तभा वृत्तसेवा
महागाव,
नीटच्या परीक्षेत (NEET Exam) नेत्रदीपक यश प्राप्त करून वैष्णवी रोहिदास राठोड हिने देशात 230 वे स्थान मिळविले आहे. तर भूमिका अवधूत पानपट्टे हिनेसुद्धा सुयश प्राप्त करून तालुक्याचे नाव देश पातळीवर झळकवले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील पोखरी या माळपठारावरील गावातील वैष्णवी राठोड हिने नीट परीक्षेत 720 पैकी 700 गुण मिळविले आहे. ती तिच्या ओबीसी-एनसीएल या आरक्षण विभागातून 44 वी आलेली आहे.
बारा वर्षांपूर्वी वडिलांचे अपघाती निधन झाल्याने कुटुंबाचा सर्व भार वैष्णवीच्या आईवर आला. कोरडवाहू तीन एकर शेतीत मिळणार्या उत्पन्नावरच सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे. त्यात निसर्गाच्या अवकृपेने होत असलेल्या नापिकीमुळे कुटुंबाची होणारी परवड अशा परिस्थितीवर मात करीत वैष्णवी राठोड हिने जिद्दीने शिक्षण घेऊन यशाला गवसणी घातली आहे. (NEET Exam) ईजनी येथील भूमिका अवधूत पानपट्टे हिने 720 पैकी 623 गुण मिळवून तालुक्याचे नाव देशपातळीवर झळकवले आहे. वैष्णवी व भूमिका यांच्या यशामुळे नीटमधील आजपर्यंत असलेली शहरी विद्यार्थ्यांची मक्तेदारी मोडीत काढून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. वैष्णवी व भूमिका यांच्या यशाबद्दल त्यांच्यावर सर्वच स्तरांवरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.