तभा वृत्तसेवा
मोर्शी,
घराच्या क्षेत्रफळाची सातबार्यावर योग्य नोंद करून नवीन सातबारा देण्यासाठी (Talathi bribe) लाच मागणार्या येथील तलाठ्याला गुरूवारी लाचलुचपत प्रतिबंधक विगाच्या पथकाने अटक केली. गौरव सुरेश लांजेवार (वय 33, तलाठी, साझा मोर्शी) असे लाच स्विकारल्यानंतर अटक झालेल्या तलाठ्याचे नाव आहे. या घटनेतील तक्रादार हे समर्थ कॉलनी, मोर्शी येथील रहिवासी आहे. त्यांच्या घराचे क्षेत्रफळ हे सातबार्यावर चुकीचे दर्शविण्यात आलेले आहे.
त्यामुळे क्षेत्राफळाची सातबार्यावर दुरस्ती होऊन नवीन सातबारा मिळण्यासाठी त्यांनी मोर्शी येथील तहसील कार्यालय येथे अर्ज केला होता. साजा मोर्शी येथील तलाठी लांजेवार हे त्यांना सदर (Talathi bribe) क्षेत्राफळाची सातबार्यावर दुरुस्ती होऊन नवीन सातबारा देण्याकरिता 3 हजार रुपये लाचेची मागणी करीत असल्याबाबत त्यांनी 1 जून रोजी सविस्तर तक्रार दिली. तक्रारीवरून केलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान तक्रारदार यांना तलाठी लांजेवार यांनी दुरुस्त केलेला सातबारा देऊन केलेला कामाचा मोबदला म्हणून तडजोडी अंती 2 हजार 500 रुपये लाचेची मागणी केली व त्याचवेळी 500 रुपये स्वीकारले. उर्वरित 2 हजार सापळा कार्यवाही दरम्यान स्वीकारले. तलाठी लांजेवार यांना लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे विरुद्ध पोलिस स्टेशन मोर्शी येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर कारवाई पोलिस निरीक्षक योगेशकुमार दंदे, शैलेश कडू, आशिष जांभळे, उमेश भोपते, उपेंद्र थोरात, चंद्रकांत जनबंधू यांनी केली.