- मंजिरी ढेरे
ज्येष्ठ अभ्यासक
एखाद्या दिवसाचे साजरीकरण हा त्या-त्या विषयाप्रती जनजागृती करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण भाग असला, तरी काही विषय मुळातच एका दिवसाच्या जागृतीने समजण्यासारखे नसतात. चर्चेची आवश्यकता आणि गांभीर्य लक्षात घेता असे विषय सतत, दररोज चर्चेत आणणे आणि त्याप्रती सजगता, भान निर्माण करणे गरजेचे असते. या पृष्ठभूमीवर दरवर्षी 5 जून रोजी साजर्या होणार्या पर्यावरण दिनाकडे पाहणे गरजेचे आहे. पर्यावरण हा केवळ मानवाशीच नव्हे, तर प्रत्येक सजीवाच्या अस्तित्वाशी संबंधित विषय असून याचा ढासळणारा स्तर थेट पृथ्वीच्या स्थितीवर आघात करणारा आहे. Environmental protection पर्यावरणविषयक प्रश्न दिसामाजी अधिकाधिक कठीण आणि क्लिष्ट होत आहेत. एकीकडे विकासाची दालने विस्तारत असताना त्या चिमटीत गुदमरणारे पर्यावरण अनेक समस्यांना जन्म देत आहे. जगण्यासाठी, सजीवांच्या अस्तित्व रक्षणासाठी विकास हवा, जीवनशैली हवी की निसर्गावर आधारित जीवन हवे, हा प्रश्न उच्च स्वरात विचारला जात आहे. म्हणूनच यंदा केवळ निमित्तमात्रे पर्यावरण दिन साजरा न करता यावर पोटतिडिकीने आणि अव्याहत काम करणारी स्वयंसेवकांची मोठी फळी उभी राहणे गरजेचे आहे. पर्यावरण रक्षण म्हणजे केवळ दोन-चार झाडे लावणे, पर्यावरणाचे जतन करण्याचा निश्चय करणे आणि गाजावाजा करीत दिवस पार पाडणे नसून हे एक आयुष्यभर पाळले जावे असे व्रत आहे. या दिवशी प्रत्येकाने हे व्रत घेण्याची गरज आहे.
वाढते शहरीकरण हा बदलत्या काळाचा परिणाम असून टाळता येणार नाही हे खरे. मात्र, आज निसर्गातील अनेक घटक याच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. दुसरीकडे जीवनावर जीवनशैली आरूढ होत असल्यामुळे पर्यावरणविषयक प्रश्नांचे गांभीर्य वाढत आहे. सध्या सुशोभीकरणाच्या नावाखाली होणारा दिव्यांचा झगमगाट आपण पाहत आहोत. हजारो वाहनांच्या नित्याच्या प्रवासामुळे वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विकास कामांना वेग देताना कित्येक टेकड्या, डोंगर, शेते, कुरणे, प्राणी वा पक्ष्यांचे Environmental protection नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. शहरांना आलेला फुगवटा आजूबाजूच्या जैवविविधतेचा गळा घोटत आहे. कार्बनचे उत्सर्जन पराकोटीला पोहोचले आहे. केवळ हवेचेच नव्हे, तर सर्व प्रकारचे प्रदूषण मानवी अस्तित्वाच्या मुळावर उठल्यासारखी स्थिती आहे. अर्थातच विनाशकारी घटकांची आणि घटनांची ही यादी कितीही वाढू शकते. पण यातून काही मार्ग काढून चुकांची पुनरावृत्ती टाळणे आणि निसर्गाची अधिक हानी न होऊ देता पर्यावरणाचे रक्षण करण्याचा निश्चय होणे गरजेचे आहे.
मुळातच पर्यावरण रक्षणाचे उद्दिष्ट लोकसहभागातून साधले जायला हवे. लोकांच्या उत्स्फूर्त सहभागातून साकारलेली चळवळ खर्या अर्थाने परिणामकारक ठरते, असे वेळोवेळी दिसून आले आहे. वैयक्तिक पातळीवरही पर्यावरण रक्षणाचे प्रयत्न होताना दिसतात. अनेक जण प्लॅस्टिक हद्दपार करीत आहेत. महानगरांमधले घुसमटणारे नदी, नाले, तलाव स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. बरीच तरुण मंडळी या कामी पुढाकार घेत आहेत. मात्र, हे प्रयत्न वाढविण्याची आवश्यकता आहे. वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाला निर्माण होत असलेला धोका ही निश्चितच गंभीर बाब आहे. सद्यस्थितीत वायू प्रदूषण आणि जल प्रदूषण या दोन्हीतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेषत: जल प्रदूषणामुळे अनेक नद्या-नाले, तळी, विहिरी यांचे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही.अनेक नद्यांची अवस्था गटारांपेक्षा वाईट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी विस्तीर्ण नद्यांचे रूपांतर नाल्यात झाले आहे. नदीपात्रात टाकली जाणारी घाण, केरकचरा यामुळे पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहे. त्याचबरोबर या पाण्यात असणार्या जीव-जंतूंचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. अशा पाण्याचे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम हा आणखी गंभीर आणि चिंतेचा विषय आहे.
खरे तर नैसर्गिक समृद्धीत बारमाही वाहणार्या नद्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. Environmental protection शिवाय आपल्या संस्कृतीतही नद्यांना पूजनीय मानण्यात आले आहे. परंतु याच नद्यांनी आता बकाल रूप धारण केले आहे आणि याला आपणच जबाबदार आहोत. त्यामुळे नद्यांना पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी आपणच मनापासून आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे ठरणार आहे. अर्थात, सध्या नद्यांच्या शुद्धीकरणाची मोहीम हाती घेतली जात आहे. परंतु त्यात जलशुद्धीकरणाऐवजी नद्यांच्या काठांवर प्रशस्त घाट बांधण्यावर, नदीचा परिसर व्यावसायिकदृष्ट्या विकसित करण्यावर भर दिला जात आहे. शिवाय या मोहिमेत लोकसहभाग किती असतो याचाही विचार करणे गरजेचे ठरणार आहे. आज देश वेगाने विकासाकडे वाटचाल करीत आहे. औद्योगीकरण आणि शहरीकरणही मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र, या सगळ्यात नद्यांचा, नैसर्गिक पाणवठ्यांचा श्वास गुदमरत आहे. इथल्या नद्यांमध्ये, तलावांमध्ये, समुद्रामध्ये सोडल्या जाणार्या रसायनमिश्रित पाण्यामुळे जलप्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. यामुळे 70 टक्के पाणी वापरण्यायोग्य राहिलेले नाही. दर दिवशी जवळपास 40 दशलक्ष लिटर रसायनयुक्त पाणी नदी तसेच तलावांमध्ये सोडले जात असल्यामुळे पिण्यायोग्य पाणी दूषित होऊ लागले आहे. आरोग्यावरच नाही तर अर्थव्यवस्थेच्या वाढीवरही या सगळ्याचा परिणाम होत असतो. म्हणूनच जलप्रदूषण रोखण्यासाठी शक्य ते प्रयत्न होणे आवश्यक आहे. अर्थात ग्रामीण, तालुका किंवा शहर पातळीवर असे प्रयत्न होताना दिसतात.
Environmental protection या पृष्ठभूमीवर पुण्याजवळील सांगरूण गावातल्या नागरिकांच्या प्रयत्नांचे उदाहरण देता येईल. जलप्रदूषणात प्लॅस्टिकमुळे होणार्या प्रदूषणाचा भाग मोठा असतो. मात्र, अलीकडे नदीपात्रात, ओढ्यांमध्ये प्लॅस्टिकचा कचरा सरसकट टाकला जात आहे. एवढेच नाही, तर समुद्रकिनारीही प्लॅस्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणावर टाकला जात असल्याचे पाहायला मिळते. हा कचरा समुद्राच्या पाण्यात मिसळतो. त्याचे प्रमाण एवढे मोठे आहे की, चारपैकी एका माश्याच्या पोटात प्लॅस्टिक सापडू लागले आहे. यावरून पाण्यात टाकल्या जाणार्या प्लॅस्टिकच्या कचर्याची समस्या किती गंभीर आहे, याची कल्पना येते. हे लक्षात घेऊन सांगरूण गावातील नागरिकांनी प्लॅस्टिकचा कचरा वेगळा जमा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे या भागातल्या नद्या प्लॅस्टिकच्या कचर्यापासून मुक्त झाल्या. पुणे शहराजवळ खडकवासला धरणाला लागून हे गाव आहे. हे गाव मुठा, आंबी तसेच मोसी नदीच्या संगमावर वसले आहे. या नदीत टाकला जाणारा प्लॅस्टिकचा कचरा वाहून खडकवासला धरणात जात होता आणि त्यामुळे पाणी प्रदूषित होत होते. हे प्रदूषण रोखण्यासाठी गावाने पुढाकार घेतला. याला जनजागृती न म्हणता ‘श्रमजागृती’ म्हणणे अधिक श्रेयस्कर ठरेल. कारण गावकर्यांनी स्वत:च्या श्रमातून हा कायापालट घडवून आणला. आता ही प्लॅस्टिकच्या कचरामुक्तीची चळवळ विविध शहरांमधल्या घराघरांत राबविली जाण्याची आवश्यकता आहे.
सद्यस्थितीत घराघरात कचर्यासाठी द्विकुंडीय पद्धत वापरली जाते. म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा स्वतंत्रपणे साठवला जातो. त्याऐवजी आता त्रिकुंडीय पद्धत अंमलात आणण्याची आवश्यकता आहे. म्हणजे ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे साठवतानाच प्लॅस्टिकचा कचराही वेगळा साठवला जायला हवा. अर्थात, हे प्लॅस्टिक स्वच्छ असेल तर ते प्रक्रियेसाठी विकत घेण्यास कंपन्या तयार असतात. प्लॅस्टिकचे सहजासहजी विघटन होत नसल्यामुळे त्यापासून होणारे प्रदूषण अधिक घातक ठरते. उदाहरण द्यायचे तर बिसलेरीच्या बाटलीचे झाकण 700 वर्षे टिकते तर बाटलीचा उर्वरित भाग 300 वर्षे तसाच राहतो. देशात दररोज वापरल्या जाणार्या बिसलेरीच्या बाटल्यांची संख्या विचारात घेता त्यामुळे किती मोठ्या प्रमाणावर कचरा तयार होत असेल आणि त्यापासून प्रदूषणाचा धोका किती प्रमाणात वाढू शकतो, याची कल्पना करता येऊ शकते.
नद्यांच्या पुनरुज्जीवन प्रकल्पांचे आदर्श उदाहरण म्हणून थेम्स (इंग्लंड), र्हाईन (जर्मनी) आणि हडसन (न्यूयॉर्क) या नद्यांचा उल्लेख केला जातो. या तीन नद्या पूर्णपणे प्रदूषणमुक्त झाल्या असून त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता लाभली आहे. 30 ते 50 वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर या नद्यांमधल्या विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण आठ पीपीएमवर आल्यामुळे पूर्वीचे वैभव प्राप्त करून देणे शक्य झाले. ही मानसिकता किंवा असे प्रयत्न आपल्याकडे किती प्रमाणात दिसतात, हा खरा प्रश्न आहे. त्यातही असे प्रयत्न फक्त वैयक्तिक पातळीवर न राहता सामाजिक पातळीवर राबविणेही आवश्यक आहे. Environmental protection लोकसहभागातून बरेच काही साध्य होऊ शकते, या वचनावर विश्वास ठेवून आपण प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणे गरजेचे आहे. अन्यथा, येणारा काळ आपला असेल की नाही, ही भीती वाटते.