तभा वृत्तसेवा
पुसद,
वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत नगर परिषदेला निधी वितरित करण्यात आल्याप्रमाणे सन 2023-24 साठी पुसद नगर परिषद अंतर्गत विविध कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला. त्यामध्ये तलाव लेआऊट येथे पुसद नगर परिषदेने पुसद पत्रकार संघ रनं 1909 ला काही वर्षांपूर्वी भूखंड दिला होता. (Sudhakarrao Naik Bhavan) सुधाकरराव नाईक पत्रकार भवन उभारण्याचा पत्रकार संघाचा संकल्प होता.
शिवसेना जिल्हाप्रमुख अॅड. उमाकांत पापीनवार यांच्या मध्यस्थीने व खासदार भावना गवळी यांच्या शिफारशीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुसद पत्रकार संघाने बांधकामासाठी निधी देण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे 19 जून 2023 रोजी येथील पुसद पत्रकार संघ रनं 9909 ला सुधाकरराव नाईक पत्रकार भवन बांधकामासाठी 10 लाखांचा निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंजूर करण्यात आला.
निधी मंजूर झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. भावना गवळी व यवतमाळ जिल्हा संपर्कप्रमुख अॅड. उमाकांत पापीनवार, पुसद पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल चेंडकाले यांनी आभार मानले. या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत प्रकल्प खर्चाचा 100 टक्के हिस्सा राज्य शासनाचा राहणार आहे. त्यामुळे या प्रकल्पांतर्गत निश्चित करण्यात आलेल्या कामांना एकत्रित प्रकल्प खर्चाच्या सक्षम प्राधिकार्यांची तांत्रिक मान्यता प्राप्त झाली असल्याची खातरजमा संबंधित जिल्हाधिकारी यांनी करून घेणे गरजेचे आहे. (Sudhakarrao Naik Bhavan) सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे बांधकाम करण्यात येणार आहे.