- डॉ. साधना कुलकर्णी
सकाळ झाली. डोळे उघडले. हातपाय ताणून आळस दिला आणि प्रात:र्विधीसाठी उशीखालचा Mobile style मोबाईल हातात घेतला. दचकलात ना? पण तरुण पिढी नाही दचकणार. कॉलेजमध्ये एकदा निरोगी जीवनशैलीविषयी बोलत असताना ‘प्रात:र्विधी’ हा शब्द ऐकल्यावर सगळ्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात प्रश्नचिन्ह उमटलं.
‘सकाळी उठल्याबरोबर काय करायचं असतं?’ मी सोप्या शब्दात विचारलं.
‘उठल्याबरोबर आधी आम्ही मोबाईल बघतो मॅम...’ डोक्यावर केसांचा उभा तुरा असलेल्या एका मुलाने उत्तर दिलं. तुरा कसला, त्याच्या ताठ उभ्या केसांनी बाथरूम घासता येईल का, हा भलताच विचार माझ्या डोक्यात आला. डोक्याच्या वरच्या भागात ब्रशसारखे उभे केस आणि खालच्या भागात नाममात्र हिरवळ असणार्या या मुलाला ‘प्रात:र्विधी’ हा शब्द उच्चारण्यासाठी दुसरा जन्म घ्यावा लागेल, ही खात्री पटली आणि मी विषय आवरता घेतला.
असो. तर थोडक्यात काय की, हल्ली पूर्वीच्या व्याख्या... चुकलं, कॉन्सेप्ट बदलत चालल्यात. ‘प्रात:र्विधी’ म्हणजे सकाळी डोळे उघडल्याबरोबर ‘कराग्रे वसते लक्ष्मी’सारखं ‘प्रभाते मोबाईल दर्शनम्’ अशी प्रथा रूढ झाली आहे. शिवाय तरुण पिढी तर ‘आमच्या पिढीने (साठीच्या) काळाच्या बरोबर चालायला हवं...’ अशी पिंक आमच्यावर येता-जाता टाकून मोकळी होत असते. तात्पर्य हेच की, मी पण प्रात:र्विधीसाठी Mobile style मोबाईल उघडला. वाढदिवस, लग्न वाढदिवस, निधन वार्ता, गुड मॉर्निंग, सुविचार, विनोद, देवदर्शन, रेसिपीज, कविता, लेख, प्रवचन...
अबब, Mobile style मोबाईल ओसंडून वाहत होता. या सगळ्यांना उत्तर देणे, हा कार्यक्रम हल्ली जीवनावश्यक कृतींमध्ये मोडत असल्याने खर्याखुर्या प्रात:र्विधीची वाट लागणार नाही तर दुसरं काय होणार? या व्हॉट्स अॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम नामक अक्राळविक्राळ राक्षसाने घराघरांत प्रवेश केल्यापासून माणसाचं आयुष्यच बदललंय. अन्न, वस्त्र, निवारा यापेक्षाही मोबाईलच्या गरजेला प्राधान्य दिले जातेय. या मोबाईलमुळे माणसांच्या मेंदूमध्ये बदल व्हायला लागले आहेत. उत्क्रांतीनंतर माणसाचे शेपूट गळून पडले तसेच या तांत्रिक युगात मेंदूमधले बुद्धी आणि विवेकाचे केंद्र गळून त्या जागी मेंढरांच्या मेंदूतील केंद्र निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे की काय, असे मला नेहमी वाटते.
हल्ली माणसांचे भलतेच समूह निर्माण झाले आहेत. एक समूह आहे तो अंगठे बहाद्दरांचा. कोणीही, कोणतीही, कसलीही पोस्ट टाका यांचा अंगठा कायम तयार असतो. बरेचदा पोस्टमध्ये वाचनीय मजकूर असतो; तो वाचायला किमान पाच मिनिटे लागणार असतात. पण या अंगठेबहाद्दरांच्या दिव्यदृष्टीची कमाल.. पोस्ट टाकल्यावर अर्ध्या सेकंदात यांचा अंगठा आलाच पाहिजे. या अंगठ्यामागचे मानसशास्त्र नक्की काय असेल, हे शोधायचा मी खूप प्रयत्न करतेय; पण अजूनही त्यात यश आलेले नाही. हा अंगठेबहाद्दर समूह एखाद्या ‘अंगठेबाबा’चा भक्त संप्रदाय तर नसेल ना? बाबांनी अंगठे टाकायचा आदेश दिला असावा; त्यामुळे हे भक्तगण जपमाळेप्रमाणे दररोज किमान 108 अंगठे देत असतील, अशी मला दाट शंका येते. किंवा, दुसरी शक्यता म्हणजे हे अंगठेबहाद्दर नक्कीच पगारी असावेत. जितके अंगठे तितकी कमाई.
दुसरा समूह खरे तर आजारी असतो. डॉक्टर असल्यामुळे मला ठामपणे हे विधान करण्याचा अधिकार नक्कीच आहे. या समूहाला ‘फोटोरिया’ हा आजार झालेला असतो. जसा डायरिया असतो ना तसा ‘फोटोरिया’ बरं का... हा समूह कोणत्याही प्रसंगाचे किलोभर तरी फोटो टाकतोच आणि यांच्या स्टेटसवर पावभर फोटो असतातच. असं वाटतं की, फोटोसाठी हे ट्रीपला जातात, फोटोसाठी पूजा घालतात, फोटोसाठी सणवार साजरे करतात, फोटोसाठी नाचतात- गातात. घरी केलेली रेसिपी पोटाऐवजी आधी फोटोत जाते. अंगठेबहाद्दरांपेक्षा या समूहाची परिस्थिती गंभीर असते. अंगठेबहाद्दर तसे निरुपद्रवी असतात, पण फोटोरिया झालेला समूह गेल्या जन्माचा सूड उगवतात असं म्हणतात. ‘फोटोरिया’ झालेल्यांना रोज फोटो टाकल्याशिवाय झोप येत नाही. या फोटोंचेच बहीण-भाऊ म्हणजे रिल्स आणि व्हिडीओ. या फोटोरिया समूहाला रिल्स आणि व्हिडीओची लागण होते तेव्हा त्यांची केस हाताबाहेर जाते. फोटोरिया समूहाकडे बघून मला पुलंच्या ‘हसवणूक’मधल्या ‘माझा शत्रुपक्ष’ या लेखाची नेहमीच आठवण येते.
तिसरा समूह जरा अध्यात्ममार्गी असतो. त्यांचा वयोगट साधारणतः साठीच्या पुढचा असतो. ही मंडळी फेसबुक, व्हॉट्स अॅपला पूर्णपणे शरण गेलेली असते. Mobile style ‘उरलो उपकारापुरता’प्रमाणे ‘उरलो फॉरवर्डपुरता’ अशी त्यांची जीवनातली भूमिका असते. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र या मंडळींचं ‘अहर्निशम् सेवामहे’ तत्त्वानुसार आलेल्या कोणत्याही, कशाही पोस्ट फॉरवर्ड करणे हे परमकर्तव्य असते आणि हे परमकर्तव्य ते कुठेही म्हणजे दुकानात, भाजी बाजारात, सिनेमा बघताना, अगदी व्यासपीठावर असतानाही बजावत असतात. ‘सुखदुःखे समे कृत्वा, लाभालाभौ जयाजयौ’ ही गीतेत सांगितलेली स्थितप्रज्ञाची लक्षणे त्यांच्या ठायी असतात.
भुलाबाईचे गाणे असते ना, ‘एक लिंब झेलू बाई, दोन लिंब झेलू...’ या चालीवर ‘एक फॉरवर्ड करू बाई, दोन फॉरवर्ड करू, दोन फॉरवर्ड करू बाई तीन फॉरवर्ड करू...’ असं आजच्या काळातलं गाणेही या समूहाने जन्माला घातलेय, असे ऐकिवात आहे.
चौथा समूह प्रसिद्धीला हपापलेला असतो. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे- ‘घटम् भिंद्यात पटम् भिंद्यात कुर्यात रासभरोहणात, येनकेनप्रकारेण प्रसिद्धं पुरुषो भवेत.’
एखादे वैशिष्ट्यपूर्ण काम केल्यानंतर प्रसिद्धी मिळविणे हे नैसर्गिक आहे. पण मडके फोडून, कपडे फाडून, प्रसंगी गाढवावर बसून अर्थातच काहीही करून प्रसिद्धी मिळविणारा समूह हा खरोखरच पुलंच्या ‘हसवणूक’मधला शत्रुपक्ष असतो. जगण्यातल्या सामान्य दैनंदिन गोष्टी समाजमाध्यमावर टाकून ‘फोमो’ची स्वतःचीच लढाई लढत असतो.
या समाजमाध्यमाच्या आहारी गेलेले बरेच विक्षिप्त, नादावलेले समूह आज निर्माण झालेले दिसतात. खरे तर या समाजमाध्यमाद्वारे कितीतरी चांगली रचनात्मक, सकारात्मक, महत्त्वाची कामे होत असतात आणि अशी समाजोपयोगी कामे करणारे समूहसुद्धा भरपूर आहेत. कोणत्याही प्रसिद्धीशिवाय, गाजावाजा न करता ही कामे सुरू असतात. पण आजचा समाज हा मेंढरांचा कळप झाला आहे. इतर जसे वागतात तसेच आपण वागायचे हे एक चुकीचे मानक प्रस्थापित होत आहे, जे फार गंभीर आहे. आजच्या आत्मकेंद्रित आणि Mobile style मोबाईलवर पडीक व्यक्तीला सतत इतरांकडून कौतुक, इतरांकडून मान्यता, लाईक्स.. यांची सारखी गरज असते. सतत पोस्ट वाचून इतरांशी तुलना करण्याची सवय हल्ली वाढत चालली आहे. हे लोक स्वतःविषयीचे मत इतरांच्या नजरेतून ठरवतात. त्यामुळे आपण चांगले कसे ठरू यासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरू असते आणि म्हणूनच असे समूह तयार होतात. सदोदित काहीतरी ‘पोस्टायला’ हवे, ही मनोवृत्ती वाढत चालली आहे. जिंकलेल्यास टाळ्या पाहिजे, हरलेल्याला खांदा पाहिजे, लिहिणार्याला कॉमेंट पाहिजे, कवितेला दाद पाहिजे, फोटोंना इमोजी पाहिजे, विनोदाला स्मायली पाहिजे, वाढदिवसाला जीबीयु-एचबीडी पाहिजे आणि मेल्यावर आरआयपी पाहिजे.
मार्क्सवादी एरिक फ्रॉम म्हणतो, ‘जगताना एक मोठा पर्याय आपल्यासमोर असतो तो म्हणजे, टू हॅव ऑर टू बी. मॅन इज द वन हू इज मच, नॉट द वन हू हॅज मच.’
आम्ही सुशिक्षित, जाणते असून ‘टू हॅव’च्या मायाजालात इतके गुरफटत चाललोय की, त्यामुळे मेंदूत निर्माण होणार्या डोपॅमाईनची चटक लागली आहे. ही एक प्रकारची नशा असते. या नशेत असताना वास्तवात अराजकता आहे, अतिमहत्त्वाचे प्रश्न आहेत, भावना भडकताहेत, लहान मुलांवर विपरीत संस्कार होताहेत... याकडे आपले लक्षच जात नाही. आपण आपल्या आभासी आटपाट नगरात सुखाने नांदतो आणि आनंदात गातो...
सासू म्हणते,
‘माझ्या फोटोला लाईक
कर गं सुने कर गं सुने
मग जा अपुल्या माहेरा, माहेरा.
सून म्हणते,
चार चार ईमोजी टाकल्या हो सासूबाई,
टाकल्या हो सासूबाई
आता तरी जाऊ द्या माहेरा, माहेरा.