जि. प. शिक्षकांच्या वेतन प्रणालीत बदल

- आता ‘कॅफो’ कडून थेट शिक्षकांच्या खात्यात

    दिनांक :06-May-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
अमरावती, 
दर महिन्याला वेतनाची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहणार्‍या जिल्हा परिषद शिक्षकांच्या (ZP Teachers) वेतनाची प्रतीक्षा आता संपली आहे. प्रहार शिक्षक संघटनेने शिक्षकांचा वेतनाचा प्रश्न ऐरणीवर आणला असता संघटनेच्या मागणीची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी वित्त विभागाला ‘झेडपीएफएमएस’ प्रणालीने शिक्षकांचे वेतन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने मार्च महिन्याच्या वेतनापासून झेडपीएफएमएस प्रणाली सुरू केली आहे. त्यामुळे आता शिक्षकांचे वेतन ‘कॅफो’च्या खात्यावरून थेट शिक्षकांच्या खात्यात जमा होणार आहे. या निर्णयाने शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
 
ZP Teachers
 
जिल्हा परिषदेमध्ये पाच हजारांच्या जवळपास प्राथमिक शिक्षक (ZP Teachers) आहेत. या शिक्षकांचे वेतन महिन्याच्या एक तारखेला करण्यासंदर्भात प्रहार शिक्षक संघटनेने वेळोवेळी शासन दरबारी निवेदने दिली. ग्रामविकास विभाग मंत्रालयाने शिक्षकांचे वेतन विहित कालावधीत होण्यासाठी 26 मे 2022 रोजी दिलेल्या परिपत्रकान्वये सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जालना जिल्हा परिषदेप्रमाणे झेडपीएफएमएस (जिल्हा परिषद फंड मॅनेजमेंट सिस्टीम) प्रणालीद्वारे शिक्षकांचे मासिक वेतन ऑनलाईन खात्यावर जमा करण्याचे आदेश दिले होते. याची अंमलबजावणी काही जिल्हा परिषदांनी उत्तम रीतीने सुरू केली आहे. मात्र अमरावती जिल्हा परिषदेमध्ये पूर्वापार चालत आलेली पद्धत शिक्षकांसाठी मोठी डोकेदुखी व आर्थिक भुर्दंड देणारी ठरत होती.
अखेर शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी शासन निर्णयानुसार झेडपीएफएमएस प्रणालीद्वारे शिक्षकांचे वेतन करण्याची आग्रही मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती. या मागणीची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी वित्त विभागाला मार्च महिन्याचे वेतन झेडपीएफएमएस प्रणालीद्वारे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
 
 
अद्यापही मार्च महिन्याचे शिक्षकांचे वेतन झाले नसल्याने आता या महिन्याचे वेतन झेडपीएफएमएस प्रणालीद्वारे ऑनलाईन थेट शिक्षकांच्या खात्यावर प्रथमच जमा होणार आहे. शिक्षकांचे वेतन दोन महिने विलंबाने होत असल्याने परिणामी शिक्षकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे शिक्षकांच्या वेतनाबाबत हा इतिहास घडला आहे. आता अमरावती जिल्हा परिषदेने ही प्रणाली सुरु केली आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासूनचे वेतन आता या महिन्यापासून थेट लेखा व वित्त विभागाच्या (कॅफो) खात्यावरून शिक्षकांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.