असद उमर यांचा पीटीआयच्या महासचिवपदाचा राजीनामा

25 May 2023 17:40:53
- इम्रान खानला सोडून जाणार्‍यांचे सत्र सुरूच


इस्लामाबाद, 
इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे सरचिटणीस व त्यांच्या जवळचे एक सहकारी Asad Umar असद उमर यांनी अदियाला तुरुंगातून सुटका झाल्यानंतर लगेचच पक्षाच्या सर्व पदांवरून पायउतार होण्याची घोषणा केली. या राजीनामासत्रामुळे इम्रान खान यांना आणखी एक धक्का बसला आहे. माजी मानवाधिकार मंत्री शिरीन मजारी यांच्या राजीनाम्यानंतर माजी माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी राजीनामा दिला. या दोन मंत्र्यांच्या पाठोपाठ आता असद उमर यांनी राजीनामा दिला. याआधी काही खासदार आणि मोठ्या प्रमाणावर आमदारही इम्रानची साथ सोडून गेले आहेत. 9 मे रोजीच्या हिंसाचाराच्या पृष्ठभूमीवर सरकारने विरोधकांवर केलेल्या कारवाईदरम्यान हे राजीनामासत्र सुरू झाले.
 
 
ASAD-UMAR
 
या परिस्थितीत पक्षाचे नेतृत्व करणे माझ्यासाठी शक्य नाही. मी पीटीआयच्या महासचिव व कोअर कमिटी सदस्यपदाचा राजीनामा देत आहे. मी दबावाखाली पक्ष कार्यालयाचा राजीनामा देत नाही. मात्र, मी पीटीआय सोडली नसून केवळ पक्षाच्या पदांचा राजीनामा दिला, असे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 9 मे रोजी घडलेली सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे लष्करी प्रतिष्ठानांवर हल्ला करण्यात आला. मला वाटते की, इम्रान खान यांनी स्वतः पाकिस्तानमधील लष्कराची स्थिती उत्तम प्रकारे स्पष्ट केली आहे. आमच्यासारखे मजबूत सैन्य नसते तर सीरियासारखेच भवितव्य आम्ही पाहिले असते. माझ्या देशाला माझ्यापेक्षा माझ्या सैन्याची जास्त गरज आहे, असे इम्रान खान यांनी एक्सप्रेस ट्रिब्यून वृत्तपत्राला सांगितले.
 
 
9 मे रोजी पाकिस्तानमधील संवेदनशील संरक्षण प्रतिष्ठानांवर हल्ला केला आणि जाळपोळ केली. निमलष्करी जवानांनी इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालय परिसरातून अटक केल्यानंतर हिंसक निदर्शने सुरू झाली. कार्यकर्त्यांनी लाहोर कॉर्प्स कमांडर हाऊस, मियांवली एअरबेस आणि फैसलाबादमधील आयएसआय इमारतीसह डझनभर लष्करी प्रतिष्ठांनांची तोडफोड केली. रावळपिंडीतील लष्कराच्या मुख्यालयावर (जीएचक्यू) पहिल्यांदाच जमावाने हल्ला केला. या हिंसक संघर्षात 10 जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी म्हटले, मात्र सुरक्षा कर्मचार्‍यांनी केलेल्या गोळीबारात त्यांच्या 40 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला, असा दावा इम्रान खानच्या पक्षाने केला आहे. पाकिस्तानी सैन्याने देशाच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून या घटनेचे वर्णन केले व हिंसाचारानंतर इम्रान खान यांच्या हजारो समर्थकांना अटक करण्यात आली.
Powered By Sangraha 9.0