तभा वृत्तसेवा
नेर,
Shri Sadguru Mungsaji Mauli : दारव्हा तालुक्यातील धामणगाव (देव) येथील प्रसिद्ध संत परमहंस श्रीसदगुरू मुंगसाजी माऊली यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात मुंबापुरीतील चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरातील नगीन महाल येथील दीर्घ वास्तव्याने पुनीत झालेल्या या परिसरातील चौकाला श्रीसदगुरू परमहंस मुंगसाजी महाराज चौक असे नाव देण्यात आले आहे.
आमदार तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी या परिसराला भेट देऊन चर्चगेट जवळच्या वाहतूक बेटास सुशोभित करून त्या ठिकाणी माऊलींचे आध्यात्मिक व सामाजिक सेवाकार्य यांची माहिती देणारे स्मृतीशिल्प उभारण्यासाठी जागेची पाहणी केली. यावेळी महानगरपालिका उपायुक्त शुभांगी हसनाळे, सहायक आयुक्त गुरव, वाहतूक पोलिस अधिकारी बाभळ यांच्यासह महानगर पालिका व पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
दारव्हा तालुक्यात धामणगाव (देव) हे जन्मगाव व कर्मभूमी असलेले श्रीसदगुरू मुंगसाजी माऊली यांचा जन्म 1872 मध्ये श्रावण वद्य अष्टमीला माता गमाई विक‘म अंबोरे यांच्या उदरी झाला. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी स्वमालकीच्या गढीमध्ये सिद्धासनात 12 वर्षे तपश्चर्या केल्यानंतर प्राप्त आध्यात्मिक व दैवीशक्तीच्या बळावर त्यांनी सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद व सुखसमृद्धी निर्माण करण्यासाठी विविध सेवाकार्य केले. त्यामुळे त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली. त्या कीर्तीचाच परिपाक म्हणून बडोदा संस्थानाच्या महाराणीचे भाचे वैमानिक यशवंत घाटगे यांनी त्यांना धामणगाव वरून मुंबईला आणले व त्यांची चर्चगेट परिसरातील भव्यदिव्य अशा नगिन महालातील पहिल्या माळ्यावर निवासाची व्यवस्था केली. साधारण 11 वर्षे म्हणजे 1947 ते 1958 पर्यंत महाराजांचे येथे वास्तव्य राहिले.
या ठिकाणी संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांना भेटत असत. सन 1958 मध्ये फाल्गुन शुद्ध सप्तमीला मुंगसाजीनाथ माऊलींचे महानिर्वाण झाले. त्यांच्यावर मुंबई मधील बाणगंगा बाणेश्वर येथे अंतिम संस्कार करण्यात आले असून तेथे त्यांचे समाधी मंदिर उभारण्यात आले आहे. धामणगाव (देव) येथे श्रीसदगुरू मुंगसाजी माऊलींचे भव्य मंदिर असून या मंदिर व परिसराच्या विकासासाठी काही वर्षांपासून मंत्री संजय राठोड यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला असून हा संपूर्ण परिसर सुशोभित केला आहे. ते स्वतः माऊलींचे परमभक्त असल्याने वेळोवेळी धामणगाव (देव) येथे दर्शनासाठी जात असतात. मंत्री संजय राठोड हे या विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणून मुंगसाजी माऊलींच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या विविध श्रद्धास्थळांच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील राहत असल्याने माऊलींच्या परिवारामध्ये त्यांच्याप्रती आस्था व सहानुभूती दिसून येते.