आहे. या महिन्यात वैशाखासारखाच उन्हाचा ताप जाणवत असला, तरी आता वळिवाचे वेध लागलेले असतात. अधूनमधून येणार्‍या वळिवाच्या सरी वातावरणात आल्हाददायक थंडावा निर्माण करतात. त्यामुळेच हे दिवस तुलनेने बरे वाटतात. खेरीज मुलांच्या दीर्घ सुट्ट्या, घरातील मंगलकार्यांची लगबग, घरात पाहुणे-रावळ्यांची वर्दळ, भटकंतीचे बेत अथवा सणावारांमुळे मिळणारा निवांतपणा ही या महिन्यात विरंगुळ्याची केंद्रं ठरतात.
 
 
ganga-dashara
 
या महिन्यात साजर्‍या होणार्‍या प्रमुख दिवसांची यादी बरीच मोठी असते. उदाहरणार्थ, मासाच्या प्रथम दिवशीच गंगा दशहरास प्रारंभ होतो. Aranyashashti ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेला भगीरथाच्या प्रयत्नाने पृथ्वीवर गंगेचे अवतरण झाल्याचे मानतात. म्हणूनच या दिवसापासून ज्येष्ठ शुद्ध दशमीपर्यंत दशहरा पर्वणी साजरी केली जाते. यानिमित्त घरातील देवाबरोबर पुजल्या जाणार्‍या घागरीतल्या गंगेचे पूजन केले जाते. गंगेची आरती म्हणून नैवेद्य दाखवला जातो. प्रतिपदेपासून दशमीपर्यंत हळूहळू पृथ्वीवर उतरलेल्या गंगेच्या प्रवाहाचे पूजन करीत असतानाच या काळात गरजूंना अन्नदान केले जाते. शक्य असल्यास आमरसाचे भोजन देण्याचा काहींचा प्रयत्न या काळात सफल होताना दिसतो. ‘दशहर्‍याचे भोजन’ म्हणून ओळखले जाणारे अन्नदान पुण्यसंचय करून देते, अशी श्रद्धा आहे. या दिवसात आंब्याचे दानही सुयोग्य समजले जाते. ज्येष्ठ शुद्ध षष्ठी अर्थात अरण्यषष्ठीच्या दिवशी विंध्यवासिनीची षोडशोपचारे पूजा केली जाते. ही विंध्यवासिनी म्हणजे उमा, पार्वती, चंडी आणि काली यांचेच रूप आहे. म्हणूनच या आदिमातेची पूजा करताना ‘दुर्गासप्तशती’ या ग्रंथाचे वाचन तसेच सप्तशतीचा पाठ म्हणण्याची प्रथा काही घरांमध्ये पाळली जाते. कंसाच्या हातून निसटून गेल्यावर दुर्गामातेने गंगेच्या तीरावरील विंध्य पर्वतातील दाट अरण्यात निवास केल्याचे पुराणकथा सांगतात. म्हणूनच या तिथीला ‘अरण्यषष्ठी’ म्हणत असावे, हा विचार काही तज्ज्ञ मांडतात.
 
 
या महिन्यात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. मनकर्णिका म्हणजेच मनूचे वडील पेशव्यांच्या पदरी नोकरीला असल्यामुळे तिचे बालपण पेशव्यांच्या सन्निध्यात गेले. पुढे ती घोडा फेकणे, तलवारबाजी, भालाफेक या सगळ्या युद्ध कौशल्यात प्रवीण होत गेली. अतिशय हजरजबाबी, सर्व कामांमध्ये कुशल आणि अतिशय चाणाक्ष तसेच हुशार अशा मनूच्या अंगी असणारे गुण अपूर्व होते. गंगाधरपंत नेवाळकर यांच्याशी तिचा विवाह झाला आणि ती झाशी संस्थानची राणी झाली. अशा या धोरणी, युद्धशास्त्र निपुण, शूर आणि थोर कर्तृत्व आणि नेतृत्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाईची पुण्यतिथी ज्येष्ठ मासात असते. त्यानिमित्त वयाच्या 23 व्या वर्षी रणांगणात वीरमरणाला कवटाळणार्‍या राणीच्या पराक्रमाचे भरभरून कौतुक आजही ऐकायला मिळते. पुण्यतिथीच्या निमित्ताने तिला स्मरण करून अभिवादन केले जाते. याच महिन्यात गोपाळ गणेश आगरकर यांचीही पुण्यतिथी असते. सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी जन्मलेले गोपाळ गणेश आगरकर हे थोर समाजसुधारक म्हणून अवघ्यांना परिचित आहेत. ते एक उत्तम पत्रकारही असून समाज सुधारण्यासाठी ‘केसरी’, ‘मराठा’ आणि ‘सुधारक’ या तीन वृत्तपत्रांचा आधार घेऊन त्यांनी महिला शिक्षणाचा सातत्याने आग्रह धरला होता. सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता आणि विज्ञान निष्ठा या त्यांच्या जीवनमूल्यांचे महत्त्व आजही लक्षात घेण्याजोगे आहे.
 
 
गोपाळ गणेश आगरकर ‘केसरी’ वृत्तपत्राचे पहिले संपादक होते तसेच डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात तसेच त्या अंतर्गत फर्ग्युसन कॉलेजची स्थापना करण्यातही त्यांचा मोलाचा सहभाग होता. पुढे त्यांनी याच कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम पाहिले. बालविवाह आणि अस्पृश्यता या सारख्या समाजातील अनिष्ट रूढी नष्ट केल्या पाहिजेत, असा आग्रह धरणार्‍या त्यांच्यासारख्या विचारवंताची गरज आजही भासते आणि त्यांच्या स्मृतींना वंदन करताना या विचारांचे महत्त्व अधोरेखित होते. ज्येष्ठ शुद्ध एकादशीचा दिवस गायत्री जयंती म्हणून साजरा केला जातो. साहजिकच या दिवशी गायत्री देवीची पूजा, आराधना आणि गायत्री मंत्राचे पठन केले जाते. गायत्री मंत्रामध्ये चार वेदांचे सार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्याचे नित्य पठन केल्यास चारही वेदांचे ज्ञान प्राप्त होते, असे जाणते सांगतात. चार वेद, अठरा पुराणे यांची माता असणारी गायत्री देवी भारतीय संस्कृतीची जन्मदात्री या नात्यानेही पूजनीय ठरते. याच मासात Aranyashashti ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला धर्मवीर संभाजी महाराज जयंती साजरी केली जाते. अवघ्या नऊ वर्षांचे असताना शिवाजी महाराजांबरोबर आग्रा मोहिमेवर जाणे, वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी ‘बुद्धभूषण’ सारखा ग्रंथ लिहिणे यातून त्यांच्या बुद्धी आणि कुशाग्रतेचा परिचय घडतो. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची अधिकृतपणे घोषणा केली. ‘हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा’ असा ध्यास घेणार्‍या शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे. या तिथीला त्या मंगलमयी दिवसाचे स्मरण केले जाते. आजही आपण महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर दरवर्षी साजरा करतो.
 
 
Aranyashashti ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला केले जाणारे वटसावित्रीचे व्रत हा महिलांसाठी या महिन्यातील पर्वणीचा दिवस म्हणावा लागेल. सावित्रीने यमाकडून सत्यवानाचे प्राण परत आणले आणि आपले सौभाग्य टिकवले तो दिवस ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेचा होता. म्हणूनच या दिवशी पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुवासिनी व्रत करतात. वडाची पूजा करतात. वडाचे झाड हे इतर सर्व झाडांपेक्षा जास्त प्राणवायू उत्सर्जित करते. त्यामुळे असेल कदाचित, या वृक्षाजवळ काही वेळ घालवून आरोग्यसंपन्न राहण्याच्या या व्रतामागे असल्याचे आज काही जाणकार सांगतात. आजही सुवासिनी वडाची पूजा करून दिवसभर उपवास करतात. पतीला चांगले आरोग्य, सौख्य, कीर्ती लाभो अशी सदिच्छा व्यक्त करतात. अर्थात त्यासाठी वडाची फांदी तोडून घरी त्याची पूजा करण्याची पद्धत मात्र अयोग्यच म्हणावी लागेल. ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा संत कबीरांची जयंती म्हणून ओळखली जाते. संत कबीर कुटुंबवत्सल होते. त्यांचे दोहे आजही प्रसिद्ध आहेत. तेे मानवजातीचे, मानवतेचे पुजारी होते. सर्व धर्माचे लोक मिळून मिसळून राहावेत, त्यांनी एकमेकांत भांडू नये हे विचार पसरवण्यासाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. त्यामुळे त्यांना हिंदू-मुसलमान ऐक्याचे प्रतीक समजले जाते. ज्येष्ठ पौणिमेच्या दिवशी त्यांचे स्मरण केले जाते.
 
 
या महिन्यात छत्रपती शाहू महाराज भोसले जयंती साजरी होते. राज्याभिषेक समारंभ झाल्यानंतर 28 वर्षे ते कोल्हापूर संस्थानचे राजे होते. शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण आणि अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. पुढे त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. थोडक्यात, त्यांनी रयतेच्या उपयोगी पडतील अशी अनेक कामे जाणीवपूर्वक केली होती. त्यामुळे असा राजा आजही हवा, ही सार्वत्रिक भावना या दिवशी जाणवते. या खेरीज Aranyashashti ज्येष्ठ महिन्यात संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान, राजमाता जिजाबाई भोसले पुण्यतिथी, संत निवृत्तिनाथ पुण्यतिथी, श्रीमंत नानासाहेब पेशवे स्मृतिदिन असे अनेक महत्त्वपूर्ण दिवस या काळात येतात. या सगळ्यांच्या स्मरणाने हा मास अधिकच पवित्र होऊन जातो.