आरमोरी,
Maize purchase आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत मका पिकाची शासनाने खरेदी सुरू केली आहे. परंतु खरेदीसाठी निर्धारित केलेले उद्दीष्ट संपल्याने अनेक नोंदणी केलेल्या शेतकर्यांकडे मका पिक शिल्लक राहुन त्यांना शासकीय खरेदी योजनेपासून वंचित राहावे लागुन त्यांच्यावर कवडीमोल दराने मका खुल्या बाजारात विकण्याची नामुष्की ओढवली असल्याची बाब आमदार कृष्णा गजबे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी मुंबई येथे मंत्रालयात अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव सतिश सुपे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन देत शेतकर्यांची कैफियत त्यांच्या लक्षात आणून दिली आणि आधारभूत किंमत धान्य खरेदी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील मका खरेदीच्या उद्दिष्टात वाढ करण्याची मागणी केली.

आरमोरी मतदार संघासह Maize purchase संपूर्ण गडचिरोली जिल्हा आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त असुन जिल्ह्यात कोणतेही उद्योग-व्यवसाय नसल्याने जिल्ह्यातील नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. जिल्ह्यात मुख्यत्वे धान पिकाची लागवड केली जाते. परंतु उत्पादन खर्च भरून निघत नसल्याने जिल्ह्यातील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड केली आहे. परंतु खरेदीसाठी निर्धारित केलेले उद्दीष्ट संपल्याने शेतकर्यांना शासकीय खरेदीपासून वंचित राहावे लागेल. त्यामुळे उद्दीष्टात वाढ करण्याची मागणी आमदार गजबे यांनी केली. त्यानंतर सह सचिव सुपे यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत लागलीच आपल्या अधिनस्त अधिकार्यांना सुचना देत गडचिरोली जिल्ह्यातील मका खरेदी उद्दिष्टात वाढ करण्याची ग्वाही दिली. यामुळे आमदार कृष्णा गजबे यांच्या पाठपुराव्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.