ग्रामदैवत श्री राजराजेश्वर मंदिरात वस्त्रसंहिता

25 Jun 2023 14:06:06
अकोला,
Shri Rajarajeshwar temple मंदिरांमध्ये धार्मिक पावित्र्य जपले जावे या हेतूने वस्त्रसंहिता अर्थात ‘ड्रेस कोड’बाबतचा सूचना फलक महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यापूर्वीच लागला आहे. शहरातील जुने शहर स्थित श्री विठ्ठल-रुखमाई मंदिर संस्थान यांनी 15 दिवसांपूर्वी तर ग्रामदैवत श्री राजराजेश्वर मंदिरात शनिवार, 24 जून रोजी वस्त्रसंहितेबाबत फलक लागला. त्यामुळे आता अकोल्यातही मंदिरात जाताना वस्त्रसंहितेचे पालन करावे लागणार आहे. तोकडे, पाश्चात्य, अशोभनीय व उत्तेजक वेशभूषा करून मंदिरांमध्ये प्रवेश करण्याहून अनेकदा वादंग निर्माण झाले आहेत. धार्मिक पावित्र्य जपले जावे या हेतूने मंदिरात जाताना हिंदू संस्कृतीला अनुसरून वेशभूषा असावी या हेतूने शहरातील ग्रामदैवत श्री राजराजेश्वर मंदिरात विनंती फलक लागला आहे. या फलकावर ‘अकोल्याचे आराध्यदैवत श्री राजराजेश्वर मंदिरात प्रवेश करताना सर्व भक्तांनी हिंदू संस्कृतीस अनुसरून वेशभूषा परिधान करावी. भक्तांनी अशोभनीय, असभ्य, उत्तेजक व अंगप्रदर्शन करणारे वेशभूषा करून मंदिरात प्रवेश करू नये, ही नम्र विनंती.’ असा फलक लागला असून ही विनंती श्री राजराजेश्वर संस्थानच्या विश्वस्त मंडळाने केली आहे.
 
 
sd 43557
 
जुने शहरातील श्री विठ्ठल-रुखमाई संस्थान यांनीही असाच फलक 15 दिवसांपूर्वी लावला असून त्यात ‘अंगप्रदर्शन, उत्तेजक, असभ्य, अशोभनीय व तोकडे वस्त्र तसेच असात्विक वेशभूषा करून मंदिरात प्रवेश करू नये. Shri Rajarajeshwar temple  भारतीय संस्कृतीचे पालन करून सात्विक वेशभूषेतच दर्शन घ्यावे’, असा फलक लावला असून भक्तांनी या नियमांचे पालन करून मंदिर व्यवस्थापनास सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे. या दोन्ही मंदिरात लागलेल्या फलकानंतर शहरात मंदिरांसाठी वस्त्रसंहिता अर्थात ‘ड्रेस कोड’ लागू झाला असून अनेक भाविकांनी या सूचनांचे स्वागत केले आहे. ग्रामदैवत श्री राजराजेश्वर मंदिरात वस्त्रसंहितेच्या फलकानंतर शहरातील इतर मंदिरातही वस्त्रसंहिता लवकरच लागू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Powered By Sangraha 9.0