बायोपिकचे फोफावलेले पीक

    दिनांक :25-May-2023
Total Views |
बायोपिकचे फोफावलेले पीक
 - सोनाली ठेंगडी
 
 
biopics जगभरातील सर्व चित्रसृष्टींच्या तुलनेत भारतातील बॉलिवूड संबोधली जाणारी सिनेसृष्टी ही वास्तवापासून बरीच दूर आहे, असे मानले जाते. आपल्याकडे बहुतांश वेळेला एक हिरो असतो जो 10 ते 15 लोकांनाही भारी असतो. त्याच्या फाईटिंग सीनमध्ये हे नेहमीचेच दृश्य असते. त्याचे प्रेक्षकांवर इम्प्रेशन मारण्यासाठी हे अपुरे असते म्हणून की काय तो उत्तम नृत्य करतो, गातो, हँडसम दिसतो आणि जगातील सर्व चांगले गुण त्याच्या ठायी असतातच! त्याच्याच सार‘या आपल्या हिरोईनदेखील असतात. त्यांनी सुंदर दिसणे तर अत्यावश्यक असते. मेकअपचे मोठे थरावर थर देऊन देखणी, साजरी दिसणारी ही तरुणी हिरोप्रमाणेच उत्तम नाचणारी असते. आता काळानुरूप त्यात पोहणे, वाहन चालविणे, हॉर्स रायडिंग हे सगळे कसबही गरजेचे आहेत. बाकी पूर्वापार चालत आलेले बहुतांश चित्रपट याच धाटणीतले आहेत. त्यामुळे बॉलिवूडला हॉलिवूडमधील लोक काल्पनिक जगात वावरणारे असे म्हणतात. म्हणूनच तर आपल्या चित्रपटाच्या आधी एक स्पष्टीकरण नक्कीच असते की, ‘यातील सर्व पात्र काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही’.
 
DTGR
 
 
 
मुळात, कल्पनेच्या जगात सर्वाधिक वावरणारे हॉलिवूडवालेच आहेत. biopics मात्र, ते आपल्या कल्पनेतून सृजनाची निर्मिती करतात. नवे काहीतरी जगाला दाखवतात. हिंदी सिनेसृष्टी मात्र यात कुठेतरी कमी पडते. असे असताना एक चित्रपट प्रकार असा आला जो प्रेक्षकांना वास्तवाजवळ घेऊन आला आणि तो प्रकार म्हणजे जीवनपट. जीवनपट म्हटले तर नव्या पिढीला चटकन कळत नाही म्हणून आपण त्याचे ‘बायोेपिक’ हे प्रचलित नाव वापरूया. बायोपिकची सुरुवात भारतात कधीपासून झाली याविषयी विविध मतांतरे आहेत. कोणी सांगतात की महात्मा गांधींवरील ‘गांधी’ हा चित्रपट पहिला बायोपिक होता तर कोणी ‘राजा हरिश्चंद्र’ याला पहिला बायोपिक मानतात. मात्र, आपण चित्रमहर्षी दादासाहेब फाळकेंना मान देत राजा हरिश्चंद्र यालाच पहिला बायोपिक मानूया. असे असले तरी राजा हरिश्चंद्राला कोणी पाहिले, म्हणून आपण गांधीजींवरील चित्रपटापासून याची सुरुवात मानली पाहिजे. तसे तर मराठी सिनेसृष्टीत चार दशकांपूर्वीपासून बायोपिकची रेलचेल होती. कारण छत्रपती शिवाजी महाराजांवर असं‘य चित्रपट निघाले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम अशा अनेक संतांवरील चित्रपटही पूर्वापार येतच राहिले. आजच्या काळाचे मापदंड लावले तर त्यांनाही बायोपिकच म्हटले पाहिजे. अगदी शिर्डी के साईबाबा असो किंवा अन्य संत-महंतांवरील चित्रपट, सर्वांना याच श्रेणीत आणता येईल. तरीदेखील मागील काही वर्षात आलेले बायोपिक हे सन्माननीय कर्तृत्वशाली लोकांवर त्यांच्या जिवंतपणीही तयार झाले, हे विशेष. त्यातील काही जीवनपट अतिशय गाजले आणि लोकांना आवडले. त्यात मिल्खासिंग यांच्यावरील ‘भाग मिल्खा भाग’, महेंद्रसिंग धोनीवरील ‘एम. एस. धोनी...’, कपिल देव यांच्यावरील ‘83’, मेरी कोम, फोगाट भगिनींवरील ‘दंगल’ अशा अनेक चित्रपटांची नावे सांगता येतील. अगदी विशेषत्वाने उल्लेख करावा असे आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही विवेक ओबेरॉयची भूमिका असणारा बायोपिक आला होता. आगामी काळात त्यांच्यावर कदाचित आणखीही चित्रपट येतील आणि त्यांच्यापाठोपाठ योगी आदित्यनाथांवरही चित्रपट येतील यात शंकाच नाही. फक्त त्यांनी बायोपिकची परवानगी द्यायला हवी.
 
 
 ६YT
 
 
महापुरुषांवरील बायोपिकमध्ये biopics ‘गांधी’, ‘सरदार’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘भगतसिंग’, ‘नेताजी...’ एवढेच नाही तर महाराणा प्रताप, राणी पद्मावतीसार‘या चित्रपटांचाही समावेश आहे. मागील काही वर्षात थोडेथोडके नाही तर अंदाजे 27 बायोपिक तयार झाले. त्यातील काही महापुरुषांवर अनेकांनी चित्रपट बनवले. विशेष उल्लेख करण्यासारखेही बायोपिक तयार झाले. त्यात ‘मांझी : द माऊण्टन मॅन’, ‘बुधिया सिंग’, ‘बॅण्डिट क्वीन’ यांचा उल्लेख करावा लागेल. मांझी नामक व्यक्तीने पाण्यासाठी एकट्याने वर्षानुवर्षे राबून एक पर्वत फोडला होता. बॅण्डिट क्वीन हा चित्रपट बनवणे खरेतर धाडसाचेच काम होते. डाकूरानी फुलनदेवीवरील हा चित्रपट म्हणजे शेखर कपूरचे फार मोठे दिव्यच होते. फुलनदेवीचा इतिहास अतिशय हिंसक आणि भीषण घटनांनी भरलेला होता. त्यातही सर्वात भयानक म्हणजे तिच्यावर गावकर्‍यांच्या संमतीने झालेला सामूहिक बलात्कार. ती घटना शेखर कपूरने ज्या पद्धतीने मांडली ते पाहून भल्याभल्यांचा थरकाप उडाला. याचे मोठ्या पडद्यावर चित्रीकरण हा फारच आव्हानात्मक विषय होता. मात्र, शेखर कपूरने हे शिवधनुष्य पेलले आणि तो खर्‍या अर्थाने दिग्दर्शक म्हणून अमर झाला, असे म्हणायला हरकत नाही. प्रसिद्धीसाठी निर्माते, दिग्दर्शक असे विषय निवडतात असा आरोप नेहमीच केला जातो. असे असले तरी ते प्रत्यक्षात असा विषय हाताळताना कोणत्या दिव्यातून जातात याची आपण कल्पनाही करू शकत नाही. एखादी भीषण घटना जी एखाद्या व्यक्तीच्या जीवनात घडलेली असते ती पडद्यावर साकारताना दिग्दर्शकाची, कलाकाराची जबाबदारी कित्येक पटींनी वाढलेली असते. त्यामुळे त्यांनी ते आव्हान पेलले असेल तर त्यांना सलामच करायला हवा. म्हणूनच शेखर कपूर आणि फुलनदेवीची भूमिका करणारी कल्पना बिश्वास या दोघांनाही सॅल्यूटच करायला हवा.
 
 
असेच biopics धाडस विद्या बालनने ‘द डर्टी पिक्चर’ स्वीकारून दाखवले होते. दाक्षिणात्य नटी सिल्क स्मिता हिच्यावर बेतलेल्या या चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट देण्यात आले होते, इतका उत्तानपणा त्यात होता. मात्र, हा चित्रपट करूनही विद्याची प्रतिमा ‘तसल्या’ प्रकारची अभिनेत्री अशी झाली नाही, हे खर्‍या कलाकाराचे कसब म्हणावे लागेल. सिल्क स्मितासार‘या डिस्को शांती आणि अनेक अभिनेत्री होऊन गेल्या ज्यांना पहिल्या फळीत कधी स्थानच मिळाले नाही. पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्यात काही गुणवत्ता नव्हती. त्यांना योग्य ती संधी न मिळाल्याने त्या वेगळ्या मार्गाचा अवलंब करत कलाजगतात काम करीत राहिल्या. समाज हा बाईविषयी अतिशय चोखंदळपणा दाखवत असतो, जणू काय तिच्याविषयी सारे काही ठरवण्याचा अधिकार त्यालाच आहे. याच समाजाने सिल्क स्मितासार‘या अभिनेत्रीला ‘सो कॉल्ड’ प्रतिष्ठित समाजात वावरण्याच्या लायकीचे समजले नाही. मात्र, लपूनछपून पाहण्यासाठी तिचेच चित्रपट लागायचे. याच मानसिकतेवर बोट ठेवत ‘द डर्टी पिक्चर’ने बराच माहौल केला. असे असूनही लोकांनी या चित्रपटात सिल्क स्मिताच्या वेदना लक्षात ठेवल्या नाहीत तर लक्षात ठेवले ते ‘उलाला’ गाणे! इथे कुठेतरी त्या बायोपिकचा उद्देश मातीत गेला की काय असे वाटायला लागते. कितीतरी बायोपिक अशा असतील ज्यांची नावे कदाचित अनवधानाने किंवा जागेअभावी सुटली असतील. मात्र, एक खरे की, कितीही चित्रपट प्रकार आले तरी चरित्रपटांचे स्थान कोणीही हिरावू शकत नाही. कारण शेवटी वास्तव ते वास्तवच राहणार. त्याला कल्पनेची कितीही जोड द्यायची म्हटली तरी शेवटी तो असतो आरसाच...अगदी स्पष्ट नसले तरी सत्य दाखवणारा!
 
मराठीतही उत्तम कामगिरी
हिंदी चित्रपटांइतके नसले तरी मराठीत बरेच चरित्रपट साकारले गेले. आधी सांगितल्याप्रमाणे शिवरायांवरील असं‘य चित्रपट तयार झाले आणि अजूनही होताहेत. त्या इतिहासातील अनेक पात्रांनाही जिवंत करणारे चित्रपट आले. मग ते बाजीप्रभू देशपांडे असो किंवा बहिर्जी नाईक असो. अगदी ‘हिरकणी’नेही प्रेक्षकांची मनं जिंकली. मराठीत लोकमान्य टिळक, बालगंधर्व, बाळासाहेब ठाकरे अशा जीवनपटांनी पसंती मिळवली. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हा चित्रमहर्षी दादासाहेब फाळकेंवरील चित्रपट तर छानच होता. ‘आणि डॉ. काशीनाथ घाणेकर’ या चित्रपटाने तर मराठीतील पहिल्या सुपरस्टारची नव्या पिढीला ओळख करून दिली. याच मालिकेत प्रसाद ओकच्या ‘धर्मवीर’ने तर कमालच केली. हा चित्रपट इतका लोकप्रिय झाला की ठाण्यातील आनंद दिघे यांच्यावरील सिक्वेलची लोक वाट पाहत आहेत.