345 गरजु लाभार्थ्यांना घरपोच सेवा

    दिनांक :26-May-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
गोंदिया,
home delivery services राज्य शासनाने महत्वाच्या योजनांचा लाभ सामान्य जनतेला घरपोच मिळावा यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियानाला सुरुवात केली आहे. सर्व गावांमध्ये नागरिकांना शासनाच्या सुविधा घरपोच मिळणार आहेत. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार विनोद अग्रवाल यांनी केले. रावणवाडी येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ अभियानात शासनाच्या विविध योजनांचा व दाखल्यांचा 345 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शासन स्तरावर राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अनुषंगाने ‘शासन आपल्या दारी’ तथा महाराजस्व अभियान शिबीर-2023 अंतर्गत शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवून जास्तीत जास्त गरजु नागरिकांना सदर योजनांचा लाभ मिळावा यादृष्टीने गोंदिया तालुक्यातील रावणवाडी येथे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 
sdet546
  
सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांचा राज्य शासनातील विविध विभागांशी दैनंदिन संबंध येत असतो. दैनंदिन प्रश्न निकाली काढणे तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचा सर्वसामान्य नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन आमदार अग्रवाल यांनी केले. जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, तहसिलदार मानसी पाटील, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण, गटविकास अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे, नायब home delivery services तहसिलदार सीमा पाटणे, तालुका कृषि अधिकारी धनराज तुमडाम उपस्थित होते. राज्य शासन सामान्य जनतेसाठी विविध लोकोपयोगी योजना राबवित आहे. शासकीय योजनांपासून सर्वसामान्य नागरिक वंचित राहू नये याचा विचार करुन शासकीय योजना गतिमान आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात 15 एप्रिल ते 15 जून 2023 या कालावधीत ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त गरजुंनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले. यावेळी आरोग्य शिबिरामध्ये 37 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. तसेच मानव विकास कार्यक्रम (बुडीत मजुरी) अंतर्गत 18 लाभार्थ्यांना चेक वाटप करण्यात आले.
 
महिला व बालकल्याण विभागामार्फत माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत 22 लाभार्थ्यांना प्रत्येकी 25 हजार रुपये मुदत ठेव प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. महसूल विभागामार्फत जात प्रमाणपत्र-43, डोमेसाईल प्रमाणपत्र-27, उत्पन्न दाखले-34, आधार अपडेशन-57, सातबारा वाटप-14, 42 ड अंतर्गत सनद वाटप-7, रेशनकार्ड वाटप-28 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. कृषि विभागाद्वारे नरेगा फळबाग लागवड मंजूरीचे पत्र-8, औजार वाटप ट्रॅक्टर-2 रिफर-2 वाटप करण्यात आले. महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे बचतगट कर्ज वाटप चेक-15, ई-ऑटोरिक्षा-2, ई-दुग्ध टेम्पो-2 लाभार्थ्यांना देण्यात आले. क्षयरोग विभागामार्फत फुड बास्केट वाटप-10 लाभार्थी. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे धुरविरहित चूल वाटप-9 लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी गोंदिया तालुक्यातील एकूण 17 विभागामार्फत विविध योजनांची माहिती देण्यात आली व 345 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. कार्यक्रमास जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचेसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी गोंदिया पर्वणी पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार तहसिलदार गोंदिया मानसी पाटील यांनी मानले.