पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...!

    दिनांक :01-Jun-2023
Total Views |
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...!
 
 
- सोनाली ठेंगळी 
 
Picture Abhi Baqi हा डायलॉग ऐकून कोणालाही ‘ओम शांती ओम’ आठवेल किंवा चित्रपटातील ‘द एंड’ची पाटी आठवेल. मुळात, चित्रपट संपला म्हणजे सारे काही आलबेल आहे, आता हिरो-हिरोईनचे लग्न झाले, ते सुखाने नांदू लागले, कधी एखादा दु:खी शेवट वगैरे वगैरे मानले जायचे. आता मात्र चित्रपटाच्या शेवटी ‘द एंड’ची पाटी येत नाही तर त्याऐवजी ‘कंटिन्यू’ किंवा ‘क‘मश:’ लिहावे अशा आशयाचे काहीतरी दिसते. त्यातून संकेत एवढाच असतो की या चित्रपटाचा पुढचा भागही येऊ शकेल. आता प्रेक्षकांनाही हे समजू लागले आहे. या पुढच्या भागाला सिक्वल म्हटले जाते. यात चित्रपटाच्या कथेची सुरुवात तिथून होते जिथे आधीच्या कथेचा शेवट झाला होता. त्यात पात्र तेच असतात. पहिल्या चित्रपटाला अशा वळणावर थांबवले जाते जिथून प्रेक्षकांच्या मनात दुसर्‍या भागाची उत्कंठा निर्माण होते. बहुतांश सिक्वल यासाठीच बनवले जातात कारण यात रिस्क कमी असते आणि दुसरे म्हणजे याचे चाहते, प्रेक्षक पक्के असतात.
 
 
 TY
 
 
या सिक्वलचेही तीन प्रकार असतात. Picture Abhi Baqi एक तर लीगेसी सिक्वेल, जो मूळ चित्रपटानंतर तब्बल दहा वर्षांनी बनवला जातो आणि बराच कालावधी उलटल्याने त्यातील पात्रेही नव्याने लिहिली जातात. दुसरा प्रकार स्टॅण्डअलोन सिक्वल. याची कथा मूळ चित्रपटावर आधारित असते. मात्र, यातील पात्र बदलले जातात. तिसरा प्रकार म्हणजे स्पिरीच्युअल सिक्वल. यात विषय मूळ चित्रपटाचाच असतो. मात्र, कथा आणि पात्र दोन्हीही वेगळे असतात. कोणालाही वाटेल की हा प्रकार मागील काही वर्षात सुरू झाला. मात्र, प्रत्यक्षात याची सुरुवात 1935 मध्ये आलेल्या ‘हंटरवाली’ या चित्रपटाने झाली होती. या चित्रपटाला होमी वाडियांनी दिग्दर्शित केले. याचा दुसरा भाग 1943 मध्ये आला आणि त्याचे नाव होते ‘हंटरवाली की बेटी’. त्यानंतर जवळपास 60 च्या दशकापर्यंत सिक्वल प्रकार थांबल्यासारखे झाले. मात्र, 1967 मध्ये देवानंदचा ‘ज्वेलथीफ’ आला आणि याने हा ट्रेंड पुन्हा एकदा सुरू केला. त्यानंतर डॉन, नागिन, घायल, कि‘ष, धूम अशा अनेक चित्रपटांचे सिक्वल आले. सिक्वलमध्ये कमाईच्या आणि लोकप्रियतेच्या बाबतीत बर्‍याच अंशी निर्माता, दिग्दर्शक आश्वस्त असतो. त्यानुरूप, अनेक सिक्वल सिनेमांनी चांगला गल्ला जमवला. मात्र, अनेक चित्रपट तोंडावर आपटले.
 
 
 
या सिक्वल प्रकारात सर्वाधिक यशस्वी कोणी ठरले असेल तर तो रोहित शेट्टी आहे. त्याच्या ‘गोलमाल’ सीरिजने प्रचंड यश मिळवले. अजय देवगण हा त्याचा ‘अ‍ॅसेट पॉईंट’ आहे. अजय देवगणसोबत त्याने ‘सिंघम’चेही दोन भाग बनवले. ते दोन्ही चांगले चालले. आता त्याने ‘सिंघम 3’ची घोषणा केली आहे. रोहितच्या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे, आपल्या पुढच्या चित्रपटाचे काही स्पष्ट संकेत तो आधीच्या चित्रपटात देतो. सिंघमच्या यशानंतर त्याने ‘सिम्बा’ काढला आणि ‘सिम्बा’च्या यशानंतर ‘सूर्यवंशी’चा ट्रेलरही शेवटच्या दृश्यात दाखवला. त्यामुळे त्याच्या पुढील पोलिसपटात अक्षय कुमार आहे हे प्रेक्षकांना समजून गेले. ‘सूर्यवंशी’ सुपरहिट झाल्यानंतर त्याच्या शेवटच्या दृश्यात अजय देवगण जॅकी श्रॉफला म्हणतो की आता सिंघम पाकिस्तानात येणार आहे. याचा अर्थ, रोहितच्या आगामी ‘सिंघम 3’मध्ये तो पाकिस्तानात जाणार, तेथील अतिरेक्यांशी लढणार आणि जॅकी श्रॉफ मु‘य खलनायक राहणार, हे निश्चितच आहे. अशीच कल्पना प्रेक्षकांना ‘पुष्पा 2’ या सिक्वलविषयीदेखील आली आहे. पहिल्या भागाच्या शेवटच्या दृश्यात, दुसर्‍या भागातील म्हणजे सिक्वलमधील खलनायकाची एंट्री दाखवली आहे. नव्या भागात पुष्पा या खलनायकाचा सामना कसा करणार, हे दिसेल. लोकांनी पुष्पाला डोक्यावर घेतल्याने पुढचा भागदेखील सुपरहिटच राहील, यात आजही कोणाला शंका वाटत नाही. हिंदी चित्रपटात आणखी एक सिक्वलची सीरिज प्रचंड लोकप्रिय झाली आणि ती म्हणजे ‘धूम’. ही सीरिज प्रेक्षकांनी तर डोक्यावर घेतलीच पण, याचे वेगळेपण असे की यात हिरोपेक्षाही व्हिलन महत्त्वाचा असल्याने अनेक दिग्गज हिरो यात खलनायक साकारण्यासाठी तडफडतात. म्हणून की काय, हृतिक रोशन, आमीर खान यांनाही ‘धूम’ स्वीकारण्याचा मोह आवरता आला नाही. दोन वेगवेगळ्या सीरिजमध्ये हे सुपरस्टार चक्क खलनायक बनले होते. आजही ‘धूम’चा नवा भाग आला तर त्यात कोणाला संधी मिळणार, ही चुरसच आहे.
 
 
 
आता दाक्षिणात्य सिनेमांचे युग आहे, Picture Abhi Baqi असे म्हटल्यास वावगे ठरू नये. हिंदी डब असणारे दाक्षिणात्य सिनेमे इतके लोकप्रिय आहेत की त्यांच्या सिक्वलकडे तर लोक अक्षरश: डोळे लावून आहेत. बाहुबलीचे दोन्ही भाग प्रचंड कमाई करणारे ठरले. त्याच्या पहिल्या भागात ‘कटप्पाने बाहुबली को क्यों मारा’ म्हणत राजामौलीने दुसर्‍या भागाचा सस्पेन्स इतका अफलातून ताणला की लोकांना या प्रश्नाने वेडावून सोडले. ‘कटप्पाने...’ हा तर जणू राष्ट्रीय प्रश्नच बनला होता. या एका प्रश्नाभोवती किती जोक्स तयार झाले, किती मीम्स आले, किती विनोदी किस्से आले. नंतर दुसरा भाग येताच लोकांना या प्रश्नाचे उत्तर मिळाले. आता ‘कांतारा’ या लो बजेट सुपरहिट चित्रपटाचे यश पाहून त्याच्या निर्मात्यांनी सिक्वलचा दुसरा भाऊ ‘प्रीक्वल’ काढायचे जाहीर केले. या प्रकारात पहिल्या चित्रपटाच्या आधीची कथाभूमी सांगितली जाते. अक्षय कुमारच्या ‘बेबी’ या चित्रपटाचा प्रीक्वल ‘नाम शबाना’ या नावाने आला होता. याचाच आणखी एक प्रकार म्हणजे ‘रीबूट’. बरेचदा निर्मात्याला त्याच हिट चित्रपटाचा सिक्वल दाखवायचा असतो. मात्र, त्यांच्याकडे त्याच्याशी संबंधित कथाभाग नसतो. मग तो त्या पात्रांचा वापर करून नवे काहीतरी त्याभोवती विणतो, यालाच रीबूट म्हणतात. आवारा पागल दिवाना, दिवाने हुए पागल हे चित्रपट याच श्रेणीतील आहेत. हेरा फेरी, वेलकम, हाऊसफूल, यमला पगला दिवाना, ड्रीम गर्ल हे सर्व चित्रपटही याच प्रकारातील विनोदी धाटणीचे होते. आजही हे चित्रपट लागले की आवडीने पाहिले जातात.
 
 
 
‘भूलभूलैय्या’ हा हॉरर प्रकारातील चित्रपट होता. त्याचा सिक्वल जो अनेक वर्षांनी आला, नव्या कलाकारांसह आला त्याची धाटणी हॉररसह विनोदी अशी होती. त्याचा तिसरा भागही येणार असल्याचे ऐकिवात आहे. मराठी सिनेसृष्टीत फारसे सिक्वल आले नाहीत. मात्र, महेश कोठारेंना लक्ष्यासोबतचा ‘झपाटलेला’ तात्या विंचू पुन्हा आणण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी आपला मुलगा आदिनाथला घेऊन ‘झपाटलेला 2’ आणला. ‘टाईमपास’ सीरिजमधील तीन चित्रपट आले. तिन्ही चांगले चालले. त्यातील पहिले दोन खर्‍या अर्थाने सिक्वल होते. तिसरा भाग मात्र रीबूट प्रकारातील होता. असे नवनवीन प्रकार यात येतच राहतील. पण एक मात्र खरे की यशाचे सूत्र एकदा सापडले की ते वारंवार वापरण्याचा मोह होतो. हा मोह म्हणजेच सिक्वल. यात यशाची खात्री, पर्यायाने कमाईची हमी आणि टीम ठरलेली असते त्यामुळे ट्युनिंगही सेट झालेले असते. या प्रकारांनी प्रेक्षकांना काही काळ भुलवता येईल. मात्र, सिक्वल हा कुठेतरी कल्पकतेसाठी मारक आहे, हे निर्माता, दिग्दर्शकांनी लक्षात घेतले पाहिजे. जोवर आखलेल्या पायवाटेने जाण्याचा मोह टाळला जाणार नाही तोवर नवी वाट चोखाळली जात नाही. म्हणून सिक्वलचे प्रमाण कमी व्हावे आणि सिनेमांच्या प्रकारात विविधता यावी, अशी अपेक्षा आपण प्रेक्षक म्हणून करूया. प्रत्येक वेळी ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हटले तर नही चलेगा भाऊ!!!