रुक्मिणी आईसाहेबांची विदर्भाची माहेरची पालखी

    दिनांक :21-Jun-2023
Total Views |
वारी पंढरीची
Rukmini Aisaheb Palkhi : आषाढी एकादशी जशी जवळ येते तशी वारकर्‍यांची भूवैकुंठ पंढरपूरला जाण्यासाठी वारीची लगबग सुरू होते. वारकरी निरनिराळ्या संतांच्या दिंडीत (पालखीत) सहभागी होतात. यात सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आहे ती श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानची श्री क्षेत्र कौंडण्यपूर (विदर्भ) येथील श्री क्षेत्र कौंडण्यपूर ते श्री क्षेत्र पंढरपूरची श्री रुक्मिणी मातेची माहेरची पालखी. विदर्भातील श्री क्षेत्र कौंडण्यपूरला हजारो वर्षांचा इतिहास आहे. श्री क्षेत्र कौंडण्यपूर हे विदर्भातील अतिपुरातन तीर्थक्षेत्र असून विदर्भराज भीमक राजाची राजधानी होय. माता रुक्मिणी मातेचे माहेर आहे तसेच प्रभू रामचंद्रांची आजी राजा दशरथाची आई इंदुमती, अगस्ती पत्नी लोपामुद्रा, भगीरथ राजाची माता केशिनी व नल राजाची राणी दमयंती या पाच सतींचेसुद्धा माहेर आहे. महाभारतकालीन या पुरातन तीर्थक्षेत्रात (Rukmini Aisaheb Palkhi) श्री रुक्मिणी मातेचे जन्मस्थानी पुरातन मंदिर आहे व त्यापासून एक किमी अंतरावर श्री अंबामातेचे पुरातन मंदिर असून याच मंदिरातून श्रीकृष्ण भगवंताने रुक्मिणी मातेचे हरण केले होते. श्रीमद् भागवतात याचा उल्लेख आहे.

Rukmini Aisaheb Palkhi 
 
श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थान श्री क्षेत्र कौंडण्यपूरचे विद्यमान सचिव तथा पालखी सोहळा प्रमुख सदानंद महाराज साधू यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे जवळपास 450 वर्षांपूर्वी श्री संत सद्गुरू सदाराम महाराज होऊन गेले. श्री सदाराम महाराजांनी श्री क्षेत्र कौंडण्यपूर ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी पायदळ वारी 1594 साली सुरू केली; ती परंपरा आजतागायत सुरू असून वारीचे हे 429 वे वर्ष आहे. आईसाहेब (Rukmini Aisaheb Palkhi) श्री रुक्मिणी मातेच्या माहेराहून निघालेली ही माहेरची पालखी महाराष्ट्रातील पहिली पालखी आहे. वृद्धापकाळामुळे श्री संत सद्गुरू सदाराम महाराजांना वारी करणे शक्य झाले नाही, त्यावेळी पांडुरंगाचा धावा केला असता श्री भगवान पांडुरंगाने स्वतः श्री संत सदाराम महाराजांना दर्शन देऊन मी दरवर्षी आषाढी व कार्तिक पौर्णिमा व प्रतिपदेला श्री क्षेत्र कौंडण्यपूरला येईल, असे वचन दिले. तीच परंपरा आजतागायत सुरू आहे. यावर्षी पालखीचे प्रस्थान 23 मे 2023 रोजी श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथून संस्थानचे अध्यक्ष नामदेवराव अमाळकर, सचिव तथा सोहळा प्रमुख सदानंद साधू, पालखी प्रमुख सुरेश चौहान, विश्वस्तांच्या व हजारो वारकर्‍यांच्या उपस्थितीत झाले.
 
Rukmini Aisaheb Palkhi
 
33 दिवसांच्या दीर्घ प्रवासानंतर दररोज अंदाजे 15-20 किलोमीटर प्रवास करून अमरावती, वाशीम, परभणी, बीड, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांतून प्रवास करून जवळपास 250-300 वारकर्‍यांसह 24 जूनला माढा मुक्कामी रिंगण सोहळा झाल्यानंतर पालखी पंढरपुरात प्रवेश करणार आहे. 24 जून ते 2 जुलैपर्यंत पालखीचा मुक्काम पंढरपूरला असून 3 जुलैला काला करून परतीचा प्रवास सुरू होणार आहे. 4 जुलै रोजी प्रतिपदेला श्री क्षेत्र कौंडण्यपूरला हजारो वारकर्‍यांच्या उपस्थितीत कीर्तन आणि दहीहंडी उत्सवाने यात्रेची सांगता होणार आहे.
 
 
निवडक मानाच्या नऊ पालख्यांमध्ये (Rukmini Aisaheb Palkhi) श्री रुक्मिणी मातेची पालखी असून पंढरपूरला रुक्मिणी मातेच्या पालखीला विशेष मान असतो. श्री रुक्मिणी मातेला पंढरपूर संस्थानकडून अहेर करतात व तसेच दशमी ते पौर्णिमेपर्यंत श्री विठ्ठलाला कौंडण्यपूर संस्थानचा नैवेद्य असतो. गेली 429 वर्षांपासून पालखीची ही परंपरा जोपासली जात आहे. कोरोना काळातही सतत दोन वर्षे शासनाने निवडक 40 वारकर्‍यांसोबत विशेष बंदोबस्तात पालखीची व्यवस्था केली होती; त्यावेळी संस्थानचे पदाधिकारी यांनी पालखीसोबत विदर्भातील प्रमुख दिंडीमधील एक वारकरी सोबत घेऊन सर्वव्यापक परिचय दिला. त्यामुळे कोरोना काळातही 429 वर्षांची परंपरा खंडित झाली नाही.
 
 
एवढा ऐतिहासिक वारसा लाभलेली व (Rukmini Aisaheb Palkhi) पालखी सोहळ्याचा उगम असलेली पालखी अनेक वर्षे दुर्लक्षित होती. आता मात्र शासनाने संस्थानला तीर्थक्षेत्र ब दर्जा दिला असून संस्थाननेदेखील अनेक सार्वजनिक उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. भक्तांचा आषाढी व कार्तिकीला ओघ वाढत आहे व श्री क्षेत्र कौंडण्यपूर हे रुक्मिणी मातेचे माहेर लवकरच गत वैभवाला व नावारूपाला येईल आणि अखंडपणे पालखीची सोहळ्याची परंपरा उत्साहात वाढत जाईल व वृद्धिंगत होईल, यात शंका नाही.
 
 
- संदीप जिवलग कोहळे
अध्यक्ष, विश्व वारकरी सेवा संस्था, नागपूर