मुंबई,
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीसाठी अमूल्य योगदान दिलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर (Sulochana Latkar) यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. दादर येथील सुश्रुषा रुग्णालयामध्ये उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सोमवारी ५ जून सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत प्रभादेवी येथील घरी सुलोचना दीदी यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी पाच वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत सुलोचना दीदी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाच्या माध्यमातून आई, बहिण अशा सहजसुंदर नात्यांतील ममत्वभाव जिवंत करणाऱ्या सुलोचना दीदींच्या जाण्याने चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सांस्कृतिक महाराष्ट्राचा सालस चेहरा असलेल्या सुलोचना दीदींच्या पश्चात मुलगी, नात, नातजावई असा मोठा आप्तपरिवार आहे.