तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
शासकीय योजनांची जत्रा-सर्वसामान्यांच्या विकासाची यात्रा (Farmer Insurance Scheme) हा उपक्रम 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत अपघात ग्रस्त होऊन मृत्यू झालेल्या 4 शेतकर्यांच्या वारसदारांना प्रत्येकी 2 लाख रुपये रकमेचे धनादेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते देऊन विमा योजनेचा लाभ देण्यात आला.
शासकीय योजनांची जत्रा-सर्वसामान्यांच्या विकासाची यात्रा या उपक्रमाच्या कालावधीत नागरिकांना विविध विभागाच्या योजनाची माहिती पोहोचवणे, प्रस्थापित लाभार्थ्यांची यादी तयार करणे तसेच त्यांच्याकडून अर्ज भरून घेण्यात येणार आहे. त्याकरिता जिल्हास्तरावर व तालुका स्तरावर जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात किमान 75 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याचे उद्दिष्ट या उपक्रमा अंतर्गत ठरविण्यात आलेले आहे.
कृषी विभागामार्फत विविध योजना अंतर्गत 13 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आलेले आहे. गोपीनाथ मुंडे (Farmer Insurance Scheme) शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत 104 लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्राप्त झालेले असून त्यापैकी 65 प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहेत. मंजूर प्रस्तावापैकी 44 अपघात ग्रस्त शेतकर्यांच्या वारसदारांच्या खात्यावर प्रत्येकी 2 लाख रुपये प्रमाणे लाभ देण्यात आला आहे. 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीमध्ये जत्रा शासकीय योजनांची अभियानांतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे, आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी केले आहे.