- बाळू मुंगले
वडनेर,
आजकाल निसर्ग लहरी बनल्याने ऋतुचक्र (Rainfall) उलटे फिरू लागले आहे. मृग नक्षत्र सुरू होऊन आठ दिवस लोटले तरीही मृगधरा बरसण्यास तयार नाही. काळ्या आईला हिरवा शालू नेसवण्यासाठी रणरणत्या उन्हात घामाच्या धारा झेलित सर्व ‘ओक्के’ करून ठेवले. पण, वरूणराजा रुसल्याने बळीराजाचे स्वप्न होरपळून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी, तहानलेल्या आसुसलेल्या डोळ्यात जीवनाचा मेघ दाटून येत आहे.
मान्सून वेळेवर येणार, मृग नक्षत्र बरसणार, आद्रा झोडपणार अशा Rainfall पावसाच्या बातम्या ऐकून सुखावलेल्या शेतकर्यांची आभाळात ढग भरून येतानाही पाऊस गळत नसल्याने चक्क झोपच उडाली आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही विदर्भातील शेतकर्यांना हवामान खाते आणि अभ्यासकांच्या अंदाजाचा शॉक बसल्याचे दिसून येते. हिंगणघाट तालुक्यात सिंचनाची वाणवा असल्याने बहुतांश शेतकरी निसर्गाच्या पावसावर अवलंबून आहे. यंदा उन्हाळ्यात जणू पावसाळा अनुभवायास मिळाला आहे. ऋतुचक्र कूस बदलत असल्याने त्याचा मोठा फटका शेती व्यवसायाला बसतो आहे. तालुक्यातील शेतकर्यांनी पूर्व पावसाळी कामे आटोपून खरिपाची तयारी केली आहे. रोहिणी नक्षत्र कोरडेच गेले आता मृग नक्षत्र सुरू होऊन आठवडा उलटला तरी पावसाचा थांगपत्ता नाही. अवेळी धिंगाणा घालणार्या पावसाने शेतकर्यांचे नियोजन बिघडते आहे. पावसाळ्याच्या पहिल्याच चरणात पाऊस रुसल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. मृगसरी कधी बरसणार याकडे शेतकर्यांच्या नजरा लागून आहेत.
पड रे पाण्या, पड रे पाण्या, कर पाणी पाणी...
शेत माझं लई तहानलं चातका वाणी...
बघ नांगरलं नांगरलं, कूळवून वज केली, सुगरणबाई पाभरीला शेतावर नेली...
गेल्या 40 वर्षांपूर्वी गायक प्रल्हाद शिंदे यांच्या जादुई आवाजाने अजरामर लोकगीताच्या या गाण्यांच्या ओळीतील मांडलेला शब्द न शब्द शेतकर्यांच्या मनातील आर्जव तितक्याच ताकदीने हृदयाचा ठाव घेतात. शेती हाच ज्यांच्या उपजीविकेचे साधन आणि निसर्गातून कोसळणारी Rainfall जलधारा हेच ज्यांच्या शेतीचा आधार आहे. अशा शेतकर्यांचे पावसाची असलेले नाते किती हळव्या संबंधाने घट्ट विणलेले आहे, याची प्रचिती हे गाणे ऐकताना येते. शेत शिवारातील लगबगीतून शेतकर्यांची निसर्गाकडून होत असलेली अपेक्षाच यानिमित्ताने दिसून येत आहे. त्यामुळे काळ्या आईची सेवा करणार्या बळीराजाला पावसाची आस लागून राहिली आहे.