चंद्र स्वारीसाठी ‘इस्रो’ पुन्हा सज्ज

21 May 2023 18:10:06
बंगळुरू,
Chandrayaan Mission : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रो भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्र मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अंतराळयान यू. आर. राव उपग्रह केंद्रात पेलोड्सच्या अंतिम जुळवणीच्या तयारीत आहे. यान प्रक्षेपणाची अंतिम तारीख अद्याप ठरली नसली तरी, जुलैच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात इस्रो चांद्रयान-3 चे प्रक्षेपण करू शकते, अशी माहिती इस्रोच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.
 
Chandrayaan Mission
 
चांद्रयान-3 मोहिमेत (Chandrayaan Mission) चंद्र रेगोलिथ, चंद्राचा भूकंप, चंद्राच्या पृष्ठभागाच्या प्लाझ्मा वातावरणाच्या थर्मो-भौतिक गुणधर्मांचा आणि लॅण्डिंग साईटच्या आसपासची मूलभूत रचना यांचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक उपकरणे आहेत. या वर्षी मार्चमध्ये चांद्रयान-3 अंतराळ यानाने यशस्वीरीत्या आवश्यक चाचण्या पूर्ण केल्या. या चाचणीत यानाने प्रक्षेपणाच्या वेळी अंतराळ यानाला सामोरे जाणार्‍या कठोर कंपन आणि ध्वनिक वातावरणाचा सामना करण्याची क्षमता प्रमाणित केली.
 
 
हे चांद्रयान (Chandrayaan Mission) तीन यंत्रणांचे मिश्रण आहे; प्रोपल्शन, लॅण्डर आणि रोव्हरचा यात समावेश आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून भारतातील सर्वांत वजनदार प्रक्षेपण वाहन, लाँच व्हेईकल मार्क-3 द्वारे (याला जीएसएलव्ही एमके-3 देखील म्हणतात) प्रक्षेपित केले जाईल. चांद्रयान-3 हा चांद्रयान-2 मोहिमेचा पाठपुरावा आहे, जो चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लॅण्डिंग आणि फिरण्यासाठी एंड-टू-एंड क्षमता प्रदर्शित करेल आणि लँडर रोव्हर जुळवणीचा यात समावेश आहे. चांद्रयान-3 चे प्राथमिक उद्दिष्ट हे लॅण्डिंग असणार आहे. त्यासाठी नवीन उपकरणे तयार करणे, चांगले अल्गोरिदम तयार करणे, अपयशी पद्धतींची काळजी घेणे, यासह आज बरेच काम केले जात आहे, असे इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सांगितले.
 
 
इस्रोने सीई-20 या क्रायोजेनिक इंजिनची उड्डाण स्वीकृती हॉट चाचणी पूर्ण केली आहे, जी (Chandrayaan Mission) चांद्रयान-3 साठी प्रक्षेपण वाहनाच्या क्रायोजेनिकवरच्या टप्प्याला शक्ती देईल. तामिळनाडूच्या महेंद्रगिरी येथील इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्सच्या हाय अल्टिट्यूट टेस्ट फॅसिलिटीत 25 सेकंदांच्या नियोजित कालावधीसाठी उष्ण चाचणी घेण्यात आली.
Powered By Sangraha 9.0