वारी पंढरीची
चला रे वैष्णवलो जाऊ पंडरीयेसी।
प्रेमामृत खुण मागो त्या विलासी॥
संत सोपानकाका (Saint Sopankaka) हे वारकरी संप्रदायातील एक मोठे संत असून निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई या चार भावंडांपैकी धाकटे बंधू व त्यांच्या मानाच्या पालखी सोहळ्याचे वैभव नक्कीच नवीन उंची गाठत आहे. ज्ञानेश्वर महाराज गोसावी व पंढरपूरचे धोंडोपंत दादा अत्रे यांनी 1904 मध्ये सुरू केलेल्या पालखीचे हे 119 वे वर्ष आहे. ज्येष्ठ कृष्ण द्वादशीला संत निवृत्तिनाथांची पुण्यतिथी असते व त्याच दिवशी सासवडहून सोपानकाकांच्या पालखीचे प्रस्थान होते.
यावर्षी संत सोपानदेव (Saint Sopankaka) यांच्या पालखीचे प्रस्थान 15 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता समाधी मंदिर सासवड येथून होणार आहे. यावर्षी पालखी सोहळा पांगारे, बारामती, अकलूज, भंडीशेगाव, वाखरीमार्गे 14 दिवसांचा प्रवास करीत 28 जून रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. पालखी सोहळ्यात यावर्षी 100 हून अधिक दिंड्या असून एक लाखांहून अधिक वारकरी हे सोहळ्यामध्ये पायी चालणार आहेत. या पालखी सोहळ्यामध्ये 18 जून सोमेश्वर नगर व 20 जून माळेगाव येथे गोल रिंगण, 26 जून भंडीशेगाव व 27 जून वाखरी येथे पादुकांजवळ उभे रिंगण होणार आहे. हा वाढता सोहळा पाहता आता प्रशासनाने माउली संत ज्ञानेश्वर महाराज तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये भाविकांच्या सोयीसाठी ज्या सुविधा प्रशासनामार्फत पुरविल्या जातात त्या सर्व सुविधा जसे फिरती शौचालये, पाण्याचे टँकर, अॅम्ब्युलन्स सेवा, वैद्यकीय डॉक्टर इत्यादी सुविधा प्रशासनामार्फत आता सोपानकाका पालखी सोहळ्यात पुरविल्या जाणार आहेत.
सासवड येथील समाधी मंदिरामध्ये झालेल्या जीर्णोद्धाराच्या कामाची प्रगतीसुद्धा उल्लेखनीय आहे. नवीन रूपातील मंदिर हे सर्वांना आकर्षित करीत आहे. नव्याने उभारलेले संत मुक्ताबाई मंदिर आणि श्री दत्त मंदिर ही भाविकभक्तांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. (Saint Sopankaka)सोपानकाका मंदिरातील झालेला कायापालट हा चर्चेचा विषय बनला आहे. लवकरच मंदिर परिसरामध्ये अन्नछत्र, गोशाळा आणि वारकरी शिक्षण संस्था सुरू होत आहेत.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा संत सोपानकाका (Saint Sopankaka) सहकारी बँक आणि आमदार संजय जगताप यांचे माध्यमातून आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. श्रींचा चांदीचा पालखी रथ आणि चांदीच्या पालखीची सजावट संस्थानद्वारे रोजची रोज केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी संस्थानचे विश्वस्त मंडळ साधारण जानेवारी 2023 पासून काम करीत आहे. यंदा स्वच्छता हा मुद्दा संस्थानचे विश्वस्त मंडळ या सोहळ्यामध्ये प्रामु‘याने दिंड्यांमधून राबविण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष त्रिगुण महाराज गोसावी यांनी दिली.
संदीप जिवलग कोहळे
अध्यक्ष, विश्व वारकरी सेवा संस्था, नागपूर