हिंदू साम्राज्य दिवस

    दिनांक :05-Jun-2023
Total Views |
- अमोल पुसदकर
 
 
डिसेंबर 1293 ला (Hindu samrajya Day) महाराष्ट्रावर पहिले इस्लामी आक्रमण झाले. आक्रमक होता अल्लाउद्दीन खिलजी. याने अमरावतीजवळील अचलपुरावर ज्याचे जुने नाव एलिचपूर होते त्यावर हल्ला केला. एलिचपुरावर हल्ला यशस्वी झाला. त्यानंतर त्याने आपला मोर्चा महाराष्ट्राची राजधानी देवगिरीकडे वळविला. देवगिरी म्हणजे आजचे छत्रपती संभाजी नगर. देवगिरीचा राजा रामदेवराय युद्धसज्ज नव्हता. त्यामुळे त्याचा पराभव झाला. देवगिरीवर पहिल्यांदा इस्लामी निशाण फडकले. शंकर देवराय जो रामदेवरायाचा मुलगा होता व राज्याचा सेनापती होता त्याने अल्लाउद्दीन खलजीशी संघर्ष करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर काही वर्षांनी शंकर देवरायाने देवगिरीला स्वतंत्र केले. काही वर्षे देवगिरी स्वतंत्र राहिली. त्यानंतर शंकर देवराय मारला गेल्यावर देवगिरी पुन्हा परतंत्र झाली. देवगिरीला स्वतंत्र करण्याचा प्रयास रामदेवरायाचा जावई हरपाल देवराय यांनी केला. काही काळानंतर त्याचा तो प्रयासही समाप्त झाला. महाराष्ट्रावर कायमचे इस्लामी निशाण फडकले. हे वर्ष होते 1319.

Hindu samrajya Day
 
दक्षिणेमध्ये एकेकाळी वैभवशाली असलेले विजयनगरचे (Hindu samrajya Day) साम्राज्य लयास गेलेले होते. उत्तरेमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचे राज्यही समाप्त झालेले होते. अधिकांश भारतामध्ये सर्वत्र मोगलाई दिसत होती. महाराष्ट्रात आणि आसपास वेगवेगळ्या पद्धतीच्या बादशाह्या होत्या. विजापूरचा आदिलशहा, गोवळकोंडाचा कुतुबशहा, कर्नाटकमध्ये बीदर आहे. तिथला बेरीदशहा, अहमदनगरचा निजामशाह आणि अचलपूरचा एमादशहा अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या बादशाह्या त्यावेळेस राज्य करीत होत्या. त्यांना लढण्याकरिता माणसे लागत होती. आमचे मराठी लोक या बादशहांकडे सरदार म्हणून काम करीत होते, सैनिक म्हणून काम करीत होते. शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले हे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. युद्ध कोणत्याही बादशाहीमध्ये चालो विजय बादशहाचा होणार व मराठी मारले जाणार, ही शोकांतिका होती. माणसं मरत होती, पण बादशहासाठी ही त्यावेळची परिस्थिती होती. प्रजा हिंदू होती. त्यांचे धार्मिक अधिकार बंधनामध्ये होते. प्रजेची इज्जत सुरक्षित नव्हती. बादशहांचे जनान खाने सुंदर हिंदू स्त्रियांनी भरलेले होते. गुलामांचे बाजार भरत होते. त्यात महिला, पुरुष, लहान मुले गुलाम म्हणून विकली जात होती. खरेदी केली जात होती. हिंदूंना कोणी वाली नव्हता. हिंदूंना कोणी राजा नव्हता. हिंदूंचे कोणते राज्य नव्हते.
 
 
अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा (Hindu samrajya Day) उदय झाला. त्या प्रचंड प्रतिकूल काळात खेड्यापाड्यातील शेतकर्‍यांच्या पोरांना मावळ्यांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. बादशाही फौजांच्या भीतीने गावे ओसाड झालेली होती. बादशहाकडून पुण्यावर गाढवाचा नांगर फिरविला गेला होता. कोणीही यावे आणि कोणाच्याही शेतातील माल उचलून घेऊन जावा, अशा पद्धतीची परिस्थिती होती. अशा काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पळून गेलेल्या लोकांना पुन्हा एकदा पुण्यामध्ये परत बोलावले. त्यांना शेतजमिनी दिल्या. जमीन कसण्यासाठी गुरेढोरे दिली. बी-बियाणे दिले. जमिनीचा पोत आणि उत्पन्नावर आधारित कर पद्धती निश्चित केली. कमी पाण्याच्या भागांमध्ये केवळ पिके न घेता फळ देणारी बाग लावली पाहिजे, हे त्यांनी जनतेला पटवून दिले. रांझे गावच्या पाटलाने कुठल्या तरी महिलेसोबत आगळीक केली म्हणून त्याचे हातपाय छाटून त्याला दंड दिला. ही बातमी वार्‍यासारखी बारा मावळच्या प्रदेशात पसरली. सर्वसामान्य माणसांनी शिवाजीला आशीर्वाद द्यायला सुरुवात केली.
 
 
शिवाजीच्या पाठीमागे उभे राहण्यास सुरुवात केली. ही (Hindu samrajya Day) जनतेच्या मनातील शिवराज्याभिषेकाची मुहूर्तमेढ होती. स्वराज्यावर एकामागून एक बादशाही फौजांची आक‘मणे झाली. फत्तेखान, अफजलखान, शाहिस्तेखान, सिद्धी जोहर, मिर्झाराजे जयसिंग असे मातब्बर सरदार स्वराज्यावर चालून आले. परंतु महाराजांनी आपल्या हिमतीच्या जोरावर या सर्वांचा सामना केला. त्यांना कधी जय मिळाला, कधी पराजय झाला. तरीही त्यांच्या मनातील हिंदवी स्वराज्याची भावना कमी झाली नाही. संपूर्ण जनता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे उभी राहिली. त्यांनी वतनदारी पद्धत रद्द केली. सैनिकांना पगार देणे सुरू केले. नेताजी पालकर जो मुसलमान झाला होता त्याला हिंदू धर्मात परत आणले. उत्तम प्रतीच्या तोफा व तलवारी तयार करण्याचे कारखाने सुरू केले. सागरी सीमा सुरक्षित करण्यासाठी नौदल उभे केले. त्या काळात सर्वत्र रूढ असलेले फारसी, उर्दू शब्द राजव्यवहारातून काढून टाकले व राजभाषा कशाची निर्मिती केली.
 
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी राजा व्हावे ही साधू-संतांची इच्छा होती. ही इथल्या गोरगरीब जनतेची इच्छा होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेणे स्वीकारले. आजपर्यंत भारतामध्ये अनेक राजे झाले, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना जनतेने ईश्वराचा अंश मानले म्हणूनच (Hindu samrajya Day) शिवराज्याभिषेक हा हिंदू साम्राज्य दिवस आहे. ही इतिहासातील एक अनोखी मोठी घटना होती. ही घटना ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 6 जून 1674 रोजी घडली. या घटनेला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. मुघलांच्या दडपशाहीला उत्तर देणारा न्याय कुशल राजा आमच्या महाराष्ट्रात होऊन गेला; ज्याने संपूर्ण देशाला प्रेरणा दिली, ही आमच्याकरिता निश्चितच अभिमानाची व साजरी करण्याची गोष्ट आहे.