वारी पंढरीची
पंढरीची वारी आहे माझे घरी|
आणिक न करी तीर्थव्रत||
व्रत एकादशी करीन उपवाशी|
गाईन अहर्निशी मुखे नाम||
नाम विठोबाचे घेईन मी वाचे|
बीज कल्पांतीचे तुका म्हणे||
Pandharpur Palkhi : भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्भाग्य ज्यांना लाभले असे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या देहू ते पंढरपूर पायी वारी सोहळ्याचे प्रस्थान १० जून २०२३ रोजी श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर देहू येथून विठुरायाच्या गजरात आनंदात झाले. पहाटे ५ श्री विठ्ठल-रुक्मिणी व शिळा मंदिरात महापूजा , तपोनिधी नारायण महाराज समाधी पूजा व संत तुकाराम महाराज पादुका पूजा झाल्यानंतर सकाळी १० वाजता प्रस्थान सोहळा व काल्याचे कीर्तन होऊन , दुपारी २ वाजता प्रस्थान सोहळा सुरु झाला .सायंकाळी ५ वाजता मुख्य मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता (Pandharpur Palkhi) पालखीचा मुक्काम इनामदार वाडा येथे झाला प्रस्थान सोहळ्याला जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज मोरे , नितीन महाराज मोरे , संस्थानचे विश्वस्त मंडळ, राज्यमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील , श्री हर्षवर्धन पाटील इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती ..
श्री तुकाराम महाराजांचा (Pandharpur Palkhi) पालखी सोहळा महाराजांचे सुपुत्र तपोनिधी नारायण महाराज यांनी अंदाजे १६८५ मध्ये सुरु केलेल्या सोहळ्याचे हे ३३८ वे वर्ष आहे . श्री नारायण महाराज हे श्री तुकाराम महाराजांच्या व श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ऐकाच पालखीत ठेऊन ती पालखी समारंभपूर्वक मोठ्या सोहळ्याने दिंड्या पताका , गरुडटक्के , टाळमृदंगाच्या जयघोषात वारकरी मंडळींसह देहू वरून आळंदी मार्गे पंढरपूरला नेत असत . कालांतराने श्री तुकाराम महाराज व श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा वेगळा सुरु करण्यात आला
या वर्षी (Pandharpur Palkhi) पालखी सोहळा १९ दिवसांचा प्रवास करून हा पालखी सोहळा २९ जून रोजी पंढरपूरमध्ये दाखल होईल. २९ जून ते ३ जुलै रोजी हा पालखी सोहळा पंढरपूर येथे मुक्कामी राहणार आहे . सोहळ्यादरम्यान मंगळवार २० जून रोजी आंथुर्णे येथे पहिले गोल रिंगण व मुक्काम, गुरूवार २२ जून इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण व मुक्काम, शनिवार २४ जून रोजी सकाळी निरा स्नान व दुपारी तिसरे गोल रिंगण रविवार २५ जून रोजी सकाळी माळीनगर येथे पहिले उभे रिंगण सोमवार २६ जून रोजी सकाळी धावा व मंगळवार २७ जून रोजी बाजीराव विहिर येथे उभे रिंगण होईल .
शब्दांकन : संदीप जिवलग कोहळे
अध्यक्ष , विश्व वारकरी सेवा संस्था , नागपूर