‘महासम्राट शिवराय’ : अक्षय चंदेल यांचे ओजस्वी व्याख्यान

    दिनांक :20-Jun-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
यवतमाळ येथील भावे मंगल कार्यालयात भारतीय विचार मंच व शिवशंभू विचार दर्शन यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकणारे ‘महासम्राट शिवराय’ या विषयावर व्याख्यान रविवार, 18 जूनला पार पडले. अमरावतीचे सुप्रसिद्ध तरुण वक्ते (Akshay Chandel) अक्षय चंदेल यांनी आपल्या ओघवत्या शैलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील विविध प्रसंगांचे वर्णन केले. शिवराज्याभिषेकाला यावर्षी 350 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने महाराष्ट्रात ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
 
Akshay Chandel
 
त्याच मालिकेतील हिंदू साम्राज्य दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवी व बालरोगतज्ञ डॉ. स्वप्नील मानकर, स्काय इंटरनॅशनल स्कूलचे संचालक यश डांगे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक विलास देशमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक‘माची सुरुवात दीपप्रज्वलन व माल्यार्पणाने झाली. सुरुवातीला ‘शककर्त्यांचा मेरुमणी तू, राजर्षीचा राजा युगंधराचा योगी अन तू, सामर्थ्याचा सर्जा..’ हे गीत मेघा डाऊ व दत्ता देशपांडे आणि संचाची संगीतयोजना असलेले गीत बालकलाकारांनी सादर केले.
 
 
प्रमुख वक्ते (Akshay Chandel) अक्षय चंदेल यांनी शिवचरित्रातील अनेक प्रसंगाचे वर्णन केले. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र, शिवरायांचा जन्म आणि बालपण, हिंदवी स्वराज्याची प्रेरणा, राजमाता जिजाऊंची शिकवण, स्वराज्यावरील संकटे, अफजलखानाचा वध, शिवराज्याभिषेक, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग या विषयांवर त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन केले. त्यांच्या ओजस्वी वाणीने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले होते.
 
 
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. स्वप्निल मानकर यांनी मनोगतातून शिवाजी महाराजांचे चरित्र व कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन करून या कार्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे सांगितले. प्रास्ताविक भारतीय विचार मंचचे जिल्हा संयोजक मिलिंद देशकर यांनी, तर संचालन महेंद्र गुल्हाने यांनी केले. आभारप्रदर्शन शिवशंभू विचार दर्शनचे जिल्हा संयोजक तुषार कठाळे यांनी केले. शेवटी शिवरायांच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. या (Akshay Chandel) कार्यक्रमाला यवतमाळ शहरातील गणमान्य व्यक्ती, प्रतिष्ठित नागरिक, महाविद्यालयीन तरुण यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.