तभा वृत्तसेवा
अमरावती/कुर्हा,
आषाढी एकादशीनिमित्त गुरूवारी (Kaundanyapur mandir) श्री क्षेत्र कौंडण्यपूरसह जिल्ह्यातल्या प्रत्येक विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात भाविकांची दर्शनसाठी गर्दी उसळली होती. दर्शन घेण्यासाठी पहाटेपासून लागलेल्या भक्तांच्या रांगा रात्री उशिरापर्यंत कायम होत्या आणि सर्वत्र जय हरी विठ्ठलाचा गजर सुरूच होता.
जगत जननी आई रूक्मिणी मातेचे माहेर घर असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर Kaundanyapur mandir येथे आषाढी एकादशीनिमित्त भक्तांनी एकच गर्दी केली होती. ज्याप्रमाणे आषाढीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरला यात्रा असते, त्याच प्रमाणे श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे आषाढी एकादशीला यात्रा असते. गुरूवारी सकाळी मंदिरामध्ये श्री विठ्ठल - रूक्मिणी मातेचा महाअभिषेक महापूजा व महाआरती संस्थानचे सहसचिव सत्यनारायण चांडक व परिवार यांच्याहस्ते करण्यात आली. फराळाचा महाप्रसाद वितरीत करण्यात आला. यावेळी मंदिरात विविध महिला भजनी मंडळ यांचे भजन कीर्तन झाले. आषाढी एकादशीला महाराष्ट्र मधूनच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुध्दा मोठ्या प्रमाणात भाविक श्री क्षेत्र कौंडण्यपूरात दाखल झाले होते. अनेक भक्तांनी मंदिराजवळूनच वाहणार्या वर्धा नदीत स्नान करून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. कौंडण्यपूर ते पंढरपूर दिंडी पालखी 3 जुलै म्हणजे गुरूपौर्णिमेला परतीच्या प्रवासाला निघणार आहे. 4 जुलैला कौंडण्यपूरला सकाळी पालखी दखल होईल आणि दुपारी 4 वा. काल्याचे किर्तन व दहिहंडी कार्यक्रम होणार आहे.
जिल्ह्यातल्या अन्य मंदिरांमध्ये उत्सव
अमरावती शहरासह जिल्ह्यात अन्य Kaundanyapur mandir विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची सकाळपासूनच गर्दी होती. सर्वच मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रसाद म्हणून फराळाचे वितरणही करण्यात आले. सर्वत्र उत्साह व चैतन्यमय वातावरण होते.