- अशोक सराफ
ज्येष्ठ अभिनेता
Sulochana didi सुलोचना दीदींच्या निधनाची बातमी ऐकणे आणि पचवणे ही माझ्यासाठीच नव्हे तर उत्तम अभिनयावर जिवापाड प्रेम करणार्या प्रत्येक रसिकासाठी अत्यंत कठीण बाब आहे. एका शरीराचा अंत ही वाढत्या वयामुळे येणारी नैसर्गिक बाब असली आणि कोणताही सजीव त्यापासून दूर राहू शकत नाही, हे अंतिम सत्य असले तरी काही माणसांनी कायम आपल्यासोबत असावे, या समाजाचा-जगाचा भाग म्हणून राहावे असे वाटत असते. सुलोचना दीदी ही अशीच एक व्यक्ती होती. मराठी आणि हिंदी चित्रसृष्टीमधील त्यांचे योगदान असामान्य आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. खरे सांगायचे तर त्यांच्याबरोबर मी फारसे काम केले नाही. अवघ्या दोन-तीन चित्रपटांमध्ये आम्ही एकत्र काम केले आहे. पण त्या वेळचे अनुभव इतके चांगले होते की, आजही स्मरणात आहेत. मी पहिल्यापासूनच त्यांच्या कामाचा चाहता आहे. त्यांचे काम पाहिले आहे, त्यांचा सकस अभिनय अभ्यासण्याचा आनंद घेतला आहे. त्या माझ्यापेक्षा वयाने, मानाने, अनुभवाने किंबहुना, सर्वार्थानेच खूप मोठ्या... त्यामुळे माझे त्यांच्याबद्दल बोलणे तोकडे पडेल. अत्यंत मृदू स्वभावाच्या Sulochana didi दीदी भेटल्यानंतर नेहमी त्या माझ्या फॅन असल्याचे सांगायच्या तेव्हा किती संकोच वाटत असेल, हे वाचक समजू शकतात. त्यांच्यासाठी मी सगळ्यात आवडता नट होतो. त्यांचे हे मत एका मुलाखतीतही व्यक्त केले होते. त्यांच्या मनात माझ्या प्रतीचा स्नेह प्रत्येक भेटीमध्ये जाणवायचा. अगदी परवा-परवापर्यंत फोनवर आमच्या गप्पा व्हायच्या. पण आता फोनवर मनमोकळ्या गप्पा मारणारी माझी ही अत्यंत आवडती व्यक्ती आणि आवडती अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली आहे. खरे सांगायचे तर, त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे यथोचित शब्दच नाहीत. यापुढे त्यांच्याबरोबर असण्याचा सुखद अनुभव मी गमावणार आहे, हे मात्र नक्की.
Sulochana didi सुलोचनाताईंनी कामाच्या रूपाने चित्रसृष्टीत हिमालयाची उंची गाठलीच; खेरीज मदतीच्या दृष्टीने त्यांनी केलेले कामही नभाच्या उंचीसमानच आहे. प्रसिद्धीपासून दूर राहात त्यांनी असंख्य लोकांना मदत केली. अनेकांच्या अडीअडचणी दूर केल्या. हे लोक त्यांना कधीच विसरू शकणार नाहीत. लोकांना मदत करण्याचा, त्यांची विचारपूस करण्याचा, त्यांच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा दीदींचा स्वभाव उल्लेखनीय आहे, असे मी म्हणेन. त्यांनी माझ्यावर नेहमीच प्रेम केले. त्यांचा स्नेह आयुष्यभर स्मरणात राहील असाच होता. सुलोचना दीदींच्या अभिनयातून काय समजले यापेक्षा त्यांच्याकडून काय मिळाले, ही बाब अधिक महत्त्वाची वाटते. कारण आधी उल्लेख केल्याप्रमाणे त्यांचा अभिनय अत्युच्च कोटीचा होता यात शंकाच नाही, पण अत्यंत साधा, सालस स्वभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून सतत दिसत असे आणि तोच त्यांच्या प्रत्येक भूमिकेतूनही दर्शित होत असे. त्यांनी केलेल्या प्रत्येक भूमिकेतून सहजसुंदर अभिनय कसा असतो, या प्रश्नाचे उत्तर मिळते. त्यांच्या रुपेरी पडद्यावरील प्रसन्न वावरातून याचे प्रत्यंतर बघायला मिळते. म्हणूनच त्यांच्यासारखा सहजसुंदर अभिनय करणारी व्यक्ती अभावानेच आढळते. याच कारणामुळे रसिक प्रेक्षक त्यांना कधीच विसरू शकणार नाहीत.
आधी उल्लेख केल्याप्रमाणे आम्ही दोन-तीन चित्रपटांमध्ये काम केले. पण त्या मोजक्या दिवसांमध्येही त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील, अभिनयातील मोठेपणा मला प्रत्येक क्षणी जाणवत होता. एका चित्रपटात मी एका उनाड मुलाची भूमिका साकारली होती. ‘डोक्याने थोडा सटकलेला’ या स्वरूपाची ती भूमिका होती. दीदी चित्रपटात या मुलाची सालस आई साकारत होत्या. त्या निमित्ताने आमच्यावर चित्रित होणारी दृश्ये धमाल होतीच; पण त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव त्यापेक्षाही धमाल होता. त्यातील एक सुंदर सीन तर मी वारंवार बघत असतो. त्यानंतरही आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो. पण मनात एखाद्याबद्दल प्रचंड आदर असला तर प्रत्यक्ष भेटताना थोडी भीती असते. अर्थातच ती आदरयुक्त भीती असते. या कारणानेच असेल कदाचित, पण मी त्यांच्या घरी गेलो आणि बराच वेळ थांबलो, असे कधी झाले नाही. कधीतरीच प्रत्यक्ष भेट व्हायची. पण माझ्या बहुसंख्य कार्यक्रमांना त्या आवर्जून उपस्थित राहायच्या आणि मोकळेपणाने कौतुक करायच्या. घरी एखादे शुभकार्य वा शुभप्रसंग असला, तरीदेखील त्या फोनवरून आम्हा कुटुंबीयांना शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यायच्या. त्यांची ही बाबही संवेदनशील स्वभावाचे दर्शन घडवून जाण्यास पुरेशी आहे असे वाटते. कारण अशा छोट्या-मोठ्या गोष्टींमधून व्यक्तीचा समाजाकडे, परिचितांकडे बघण्याचा दृष्टिकोन समजतो.
Sulochana didi सुलोचना दीदींच्या निधनानंतर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यातील अनेकांनी ‘आई गमावली...’ असे म्हणत आपले दु:ख व्यक्त केले. ते अगदी खरे आहे असे मला वाटते. त्यांच्या जाण्यामुळे अनेकांना आई गमावल्याची भावनाच अनुभवायला मिळाली. मग त्यात चित्रसृष्टीचाही उपवाद नाही. त्यांचा स्वभाव तुमच्या-आमच्यावर आईसमान प्रेम करण्याचाच होता. त्यात कोणताही दिखावा नव्हता, नाटकीपणा नव्हता. मातृत्व हा त्यांचा स्थायीभाव होता, असेच म्हणायला हवे. म्हणूनच त्यांच्या कुटुंबाने, चित्रसृष्टीनेच नव्हे तर राज्य आणि देशातील लोकांनी त्यांच्यावर अपार प्रेम केले. त्यांच्या जाण्याने आपण असे एक निरलस व्यक्तिमत्त्व गमावले आहे. येत्या पिढ्यांनी सहजसुंदर अभिनय कसा असतो, हे प्रत्यक्ष पाहण्याची संधी गमावली आहे. विधात्याची एक सुंदर निर्मिती त्याने पुन्हा आपल्याकडे नेली आहे. मात्र, आपण कधीच त्यांना विसरू शकणार नाही. दीदींना विनम्र आदरांजली.
मृणाल कुलकर्णी
Sulochana didi दीदीने सगळ्या कलाकारांना आईची माया दिली. प्रत्येकाला कधी ना कधी घरी बोलावून कौतुक केले. सतत त्यांचा आशीर्वाद पाठीशी होता. जग जाणत असताना, संघर्षाला धीराने सामोरे जाताना, अनेक स्थित्यंतरे बघताना अनुभवलेल्या सावल्या प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाच्या स्थानी असतात. दीदींसारख्या गडद सावल्यांनी केलेले कौतुक अनमोल असते. त्यांचे असणे हीच आपल्यासाठी खूप मोठी बाब असते. चित्रसृष्टीत अनेक जण वयोवृद्ध असतात; पण सगळ्यांबद्दल असे वाटत नाही. दीदींबद्दल मात्र हे प्रकर्षाने जाणवते. त्यांचे प्रेम आतून आले होते, त्यात औपचारिकता नव्हती. म्हणूनच त्यांच्या जाण्याने आपण डोईवरची ही सोज्वळ सावली गमावली आहे असे वाटते. गुरुपरंपरेतून शिकत तयार झालेल्या त्या महान अभिनेत्री होत्या. त्यांनी हिंदी चित्रसृष्टीतही मोलाची कामगिरी बजावली. आधी नायिका, नंतर चरित्र अभिनेत्री आणि त्यानंतरची त्यांची दीर्घ काळाची बॅटिंग अचंबित करायला लावणारी आहे. त्यांनी कीर्ती मिळवलीच, पण तेवढ्याच ताकदीने टिकवूनही ठेवली. त्या काही पिढ्यांपुढील आदर्श राहिल्या. कलावंताने वारंवार एक प्रकारच्या भूमिका केल्या की, त्या एकसुरी होण्याचा वा तसा शिक्का लागण्याचा मोठा धोका असतो. मात्र, दीदींच्या कामाला कोणी कधीच असे लेबल लावू शकले नाही. दीदींना माझ्या कामाचे कौतुक होते. कामातील वैविध्याचा उल्लेख करत त्या कायमच प्रेरणा देत राहायच्या. वयानुरूप भूमिका स्वीकारण्याच्या माझ्या निर्णयाचेही त्यांनी स्वागत केले. अशी ही थोर अभिनेत्री आज आपल्यात नसली तरी स्मृतिरूपाने नेहमी आपल्यातच राहतील...
अलका कुबल
Sulochana didi दीदींनी चित्रसृष्टीत एक सुवर्णकाळ गाजवला. भालजी पेंढारकरांचे शिष्यत्व त्यांनी कायमच जपले. मराठीबरोबरच त्यांनी हिंदीतही अत्यंत मानाने भूमिका केल्या. प्रत्येक चित्रपटात त्यांच्या भूमिकांना विशेष महत्त्व बघायला मिळते. माणूस म्हणूनही त्या तेवढ्याच थोर होत्या. मुंबईत आल्यानंतर राहण्याची सोय नसणार्या त्या काळच्या अनेक नवोदितांना त्यांनी आपल्या घरात आसरा दिला. माझे चित्रपट बघून त्या ‘अलका, मी तुझ्यात मला पाहते’ असे म्हणायच्या. खरे सांगायचे तर त्यांच्यासारखी सात्त्विकता, सोज्वळपणा आमच्यात नाही. त्यांची सरही येणे शक्य नाही. पण त्यांनी केलेल्या कौतुकाचे मोल खूप मोठे होते. आज आम्ही ते गमावले आहे.
अनुराधा पौडवाल
ज्यांच्या खांद्यावर पूर्ण मराठी चित्रसृष्टी राहिली अशा पिढीतले एक मोठे नाव म्हणजे सुलोचनाबाई. थोडक्यात, पायाभरणी करणार्यांमधील हे एक मोठे नाव होते. आता आपण वरवरची फुले बघतो. पण ‘फाऊंडेशन स्टोन’ बसवणारे एक व्यक्तिमत्त्व त्यांच्या रूपाने हरपले आहे. अर्थात त्यांची आठवण कायमच राहील. शारीरिक रूपाने गेल्या असल्या, तरी कामाच्या रूपाने त्या कायम आपल्यामध्येच राहतील.