पणजी,
देशातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान असलेला प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार गोव्यातील लेखक (Damodar Mauzo) दामोदर मौझो यांना राज्यपाल पी. एस. श्रीधरन् पिल्लई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शनिवारी पुरस्कार प्रदान केल्यानंतर संबोधित करताना राज्यपाल म्हणाले की, मौझो हे कोकणी साहित्य संस्कृतीचे प्रतीक आहेत. गोव्याची राजधानी पणजीजवळील राजभवनात झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध कवी गुलजार, राज्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गौडे आणि भारतीय ज्ञानपीठाचे अध्यक्ष न्यायमूर्ती वीरेंद्र जैन उपस्थित होते. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे दिल्लीत असताना आभासी माध्यमाने कार्यक‘मात सहभागी झाले होते.
यावेळी पी. एस. पिल्लई म्हणाले की, कोकणी भाषा काही लाख लोक बोलत असले तरी, ती गुणात्मकदृष्ट्या समृद्ध आहे. त्यांनी चार्ल्स डिकन्स आणि दामोदर मौझो (Damodar Mauzo) यांच्यात साम्य दर्शविले. ज्यांनी त्यांच्या लेखनात अनाथ मुलांचे मुख्य पात्र म्हणून चित्रण करणे निवडले. या दोन्ही महान लेखकांनी धैर्याने समाजाला आरसा दाखवला आहे. गोव्याचे महान लेखक दामोदर यांना हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करताना मला अभिमान आणि आनंद वाटतो.
मौझो (Damodar Mauzo) यांची 25 पुस्तके कोकणी आणि एक इंग्रजी भाषेत प्रकाशित झाली आहेत. त्यांची अनेक पुस्तके वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादितही झाली आहेत. मौझो यांच्या ‘कर्मेलिन’ या प्रसिद्ध कादंबरीला 1983 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. 1981 मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीचा हिंदी, मराठी, इंग‘जी, पंजाबी, सिंधी, तमिळ, उडिया आणि मैथिली भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आहे. गोवा स्वातंत्र्य चळवळ, कोकणी भाषेचे संवर्धन आणि गोव्याशी संबंधित पर्यावरणात ते सक्रिय आहेत. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे मौझो (Damodar Mauzo) हे गोव्यातील दुसरे आहेत. यापूर्वी किनारपट्टीच्या राज्यातील रवींद्र केळेकर यांना 2008 मध्ये हा पुरस्कार मिळाला होता.