सेंगोल (राजदंड) : न्याय व्यवस्थेचे प्रतीक

01 Jun 2023 16:20:40
वर्तमान
 
 प्रवीण भागडीकर 
 
Scepter Sengol : नव्याने बांधण्यात आलेल्या संसद भवनात ‘सेंगोल’ म्हणजेच राजदंड प्रस्थापित करण्याची घोषणा भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी केली. भारतात अनेक वर्षे राजेशाही पद्धती अस्तित्वात असल्याने राजदंडाचे महत्त्व आपणांस नवखे नाही. सार्वभौमत्वाचे चिन्ह म्हणून प्रतीके, ध्वज, राजसिंहासन, राजमुकुट यांचा वापर राजेशाही व्यवस्थेत केला जात असे. पण आपल्याच राजकीय परंपरा व संस्कृतीचा धर्मनिरपेक्षीय विसर पडणे हा आमचा राजकीय धर्म बनलेला आहे. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्यप्राप्त समयी संपन्न झालेला राजदंड हस्तांतरणाचा सोहळा राजदंडासह विस्मृतीत गेला.
 
safsdf
 
पाश्चात्य जगतामध्ये राजघराण्यांचे (Scepter Sengol) राजचिन्ह अथवा प्रतीके म्हणून राजदंडाचा वापर होतो. नॉर्वे, स्विडन आणि इंग्लंडमध्ये राजदंडाची परंपरा आजही कायम आहे. सप्टेंबर 2022 मध्ये इंग्लडच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंतिम संस्काराच्या वेळी राजदंडाचा उपयोग झालेला होता. त्याचप्रमाणे नुकतेच इंग्लडचे राजे चार्ल्स यांच्या राज्यभिषेकाप्रसंगी राजदंडाचा वापर झालेला दिसून आला. त्यामुळे राजदंड हा इंग्लडच्या राजकीय परंपरा व संस्कृतीचा अविभाज्य भाग होय हे आपण याप्रसंगी बघितले.
 
 
भारतीय सभ्यता अथवा परंपरेत राजा अथवा राजपदाला सर्वोच्च सत्ता या अर्थाने राजदंडाला मान्यता प्राप्त आहे. राजाला राज्यभिषेकासमयी धर्मदंडाधिकार्‍यांकडून नेहमी आठवण करून दिली जात असे, की धर्म व नैतिक व्यवस्था हीच सर्वोच्च अधिसत्ता होय. (Scepter Sengol) राजपद धारण केल्यानंतर राजा तीनदा ‘अदण्डयो: अस्मि’ म्हणजेच कोणीही मला दंड करू शकत नाही, अशी घोषणा करीत असे. पण बाजूलाच उभा असलेला धर्मदंडाधिकारी समोर येऊन राजाच्या मस्तकाला धर्मदंड म्हणजेच राजदंडाचा स्पर्श करून ‘धर्मदण्डयो: असि’ म्हणजेच राजाला धर्म दंडित करू शकतो, याची आठवण करून देत असे. राजदंड, राजाच्या निरंकुशतेला अंकुश लावण्याचे एक साधन म्हणून वापरल्या जात असे. रामायण-महाभारत कथांमध्ये राजमुकुट, राजसिंहासन यासारखी प्रतीके सत्तांतराच्या प्रसंगी उपयोगात आणण्याचा प्रघात होता. पण त्यासोबत राजाला एक धातुची छडी सोपविली जात असे, ज्याला राजदंड असे म्हटल्या जात असे. महाभारतात युधिष्ठिराच्या राज्यभिषेकाप्रसंगी याचा उल्लेख आढळून येतो. ‘राजदंड हा राजाचा धर्म आहे, दंड हाच अर्थ व धर्माचे रक्षण करतो.’ यासार‘या वचनाचा उल्लेख महाभारताच्या शांतिपर्वात आढळून येतो.
 
 
राजदंड (Scepter Sengol) हा सार्वभौमत्वाच्या तीन आधारभ्रूत प्रतीकांपैकी एक होय. इतर दोन म्हणजे राजमुकुट व राजछत्र होय. राजाचे प्रजेमधील अस्तित्वाचे प्रतीक म्हणून या दोन्ही गोष्टींकडे बघितल्या जात असे. तर राजदंड हा जनतेच्या दरबारातील न्यायाचे प्रतीक होता. राजदंडाचा उपयोग प्राचीन भारतात सांकेतिक रुपात नेहमीच केल्या जात असे. मौर्य साम्राज्य, चोल राजवंशाचे साम्राज्य, गुप्त साम्राज्य, विजयनगर साम्राज्य यामध्ये राजदंडाचा प्रयोग नित्यनेमाने केला जात असे. राजदंडामध्ये राज्याची शक्ती निश्चित करण्याची क्षमता समाविष्ट होती.
 
 
वर्तमान संदर्भात ज्या ‘सेंगोल’ म्हणजेच (Scepter Sengol) राजदंडाची चर्चा सुरू आहे, ती चोल राजवंशाच्या सत्ता हस्तांतरणाच्या संदर्भात केली जाते. 1947 साली सत्ता हस्तांतरणावेळी हस्तांतरण नेमके कोणत्या प्रक्रियेच्या माध्यमातून व्हावे असा प्रश्न समोर आला तेव्हा माऊंटबॅटन यांनी भारतीय परंपरेनुसार हस्तांतरणाची प्रचलित पद्धत अस्तित्वात आहे का? व असल्यास ती कोणत्या माध्यमातून असावी? असा प्रश्न नेहरुंना केला. त्यावेळेस भारताचे तत्कालीन गव्हर्नर राजगोपालाचारी यांनी तामिळ संस्कृती व चोल राजवंशातील हस्तांतरणाच्या प्रकि‘येचा दाखला दिला. तेव्हा ‘सेंगोल’ म्हणजेच राजदंडाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले. सत्ता हस्तांतरणाच्या सांकेतिक स्वरुपात त्यावेळेस ‘सेंगोल’ ब्रिटिश राजवटीकडून पं. नेहरुंना सत्ता हस्तांतरीत झाल्याचे जाहीर झाले. त्यानंतर हा राजदंड कुठे गायब झाला त्याची आजमितीस चर्चा होतपर्यंत कुणालाच ठाऊक नव्हते.
 
 
स्वातंत्र्य प्राप्तीच्या आदल्या दिवशी म्हणजे 14 ऑगष्ट 1947 रोजी असा समारंभ घडलाच नाही, असे वक्तव्य विरोधी पक्षाच्या एका नेत्याने दिले. यासंबंधीचे काही कागदोपत्री पुरावे समोर आले, ज्याच्या आधारावर असा समारंभ झालेला होता पण त्यावेळेस फाळणीचा काळ होता व दंगे सुरू असल्याने कोणतीही अधिकृत घोषणा न करता हा समारंभ झाला. आपल्या ‘फ्रिडम अ‍ॅट नाईट’ या पुस्तकात लॅरी कॉलिन व डॉमनिक्यू लॅपिएरे यांनी 14 ऑगष्ट 1947 रोजी अशा समारंभाचे वर्णन आपल्या पुस्तकात केले आहे. नेहरुंच्या 17 यॉर्क मार्ग (आताचा मोतीलाल नेहरू मार्ग) या निवासस्थानी हा सोहळा झालेला होता व त्या समारंभाला डॉ. राजेंद्र प्रसाद उपस्थित होते असे सांगितले. या व्यतिरिक्त केंद्र शासनाच्या (Scepter Sengol) सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिकृत सुत्रानुसार या समारंभाचा अहवाल टाईम मॅगझिनच्या 25 ऑगष्ट 1947 च्या अंकात प्रसिद्ध झालेला होता. यास्मिन खान नावाच्या लेखकाने आपल्या ‘दि ग्रेट पार्टिशन : दि मेकिंग ऑफ इंडिया अ‍ॅड पाकिस्तान’ या पुस्तकात सेंगोल हस्तांतरणाच्या कार्यक‘माचा उल्लेख केला होता. तेव्हापासून भारताच्या संस्थात्मक इतिहासाच्या स्मृतीतून हा सोहळा व सेंगोल गायब झाले. तामिळनाडूत आझादी का अमृत महोत्सवाच्या दरम्यान स्वातंत्र्य चळवळीच्या ज्या काही वार्ता गोष्टी रुपाने येत होत्या त्यातून या सेंगोलची कथा बाहेर आली. तामिळनाडूतील प्र‘यात नृत्यांगना डॉ. पद्मिनी सुब्रम्हण्यम् यांनी पंतप्रधान कार्यालयाला एक पत्र लिहिले व स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची दखल घेत त्याचा शोध घेण्याचे आदेश दिले.
 
 
सेंगोलची (Scepter Sengol) रचना ही वैशिष्ट्यपूर्ण होय. त्याची उंची अंदाजे पाच फुटाची होय. व्यक्तीच्या साधारण सरासरी उंचीच्या बरोबर सेंगोलची उंची होय. सर्व नागरिक समान असून जात, वेष, भाषा, पंथ, धर्म या आधारावर कोणताही भेद होणार नाही असा त्याचा अर्थ होतो. संविधानाच्या उद्देशपत्रिकेत हीच अपेक्षा व्यक्त केलेली आहे. वरच्या बाजूला एका गोलाकार मंंचावर नंदी प्रस्थापित केलेला आहे. गोलाकार मंच हा संसाराचे प्रतीक असून, नंदी हा स्थिरतेचे प्रतीक होय. समोरच्या भागाला लक्ष्मीची प्रतिमा ही राष्ट्राच्या आर्थिक संपन्नतेचे प्रतीक होय. सेंगोलची रचना करणार्‍यांनी राजकीय व्यवस्थेची आदर्शवत प्रतिमा सेंगोलच्या रुपात केवळ प्रतीकांच्या माध्यमातून व्यक्त केली, हे त्याचे अर्थपूर्ण वैशिष्ट्य होय.
 
 
वर्तमान स्थितीत (Scepter Sengol) राजदंडाची प्रासंगिकता काय असाही एक प्रश्न निर्माण केल्या जाऊ शकतो. धर्माच्या अनुषंगाने राज्यव्यवस्थेच्या या प्रतीकांकडे न पाहता राजकीय पंरपरा व संस्कृतीच्या अंगाने त्याचा विचार केल्यास भारतीय राज्यव्यवस्था किती प्रगल्भ होती याचा अंदाज येतो. सेंगोलची स्थापना झाल्याने आता कर्मकांडाला चालना मिळेल हा वैचारिक दळभद्रीपणा आहे. आजही राज्यांच्या अनेक विधानसभांमध्ये राजदंड सभापतीच्या समोर ठेवलेला असतो. सभागृह कार्यरत असण्याचे ते प्रतीक होय. महाराष्ट्र विधानसभेत मध्यंतरी सत्ताधारी-विरोधकांच्या संघर्षामध्ये सदस्यांनी सभापतींसमोरील राजदंड पळवला. त्यावेळेस सभागृहाचे कामकाम थांबले. राजदंड नसणे म्हणजे सभागृहाची कार्यवाही प्रारंभ न होणे अथवा स्थगित होण्याचे मानले जाते. ही केवळ प्रतीके आहेत.
 
 
भारतीय राजमुद्रा, भारतीय ध्वज, संवैधानिक संस्थांच्या इमारती, कार्यालये ही सर्व आमच्या सार्वभौमत्वाची प्रतीके आहेत. त्यामुळे अशी प्रतीके ही धार्मिक स्वरुपाची नसून, आमच्या संवैधानिक जबाबदार्‍या, मर्यादा व कर्तव्याची आठवण करून देणारी व्यवस्था होय. लोकसभेत स्थापित झालेला (Scepter Sengol) सेंगोल शासनाच्या व जनतेच्या प्रतिनिधींना लोकांप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देईल. ही सर्व प्रतीके ‘आम्ही भारतीय लोक’ यांच्या इच्छा व आकांक्षा यांची प्रतिबिंबे होय, हे एकदा आमच्या कायदेमंडळाच्या प्रतिनिधींना समजले तर बहिष्कार, गोंधळ, संवैधानिक जबादारीचे वहन, जनतेप्रती निष्ठा काय असते याचे उत्तर अश्या प्रतीकांकडे बघितल्यांनतर प्राप्त होईल, अशी अपेक्षा करूया. नवीन संसदेची सुरुवात न्याय प्रतीकांच्या प्रतिष्ठापनेने झाली याचा अर्थ आमची राज्यव्यवस्था सवंग राजकारणाच्या नव्हे तर न्यायावर आधारीत राज्यव्यवस्थेच्या मार्गावर अग्रेषित होत आहे, हा एक शुभसंकेत होय.
 
- 9420250243
Powered By Sangraha 9.0