नागपूर,
‘व्हर्टिकल टर्मरिक फार्मिंग’च्या (Vertical Turmeric Farming) नावाखाली तब्बल 3.67 कोटींनी फसवणूक केल्याप्रकरणी ए.एस. अॅग्री अँड अॅक्वा एलएलपी कंपनीच्या पदाधिकार्यांसह चार आरोपींविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकुंज शशीकांत दोशी (रा. फार्मलँड, रामदासपेठ) असे फिर्यादीचे नाव आहे. या कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळत असल्याची माहिती फिर्यादीना मिळाली. आरोपी प्रशांत झाडे (सॅलेसबरी सोसायटी, अंबरनाथ, ठाणे), भाटु ठाकरे, संदेश खामकर (ठाणे) व हिरेन पटेल यांनी निकुंज दोेशींना विविध योजनांची माहिती देत कंपनीच्या प्रगतीचे व्हिडीओ व फोटोग्राफ दाखविले.
गुंतवणुकीनंतर कंपनी गुंतवणुकदारांच्या जागेवर पॉली हाऊस बांधेल, (Vertical Turmeric Farming) तांत्रिक मदत करणार्या व्यक्तींची राहण्याची सोय, स्टोअरेज रूम, दोन गार्डचे पगार वगळुन बियाणे, माती, पाणी व तांत्रिक मदत करणारी व्यक्ती कंपनीकडून पुरविली जाईल. शेतकर्यांच्या फायद्यासाठी योजना असल्याचे सांगितले. वर्षाला 100 टक्के परतावा 12 वर्षे मिळणार होता. गुंतवणुकदारास 16 गुंठ्यात हा प्रकल्प उभारायचा असून 1 कोटी 8 लाख रु. खर्च येणार येईल. त्यापैकी फिर्यादीला 40 लाख रु. गुंतवावे लागणार होते. शिल्लक रक्कम कंपनी गुंतवेल. फिर्यादीने 40 लाख रु. गुंतविले. फिर्यादी व ए.एस. अॅग्री अँड अॅक्वा एलएलपी कंपनीचे पदाधिकारी संदेश खामकर यांच्यामध्ये (Vertical Turmeric Farming) काँट्रॅक्ट फार्मिंग अॅग्रिमेंट करण्यात आले. त्यात फिर्यादीने पैसे गुंतविल्याच्या तारखेपासून 15 व्या महिन्यात 40 लाख रु. मिळणार असून त्यातील 4 लाख प्रशासकीय, कार्यान्वयनसाठी वजा करून 36 लाख रु. प्रति वर्ष 12 वर्षांसाठी परतावा खात्यात जमा होेतील, असे नमुद होते.
फिर्यादीने त्यांच्या नावावरील शेतीच्या 16 गुंठ्यामध्ये मे2022 रोजी पॉली हाऊस उभारले. त्यामध्ये पाणी, वीज, सुरक्षा, रस्ता, मजुरांची घरे, कार्यालय या सुविधा फिर्यादीनेच पुरविल्या, 5 लाख रु.खर्च केले. कंपनीच्या पदाधिकार्यांनी ठेवी आणि इतर कुठलेच लाभ न देता 3 कोटी 67 लाख रुपयांनी फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे.