तभा वृत्तसेवा
भंडारा,
Bhandara Medical College : स्थानिक वैद्यकीय महाविद्यालयातून डॉक्टर्स तयार व्हावेत व नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधांचा लाभ मिळावा या दृष्टीने खासदार सुनील मेंढे यांनी केलेल्या पाठपुराव्याचे चिज झालेले असून भंडारा येथे वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग प्रशस्त झाला आहे. दोन दिवसांपुर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य शासनाने या महाविद्यालयाला मान्यता दिल्याने भंडारा जिल्हावासीयांचे वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न आता साकार होणार आहे.

भंडारा जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय व्हावे अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. वेगवेगळ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधीनी केवळ आश्वासने देण्याची खानापुरती केली. मात्र खासदार म्हणून जबाबदारी आल्यानंतर सुनील मेंढे यांनी सातत्याने हा विषय शासन दरबारी लावून धरला. कोरोना काळात वैद्यकीय महाविद्यालयाची गरज प्रकर्षाने जाणवली. लोकांची मागणी आणि कोरोना काळात वैद्यकीय महाविद्यालयाची जाणवलेली निकड लक्षात घेता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना भंडारा येथे वैद्यकीय महाविद्यालयाची गरज पटवून देण्यात आली. यासाठी खासदार सुनील मेंढे यांनी सातत्याने पत्रव्यवहार आणि भेटीगाठी घेतल्या. संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही हा विषय त्यांनी प्रश्नाच्या माध्यमातून उपस्थित केला होता. राज्य शासनाचा प्रस्ताव आल्यास आम्ही त्याला मान्यता देऊ असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.मनसुख मंडाविया यांनी उत्तरादाखल सांगितले होते. (Bhandara Medical College)
दरम्यान नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील नऊ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली असून त्यात भंडारा जिल्ह्याच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे. या मान्यतेमुळे आता महाविद्यालयाच्या निर्माणाचा मार्ग मोकळा झाला आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्हा प्रशासन स्तरावरून जवळपास जागा निश्चित झाली असून मौजा पलाडी येथील सरकारी मालकीची भूमापन क्रमांक 118 मधील 27.15 हेक्टर पैकी 22 हेक्टर जागा वैद्यकीय महाविद्यालयासाठी आहे. या जागेच्या अनुषंगाने असलेल्या काही अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने 23 जून रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, नगर रचनाकार यांची बैठक घेतल्याचे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले. जागेच्या हस्तांतरणासंदर्भात विभागीय स्तरावर शिल्लक असलेली कामे पूर्ण होऊन लवकरच हा विषय मार्गी लागेल असे सांगून राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असल्याने आता महाविद्यालयाचा मार्ग प्रशस्त झाला असल्याची प्रतिक्रिया खासदार सुनील मेढे यांनी दिली. आरोग्याची उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होईल असे सांगताना त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारचे आभार मानले. (Bhandara Medical College)