वारी पंढरीची
Pandharpur Wari : पंढरपूरच्या वारी सोहळ्यात घोड्याच्या रिंगणाची परंपरा आहे. त्यात उभे रिंगण व गोल रिंगण असे दोन प्रकार आहेत. मंगळवार, 20 जून रोजी श्री माउलींच्या पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण पार पडले व श्री तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यादरम्यान आंथुर्णे येथे पहिले गोल रिंगण पार पडले. हजारो वर्षांपासून चालत निघणार्या वारीचे रूपांतर जेव्हा पालखी सोहळ्यात झाले, तेव्हापासून रिंगणाची परंपरा सुरू झाली. श्री तुकोबारायांचे पुत्र तपोनिधी श्री नारायण महाराजांनी जेव्हा पालखी सोहळा सुरू केला तेव्हा देहूवरून पालखी आळंदीला जाऊन तिथून पंढरपूरला जात असे. पुढे काही कारणाने हैबतबाबांनी आळंदीचा पालखी सोहळा वेगळा सुरू केला. हे हैबतबाबा शिंदे सरदारांच्या सैन्यात होते. या सोहळ्याला सरदार शितोळे व ग्वाल्हेरच्या शिंदेंनी मदत केली. (Pandharpur Wari) श्री ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यास पूर्वी हत्ती, घोडे वगैरे लवाजमा श्रीमंत राजेसाहेब (औंध) यांच्याकडून येत असे. त्यामुळे पालखी सोहळ्यात सैन्याशी साम्य दाखवणार्या गोष्टी, मैदानी खेळ, रिंगण यांसार‘या पद्धती सुरू झाल्या.
रिंगण म्हणजे म्हणजे पालखीभोवती गोल फिरणे. पालखी सोहळा वाटचाल करीत रिंगणाच्या ठिकाणी पोहोचतो, तेव्हा आधी चोपदार रिंगण लावतात. यामध्ये मध्यभागी (Pandharpur Wari) पालखी, पालखीच्या सभोवती पताकाधारी वारकरी व दिंड्या, त्याभोवती रिंगणासाठी मोकळी जागा व पुन्हा त्याभोवती दिंड्या व रिंगण बघायला आलेले वारकरी उभे राहतात. चोपदारांचे कौशल्य व वारकर्यांची शिस्त याठिकाणी दिसून येते.
रिंगणामध्ये मोकळ्या ठेवलेल्या मार्गावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, हातात पताका घेतलेले वारकरी व वीणेकरी हे स्वतंत्ररीत्या पळतात. तरुण वारकरी मंडळी मैदानी खेळ करतात. रिंगणाचे मुख्य आकर्षण असते अश्वांची दौड. (Pandharpur Wari) पालखी सोहळ्यात एक अथवा दोन अश्व सहभागी असतात. एका अश्वावर जरीपटका घेतलेला स्वार असतो तर एक अश्व रिकामा असतो. रिकाम्या अश्वावर संत बसतात, अशी भाविकांची श्रद्धा असते. चोपदार अश्वाला रिंगणाचा मार्ग फिरून दाखवतात. त्यात अश्व मोकळा सोडतात. अश्व रिंगणाला तीन फेर्या मारतात. यावेळेस भाविक ‘माउली माउली’ असा गजर करतात. अश्वाची दौड हा रिंगणाचा कळस असतो. उभे रिंगण हा रिंगणाचा दुसरा प्रकार आहे. यात दिंड्या वर्तुळाकार उभ्या न राहता, पालखीच्या दोन्ही बाजूने समोरासमोर उभ्या राहतात व यामधून अश्व दौडतो. दोन्हीही रिंगणात आलेला पाऊस वारकर्यांचा आनंद द्विगुणीत करीत असतो. टाळ-मृदंगाच्या एकाच तालात आणि एकाच लयीत पावल्या करीत वारकरी नाचत असतात. रिंगण संपते आणि रिंगणाच्या परिघातच हमामा, फुगडी, हुतूतू, आट्यापाट्या हे मैदानी खेळ टाळ-मृदुंगाच्या गजरात सुरू होतात.
टाळ-मृदुंगाचा वेग, जयजयकार आणि वायुवेगाने धावणारे अश्व हे सारे दृश्य विलोभनीय असतेच. (Pandharpur Wari) महत्त्वाचे म्हणजे हे सर्व लष्कराच्या छावणीला व शिस्तीला शोभणारेही असते. पालखी तळावरचा मुक्काम पाहता, मध्यभागी देवाचा तंबू, बाजूने इतरांचे तंबू, मध्यभागी समाज आरतीची जागा, याची रचनाच लष्करी छावणीसारखी वाटते. पालखी सोहळ्यातील घोड्यांचे रिंगण व मैदानी खेळ हे सैन्याशी साम्य दाखवणार्या गोष्टी आहेत, असे नक्की जाणवते.
श्री माउलींच्या पालखी (Pandharpur Wari) सोहळ्यात पुढे 24 जून रोजी पुरंदरवडे येथे पहिले गोल रिंगण, 25 जून रोजी खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण, 26 जून रोजी ठाकूर बुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण, 27 जून रोजी बाजीरावची विहीर येथे दुसरे उभे रिंगण व गोल रिंगण, 28 जून रोजी पादुकाजवळ आरती व तिसरे उभे रिंगण होईल.
श्री तुकोबारायांच्या पालखी (Pandharpur Wari) सोहळ्यात 22 जून रोजी इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण, 24 जून रोजी सकाळी नीरा स्नान व दुपारी तिसरे गोल रिंगण, 25 जून रोजी सकाळी माळीनगर येथे पहिले उभे रिंगण, 26 जून रोजी सकाळी धावा व 27 जून रोजी बाजीराव विहीर येथे उभे रिंगण होईल.
- संदीप जिवलग कोहळे
अध्यक्ष, विश्व वारकरी सेवा संस्था, नागपूर