परदेशी पाहुण्यांच्या ओठी ‘ज्ञानोबा-तुकाराम’

जी-20 परिषदेचे प्रतिनिधी वारीत झाले सहभागी

    दिनांक :13-Jun-2023
Total Views |
पुणे,
Pandharpur wari : सध्या देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये विविध विषयांना घेऊन जी-20ची परिषद सुरू आहे. पुण्यातही ‘जी-20 डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगट’ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, त्या निमित्ताने पुणे नगरीत दाखल झालेल्या परदेशी पाहुण्यांनी विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरीला निघालेल्या वारीत सहभागी होऊन ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आणि विठूरायाचा गजर केला. या पाहुण्यांनी महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक परंपरा याची देही याची डोळा अनुभवली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह परदेशी पाहुण्यांनी हातात टाळमृदंग तसेच डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन ठेका धरला.
 
Pandharpur wari
 
संत तुकाराम महाराज पादुका मंदिराजवळ फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वार येथे जी-20 प्रतिनिधींसाठी पालखी सोहळा अनुभवण्यासाठी मंडप उभारण्यात आला होता. चंद्रकांत पाटील यांनी स्वत: उपस्थित राहून परदेशी प्रतिनिधींचे स्वागत केले. ढोल ताशाच्या गजरात आणि तुळशीमाळा, (Pandharpur wari) वारकरी उपरणे, टोपी घालून विदेशी प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले. पालखी रस्त्यावरून दिंड्यांचे आगमन होऊ लागले. हाती भगव्या पताका, महिला वारकर्‍यांच्या डोक्यावर तुळशीची रोपे, कपाळाला टिळा, टाळ, मृदंग, वीणा वादनात, राम कृष्ण हरी, ज्ञानोबा माउली व तुकाराम जयघोषात, अभंग गायनात, फुगडी, नर्तनात दंग वारकरी पाहून प्रतिनिधी वेगळ्याच अनुभवात दंग झाले.
 
Pandharpur wari
 
या वेळी काही प्रतिनिधींनी (Pandharpur wari) वारकर्‍यांकडून कपाळाला टिळा लावून घेतला. एवढेच नाही तर, काहींनी हातात टाळ आणि मृदंग धरून तसेच डोक्यावर तुळशी वृंदावन धरत मुखी ज्ञानोबा-तुकारामाचा गजर केला. काही प्रतिनिधींनी उत्साहाने वारकर्‍यांसोबत फुगडीचा फेर धरला. प्रत्येक पालखीला हात दाखवून तर काहींनी नमस्कार करून अभिवादनही केले. यावेळी, तुकाराम महाराज पालखीचे दर्शन परदेशी पाहुण्यांनी घेतले.