वर्धा नदीत युवक बुडाला

- दोघे बचावले

    दिनांक :05-May-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
वरोडा, 
Wardha river : चंद्रपूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्याच्या सिमेवर वर्धा व वेणा नदीचा संगम आहे. या परिसरात यात्रा बघण्याकरिता गेलेले तीन जण पोहण्याकरिता पाण्यात उतरले असता तिघेही बुडाले. त्यापैकी दोघे बाहेर निघाले. पण वृत्तलिहेपर्यंत एकाचा शोध लागला नव्हता. ही घटना शुक्रवार, 5 मे रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. विक्की अमर येडमे (22, रा. कोसारा, जि. यवतमाळ) असे बुडालेला युवकाचे नाव आहे.
 
Wardha river
 
वरोडा तालुक्यातील दिंदोडा गावाजवळ असलेल्या वर्धा व वेणा नदीच्या संगमाजवळ बॅरेज प्रकल्पाचे काम सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील जोडसावंगी येथे नदीच्या पात्रात यात्रा भरते. या यात्रेमध्ये वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील हजारो नागरिक सहभागी होतात. मागील काही दिवसापासून पाऊस पडत असल्याने नदी भरून वाहत आहे. काही दिवसापूर्वी याच नदीत बोट उलटून चार जण बचावल्याची घटना घडली होती. शुक्रवारी दुपारच्या सुमारास या नदीपात्रात विक्की येडमे, निलेश येडमे (23, रा. बामर्डा, ता. वरोडा), कवडू येडमे (50, रा. कोसारा) हे तिघे पोहण्याकरिता नदीच्या पात्रात उतरले. सध्या नदीत पाणी जास्त असल्याने तिघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. त्यात निलेश येडमे आणि कवडु येडमे कसेतरी पाण्याच्या बाहेर आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. मात्र विक्की येडमे हा पाण्याच्या बाहेर येऊ शकला नाही. त्यामुळे तो बुडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत वरोडा पोलिस ठाण्याला माहिती देण्यात आली असून पोलिस स्थानिक नागरिकांसोबत बोटीने त्याचा शोध घेत आहे.