अमरावतीत पुन्हा घातपाताचे षडयंत्र?

शिवराय कुळकर्णी यांचा सवाल
सरकारकडे तपासाची विनंती

    दिनांक :25-May-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
मुंबई/ अमरावती,  
रझा अकादमीच्या मोर्चानंतर, सर तन से जुदा म्हणत उमेश कोल्हे यांच्या खुनानंतर आणि लव्ह जिहादची अनेक प्रकरणे उघडकीस आलेल्या अमरावतीचे पुन्हा एकदा सामाजिक सौहार्द बिघडविण्याचे षडयंत्र चालवले जात असल्याची माहिती भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते (Shivarai Kulkarni) शिवराय कुळकर्णी यांनी मुंबई येथे पत्रकारांना गुरूवार 25 मे रोजी दिली.
 
Shivarai Kulkarni
 
यावेळी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माधवराव भांडारी, प्रदेश माध्यम प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते. (Shivarai Kulkarni) अमरावती जिल्ह्या लगतच्या मध्यप्रदेशातील काही गाव - शहरांमध्ये खुला खत शीर्षकाखाली मोठ्या प्रमाणात पत्रके वितरित केली जात आहेत. यात आरएसएस आणि बजरंग दल हे आपले काफिर असून त्यांनी भगवा लव जिहाद सुरू केला आहे आणि लक्षावधी मुस्लिम युवतींना हिंदू करून घेण्यात येत असल्याचे म्हटले आहे. अमरावतीसाठी चिंताजनक बाब अशी की, या पत्रकांमध्ये अमरावती येथे आठशे मुस्लिम युवतींचे धर्मांतरण करून त्यांना हिंदू करून घेतल्याचे म्हटले आहे. हे वास्तवाला धरून नाही. धार्मिक भावना भडकवण्यासाठी हे पत्रक काढले गेले आहे. मात्र, यामुळे एकूणच मुस्लिम समाजात भीतीचे वातावरण तयार होते आहे. न घडलेल्या कृतीचा राग म्हणून याची अमरावतीत प्रतिक्रिया उमटू शकते. काही दिवसांपूर्वीच समाजकंटकांनी अकोल्यात दंगल घडवली. त्यात एकाचा प्राण गेला.
 
 
या दंगली निमित्त एमआयएमच्या लोकांनी अमरावतीत पत्रकार परिषद घेतली. काही मुस्लिम धार्जिण्या पक्षांनी सोशल मिडियावरच्या छूटपुट पोस्टचा सहारा घेत पराचा कावळा केला. त्या पाठोपाठ या पत्रकातही अमरावतीचा उल्लेख असल्याने अमरावती शहरात पुन्हा घातपात करण्याचे कारस्थान तर केले जात नाही ना, अशी आशंका निर्माण होते. इंदौर येथे या पत्रक प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. लगतच्या महाराष्ट्रात प्रतिक्रिया उमटावी व सामाजिक सौहार्द खराब होण्याचे हे योजनापूर्वक केलेले षडयंत्र आहे. या षडयंत्राचा तपास करण्यात यावा, अशी विनंती आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे देखील शिवराय कुळकर्णी (Shivarai Kulkarni) यांनी यावेळी सांगितले.