दहशतवादाचे नवे स्वरूप

    दिनांक :21-May-2023
Total Views |
- कर्नल (नि.) अनिल आठले
ज्येष्ठ अभ्यासक
 
21 मे 1991 रोजी एका Terrorism दहशतवादी हल्ल्यात भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि त्यांच्याबरोबर अनेक निरपराध लोकांचा मृत्यू झाला. तेव्हापासून दरवर्षी 21 मे रोजी दहशतवादविरोधी दिवस पाळला जातो. 20 व्या शतकात दहशतवाद, विशेषत: आत्मघाती हल्ले मोठ्या प्रमाणात सुरू झाले. इस्त्रायलविरुद्ध संघर्षात पॅलेस्टिनी लोकांनी आत्मघाती हल्ल्यांचा शस्त्र म्हणून उपयोग केला. त्यातूनच विमानांचे अपहरण करून आपल्या मागण्या मान्य करवून घेण्याची मालिकाच सुरू झाली. भारतातदेखील इस्लामी कट्टरपंथीयांनी 90 च्या दशकात 1993 मध्ये मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणत 300 च्या वर लोकांची हत्या केली. त्यानंतर जवळपास संपूर्ण दशकभर भारतामध्ये दहशतवादी हल्ले आणि बॉम्बस्फोटांची एक मालिकाच तयार झाली. मुंबई शहरावर याचा सगळ्यात अधिक परिणाम झाला. या शहराने अनुभवलेले साखळी बॉम्बस्फोट असोत वा कसाबच्या हल्ल्याप्रसंगी पाहायला मिळालेला घृणास्पद हिंसाचार असो... अशा इतक्या घटना घडल्या की, आज त्यांची तारीखही लोकांच्या लक्षात नाही. याच मालिकेमध्ये मुंबईच्या लोकलमध्ये भर गर्दीच्या वेळी बॉम्बस्फोट घडवून 200 च्या वर लोकांची हत्या करण्यात आली.
 
 
terrorism
 
भारतातल्या या Terrorism दहशतवादी हल्ल्यांमध्ये काही समान सूत्रे दिसून येतात. त्यातील एक म्हणजे या सर्व दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तान आणि पाकिस्तानस्थित इस्लामी दहशतवादी संघटनांचा हात होता. दुसरे सूत्र म्हणजे या सर्व दहशतवादी हल्ल्यांना छुप्या रीतीने मदत करणारे अनेक जण आपल्या देशाचेच नागरिक आहेत. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देशातला जातीय सलोखा बिघडू नये म्हणून या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या लोकांना प्रसारमाध्यमांमध्ये कधीच सहानुभूती मिळाली नाही. याउलट या दहशतवादी कृत्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणार्‍या लोकांना पोलिसांनी अटक केल्यानंतर प्रसारमाध्यमांमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली झाल्याची ओरड सुरू करण्यात आली. देशातील सर्वसाधारण जनता स्थितप्रज्ञपणे हे सर्व पाहात राहिली. परंतु, या असंतोषाचा उद्रेक 1993 मध्ये मुंबईत किंवा 2002 मध्ये गुजरातमध्ये झाल्यावर देशांतर्गत धर्मनिरपेक्ष मंडळींनी गहजब माजवला. दहशतवादाला सामोरे जाण्यास प्रतिबंध करणारी ही विकृत मनोवृत्ती दहशतवाद फोफावण्यास जबाबदार आहे.
 
 
Terrorism दहशतवादी कृत्यांचे समर्थन करण्यासाठी मग मानवी हक्कवाल्यांनी मूळ कारण शोधण्याची नवी टूम शोधून काढली. उदाहरणार्थ 1993 चे बॉम्बहल्ले हे 1992 च्या घटनांंमुळे झाल्याचे समर्थन केले गेले. मग हेच लोक अगदी 2002 पर्यंत हीच टेप वाजवत राहिले. 2002 नंतर मग देशात अनेक बॉम्बस्फोट झाले. त्यात हजारो लोक मारले गेले. या सर्वांची सांगड गुजरात दंगलीशी घातली गेली. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे गुजरातचे दंगे भासवले जातात तसे एकांगी नव्हते. या दंग्यांमध्ये दोन्ही समुदायांचे लोक मारले गेले होते आणि पोलिस कारवाईमध्ये बहुसंख्य समाजाचे अनेक बळी पडले होते. ही वस्तुस्थिती असताना गुजरात दंग्यांचे मतपेटीच्या राजकारणासाठी एकांगी चित्र उभे केले गेले. याचा परिणाम असा झाला की, अनेक वर्षे दहशतवाद्यांना भारतात बॉम्बस्फोट घडवण्यासाठी सबब मिळत राहिली.
 
 
तसे पाहिले तर Terrorism दहशतवाद मानवजातीला नवा नाही. अगदी जुन्या काळी चंगीझ खानने आपले अफाट साम्राज्य उभे केले तेव्हा दहशतीचा सामरिकदृष्ट्या वापर केला. एखादे शहर काबीज केल्यावर चंगीझ खानचे सैन्य तिथे एवढे अत्याचार करत असे की, त्याच्या भीतीने इतर शहरे त्याचे सैन्य येण्याच्या आधीच पलायन करीत असत वा शरणागती पत्करत असत. अशा प्रकारे चंगीझ खानने जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे साम्राज्य उभे केले होते. परंतु, आधुनिक काळात आणि युद्धाचे काही नियम सर्वमान्य झाल्यानंतर युद्धांमध्ये दहशतवादाचा वापर करण्याचे प्रमाण कमी झाले. परंतु, हा निकष पाहता अमेरिकेने जपानवर केलेला अणुबॉम्बचा हल्ला हा एक प्रकारचा दहशतवादच होता. तद्नंतर म्हणजेच दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळात अमेरिका आणि सोव्हिएत संघ या दोघांकडेही अण्वस्त्रे आली तेव्हा जगात अण्वस्त्रांच्या दहशतीखालील शांतता निर्माण झाली.
 
 
सामान्यपणे Terrorism दहशतवादाचे डावपेच कमकुवत देशाकडून वापरले जातात. उघडपणे एखाद्या देशाशी लढणे शक्य नसल्यास अनेक देश दहशतवादाच्या मार्गाचा अवलंब करून अपरोक्ष युद्ध खेळतात. गेली 30 वर्षे पाकिस्तानकडून हा खेळ सुरू आहे. परंतु, 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर दहशतवादी कारवायांविरोधात पाकिस्तानातल्या दहशतवादी तळांवर हल्ले करण्याचे धोरण आपण स्वीकारले. अशा प्रकारे दहशतवादाची किंमत मोजावी लागल्यापासून पाकिस्तानने भारतात दहशतवादी कृत्यांना मदत करण्याबाबत आपला हात आखडता घेतला आहे. 21व्या शतकातल्या पहिल्या दशकाच्या तुलनेत आज भारतात दहशतवादी हल्ले खूपच कमी झाले आहेत. याचे श्रेय दहशतवादविरोधी आक्रमक धोरणांना दिले पाहिजे. आज स्थिती अशी आहे की, आता पाकिस्तानला धाक बसला आहे. त्यामुळे दहशतवादविरोधी धोरणाचा पडलेला पायंडा आता बदलला जाणार नाही, याची खात्री बाळगली पाहिजे.
 
 
दहशतवादाच्या संदर्भातली सर्वात कठीण बाब म्हणजे आत्मघाती हल्ले. अगदी अमेरिकेसारख्या आधुनिक आणि बलवान देशालादेखील 11 सप्टेंबर रोजीचे आत्मघाती हल्ले थांबवता आले नव्हते. आत्मघाती हल्ले थांबवण्याचा एकच उपाय म्हणजे अशा प्रकारच्या दहशतवाद्यांवर कायम नजर ठेवून हे हल्ले होण्याआधीच थांबवणे. ते थांबवण्यासाठी Terrorism दहशतवादी आत्मघाती हल्लेखोरांना ते आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याआधीच ठार मारणे, हाच एक उपाय उरतो. जगभर पोलिसांच्या अशा प्रकारच्या कारवाईचे समर्थन केले जाते आणि त्यात सामील झालेल्या पोलिसांना त्याचे श्रेय देऊन शाबासकी दिली जाते. इंग्लंडमध्ये भुयारी रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर अशा प्रकारच्या एका घटनेत पोलिसांना पाहून एक संदिग्ध व्यक्ती पळू लागली तेव्हा पोलिसांनी त्याला तिथेच ठार केले. नंतरच्या तपासात निष्पन्न झाले की, तो अतिरेकी नसून अवैधरीतीने लंडनमध्ये राहणारा एक परकीय नागरिक होता. परंतु, या कारवाईमुळे लंडन पोलिसांवर कोणत्याही प्रकारची टीका झाली नाही. याउलट, भारतात मात्र अशाच प्रकारचा आत्मघाती हल्ला करण्याच्या तयारीत असलेली इशरत जहाँ आणि तिचे चार साथीदार यांना गुजरात पोलिसांनी कंठस्नान घातले तेव्हा मात्र त्या कारवाईत भाग घेणार्‍या अधिकार्‍यांना एक दशकभर तुरुंगात डांबण्यात आले. सुदैवाने आज ही मानसिकता कमी-अधिक प्रमाणात बदलली आहे आणि दहशतवादविरोधी पोलिस कारवाईला जनतेचे समर्थन प्राप्त आहे. 20 व्या शतकाच्या अखेरीस आणि 21 व्या शतकाच्या पहिल्या दशकात इस्लामी दहशतवादाने जगभर थैमान घातले होते. पण एकंदरीतच जागतिक स्तरावर आणि राष्ट्रसंघाद्वारे आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरोधात कारवाई केल्यामुळे आज दहशतवाद बर्‍याच प्रमाणात कमी झाला आहे.
 
 
Terrorism दहशतवादविरोधी कायदे आणि कारवाईच्या नाण्याची दुसरी बाजूदेखील आहे. दहशतवादविरोधी कायद्यांमुळे नागरिकांच्या अनेक स्वातंत्र्यावर घाला आला आहे. लोकांची फोनवरील संभाषणे चोरून ऐकणे आज सर्रास झाले आहे. दहशतवादाच्या बीमोडाच्या नावाखाली झालेल्या कायद्यांमुळे पोलिसांच्या हातात अमर्याद सत्ता आली आहे. अनेक ठिकाणी याचा गैरवापर केला जाऊन लोकांकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला जातो. बिहारसारख्या राज्यात तर दहशतवादी कायद्याखाली दोन आणि तीन वर्षांच्या लहानग्यांनादेखील दोषी ठरवले गेल्याचे किस्से आहेत. खेरीज दहशतवादाच्या भीतीमुळे विमान प्रवास हे एक जाचक प्रकरण ठरत आहे. अनेकदा विमान प्रवास एक तासाचा, परंतु त्याआधी सुरक्षा तपासणीकरिता दोन-दोन तास आधी विमानतळावर पोहोचावे लागत आहे. दहशतवादाच्या भीतीमुळे जागतिक व्यापार आणि पर्यटन ही दोन्ही क्षेत्रे अपेक्षेइतकी विकसित झालेली नाहीत. अशा प्रकारे दहशतवादामुळे एकूणच जागतिक अर्थव्यवस्था मंदीकडे झुकली आहे. याचा परिणाम म्हणजे जागतिक स्तरावर गरिबी कमी होण्याची गतीदेखील कमी झाली आहे. अशा प्रकारे देशावर दहशतवादाचे अनेक दृश्य आणि अदृश्य परिणाम झाले आहेत. अखेरीस सामान्य नागरिकाच्या मनात Terrorism दहशतवादविरोधी मानसिकता निर्माण होत नाही, तोपर्यंत कमी-अधिक प्रमाणात हा प्रश्न जगाला भेडसावतच राहणार आहे.