अलाहबादच्या संग्रहालयातील ‘सेंगोल’ दिल्लीकडे रवाना

    दिनांक :25-May-2023
Total Views |
- नेहरू गॅलरीत ठेवले होते
 
नवी दिल्ली, 
1947 मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्याच्यावेळी सत्ता हस्तांतरणासाठी एक प्रतीक म्हणून वापरलेले Sengol सेंगोल नंतर अलाहबादेतील संग्रहालयाच्या नेहरू गॅलरीत ठेवण्यात आले होते. ते दिल्लीकडे रवाना करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचे 28 मे रोजी लोकार्पण केले जाणार असून, चांदीपासून घडवलेले तसेच सोन्याचा मुलामा दिलेले हे सेंगोल त्याच दिवशी लोकसभेच्या सभापतींच्या आसनाजवळ स्थापित केले जाणार आहे.
 
 
Sengol
 
ज्याप्रमाणे तामिळनाडूतील चोला साम्राज्यात एका राजाकडून दुसर्‍या राजाकडे सत्ता हस्तांतरित करण्यासाठी Sengol सेंगोलचा वापर केला जायचा, त्याचप्रमाणे हे सेंगोल ब्रिटिशांकडून भारताकडे झालेल्या सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक आहे. हे सेंगोल दिल्लीकडे रवाना करण्यात आले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिली. संग‘हालयातील नेहरू गॅलरीचा एक भाग म्हणून जवाहरलाल नेहरूंशी संबंधित इतर अनेक ऐतिहासिक वस्तूंसह हा औपचारिक राजदंड अलाहबाद संग‘हालयात ठेवण्यात आला होता, असे सूत्राने सांगितले. संग्रहालयाच्या या इमारतीची पायाभरणी नेहरू यांच्या हस्ते 14 डिसेंबर 1947 रोजी झाली होती. त्यानंतर 1954 मध्ये कुंभमेळ्यादरम्यान नागरिकांसाठी हे संग्रहालय खुले करण्यात आले होते, अशी माहिती संग्रहालयाच्या एका अधिकार्‍याने दिली.