वारी पंढरीची
पुंडलीकपेठ वैष्णवाचा हाट । करिती बोभाट हरिनामाचा 1
वाळलें अंबर अमृततुषार । झेलीत अमर चकोर झाले 2
देव मुनी सर्व ब्रह्मादिक लाठे । पंढरीये पेठे प्रेमपिसे 3
निवृत्ति निर्वाळिला ज्ञानदेव सोपान । खेचर तल्लीन वीनटला 4
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज (Nivrittinath Maharaj) यांचा हा सुपरिचित असा अभंग. संत निवृत्तीनाथ म्हणतात पुंडलिक सर्व संतांच्या मेळाव्यात पंढरीच्या पेठेत हरिनामाचा गजर करत आहेत चंद्राने केलेल्या अमृत वर्षावा मुळे जसे चकोर पक्षी अमर होतात तसे आकाशातुन ब्रह्म भक्तांवर अमृत वर्षाव करते. ब्रह्मादिक, ऋषी, मुनी पंढरी तील भक्तीचा गजर ऐकुन पीसे होतात. भक्तीपीसे त्यांना लागते. निवृत्तिनाथ म्हणतात त्यांच्या सकट ज्ञानेश्वर सोपान विसोबा खेचर भक्तीने विठ्ठल रुपात लीन झाले आहे .
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज (Nivrittinath Maharaj) हे ज्ञानेश्वर महाराजांचे वडिलबंधू. निवृत्ती- ज्ञानदेव- सोपान- मुक्ताबाई या चारही भावंडाचा जीवनक्रम मानवी जीवनांच्या उध्दारांच्या टप्यांमध्ये करता येतो. निवृत्ती- ज्ञान-सोपान- मुक्ती ही अध्यात्मिक पूर्णतेची एकेक पायरी आहे. जीवनांचे ध्येय जर मुक्ती असेल तर पहिला टप्पा निवृत्ती असते. निवृत्तीनाथ महाराज हे माऊलींचे अलौकिक जीवनांतील पाठिराखे होते. तसेच, अध्यात्मिक जीवनांतील सुध्दा पाठिराखे होते.
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा । तुझी चरण सेवा पांडुरंगा
वारीची ही परंपरा (Nivrittinath Maharaj) निवृत्तिनाथांच्या पूर्वीपासूनही चालू होती. त्यांचे वडील विठ्ठलपंत पंढरीचे वारकरी होते. ते निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई या चारही मुलांना पंढरीच्या वारीला घेवून गेले. आज संत निवृत्तीनाथांची पालखी काढण्याची परंपरा बेलापूरकर घराण्याकडे आहे. भानुदास महाराज बेलापूरकर ,वामन महाराज गोसावी व शिवराम महाराज कोनांबेकर यांनी इ.स. 1837 साली संत निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा सुरु केला . यंदा पालखी सोहळ्याचे 186 वे वर्ष आहे
या वर्षी पालखीचे प्रस्थान श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून 2 जून रोजी झाले . 28 दिवसांचा पायी प्रवास करून 28 जून रोजी पालखी पंढरपुरात दाखल होईल, त्यानंतर परतीचा प्रवास 3 जुलै रोजी सुरु होऊन 20 जुलै रोजी पालखीचे त्र्यंबकेश्वर येथे आगमन होईल. म्हणजेच पालखीचा प्रवास कालावधी जाऊन-येऊन मिळून 45 दिवसांचा आहे. दरवर्षी चतुर्दशीच्या दिवशी होणारे प्रस्थान यंदा त्रयोदशीला म्हणजे एक दिवस अगोदर करण्यात आले. (Nivrittinath Maharaj) दरम्यान पालखी प्रस्थान झाल्यानंतर यंदा पहिल्यांदाच त्र्यंबकेश्वरी मुक्काम असून त्यानंतर सातपूर, नाशिक, पळसे, लोणारवाडी, खंबाळे, पारेगाव, गोगलगाव, राजुरी, बेलापूर, राहुरी, डोंगरगन, अहमदनगर, साकत, घोगरगाव मिरजगाव, चिंचोली (काळदाते) कर्जत, कोरेगाव, रावगाव, जेऊर, कँदर, दगडी अकोले, करकँब, पांढरीवाडी, चिंचोली, पंढरपूर असा पायी दिंडीचा मार्ग असणार आहे. पालखीचा पहिला मुक्काम महानिर्वाणी आखाडा येथे झाला व 7 जून रोजी दरवर्षींप्रमाणे सिन्नर तालुक्यातील दातली येथे पहिला रिंगण सोहळा पार पडला .
यावर्षी पालखी सोहळ्यात जवळपास 42 दिंडी सहभागी झालेल्या आहेत . त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायी अंतर जवळपास चारशे किलोमीटरहून अधिक आहे. दिंडीतील वारकरी मंडळी रोज दिवसा वीस किलोमीटर पायी प्रवास करणार आहेत .
- शब्दांकन : संदीप जिवलग कोहळे
अध्यक्ष , विश्व वारकरी सेवा संस्था , नागपूर