पाणी, पाणी काय करता...?

    दिनांक :24-May-2023
Total Views |
इतस्तत:
- अरुंधती वैद्य
उन्हाळा सुरू झाला; त्याची तीव्रता वाढायला लागली. save water पावसाळा लांबला की पाणी वाचवायला हवे, याची जाणीव व्हायला लागते. मुळात प्रत्येक ऋतूत ही जाणीव असायला हवी, पण तसे दिसत नाही. पाणी ही माणसाला निसर्गाकडून सहज मिळालेली गोष्ट आहे. मात्र, सहज मिळालेल्या गोष्टीचे मोल वाटत नाही; ती गोष्ट लाखमोलाची असली तरी! आपला देश सुजलाम् सुफलाम् आहे. खळाळत्या नद्यांनी संपन्न आणि समृद्ध झालेला आहे. त्यामुळे आपल्याला पाण्याचे मोल वाटत नाही. पिण्यासाठी पाणी मोलाने देणे आपल्या संस्कृतीत नाही. इतर अनेक देशांमध्ये पिण्याचे पाणी फुकट मिळत नाही. ते विकत घ्यावे लागते. भारताबाहेर गेले की पिण्याच्या पाण्याचे मोल विशेषत्वाने कळते. पृथ्वी 71 टक्के पाण्याने व्यापली आहे असे म्हणतात. देश-विदेश फिरताना आपल्याला जमीन कमी आणि सगळीकडे पाणीच पाणी दिसते, पण त्यातले फक्त तीन टक्के पाणी पिण्यायोग्य आहे. पाणी हे जीवन आहे. सजीव सृष्टी पाण्याशिवाय अशक्य आहे. एकीकडे थेंबभर पाण्यासाठी वणवण सुरू असते तर दुसरीकडे पाण्याचा प्रचंड अपव्यव होताना दिसतो. घरी काम करणार्‍या बाईला मी सांगितले, ‘‘पाणी कमी वापरत जा गं. फक्त माझ्या घरी नाही तर जिथे जिथे काम करते त्या प्रत्येक घरी पाणी वाया घालवू नको. अशी पाण्याची उधळपट्टी बरी नाही. आपल्या पुढच्या पिढ्यांना पाणी मिळणार नाही.’’ तर म्हणाली, ‘‘एवढा वेळ कोणाजवळ हाय? बारीक नळ सोडून काम नाही जमत. पाच-सहा घरी काम करतो; आणि पुढचं कोणी पाहिलंय? पुढचे घेतील पाहून... ब्ला ब्ला ब्ला...!’’
 
 
Water-1
 
तिचे तत्त्वज्ञान ऐकून आणि अधिक वाद घातला तर ती काम सोडून जाईल या भयाने मला तिथून काढता पाय घ्यावा लागला. एका आप्तांच्या घरी तिथल्या कामवाल्या बाईने नळ धो धो सोडून ठेवला. मी (जित्याची खोड) बोलले, ‘‘पाणी कमी वापरत जा गं. काय धो धो नळ सोडून ठेवते!’’ यावर ती बाई म्हणाली, ‘‘पाणी पाणी काय करते. पाणी वाचवून काय घर बांधणार आहे?’’ यावर मी म्हटले, ‘‘माझे घर बांधून झाले आहे गं, पण आता इतरांना घर बांधायला पाणी मिळणार की नाही हा प्रश्न आहे.’’ त्यावर तिचे उत्तर तयार...
 
 
‘‘खूप पाऊस झाला यंदा. अंबाझरीला ते पुलावरून महिनाभर पाणी वाहत होते जी, ते ओवर फ्लो का काय म्हंते ते.. मंग हाय की भरपूर पानी आन ते सरकार पाहून घेईन पान्याचे!’’ एकेकाळी खेड्यामध्ये असताना डोक्यावरून पाण्याचे हंडे आणणारी हीच का ती? मला प्रश्न पडला! बाई शहरात आल्यावर दारात नळ मिळाला आणि बाईची भाषाच बदलली. पाण्यासाठी करावी लागलेली तिची स्वत:ची आणि तिच्या सख्यांची वणवण ती पार विसरून गेली. मला मात्र डोक्यावर हंडे, हातात कळशा घेऊन चार-चार मैल पाण्यासाठी पायपीट करणार्‍या, विहिरीत उतरून ओंजळीने हंडे भरणार्‍या बायका डोळ्यांसमोर दिसत होत्या. एकीकडे दुष्काळाच्या झळा सोसलेली माणसे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी जिवाचे रान करताना दिसतात. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’चे नारे लावतात तर दुसरीकडे सर्वत्र सहा पदरी, आठ पदरी सिमेंटचे रस्ते... मग पाणी जमिनीत कसे मुरणार? पावसाळ्यात निसर्ग मुक्तहस्ताने पाणी देतो, पण ते पावसाचे पाणी जमिनीत न मुरता वाहून जाते आणि धरती तहानलेलीच राहते. तिची पूर्ण तृप्तता होत नाही. अंगणातील माती जाऊन तिथे सिमेंट आले. घराभोवतीचे मेंदीचे कुंपण गेले. तिथे भिंत आली. जमिनीत पाणी मुरणे कमी होत चालले आहे. save water परिणामी भूगर्भातील पाण्याचे साठे कमी होत आहेत; शिवाय एकूणच जगाच्या तापमानात वाढ होते आहे. लोकसंख्या आणि उद्योगधंदे वाढल्यामुळे पाण्याची गरज वाढते आहे.
 
 
निसर्ग लहरी झाला आहे. अल् निनोची टांगती तलवार डोक्यावर असते. सगळ्याच ऋतूंचे चक्र बदललेले आढळते. ज्येष्ठ-आषाढात येणारा पाऊस भाद्रपद महिन्यात येताना दिसतो. पाऊसही पहिलेसारखा राहिला नाही. आला की तांडव करत येतो. पाणी जमिनीत मुरत नाही. जलसंवर्धनाची जबाबदारी सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे. पाणी जमिनीत मोठ्या प्रमाणात मुरवले गेले पाहिजे. जमिनीत पाणी मुरले तर त्यात वाढ होणार. विकास, सुखसोयी आवश्यक आहेत; पण तितकेच पर्यावरणाचा तोल सांभाळणे गरजेचे आहे. वेळ आली की save water ‘पाणी अडवा पाणी जिरवा’चा नारा लावण्यापेक्षा काहीतरी ठोस पावले उचलली पाहिजेत, पण... 
 
- 9420397559