वाशिममध्ये फ्लेमिंगोसह दुर्मिळ पक्ष्यांची रेलचेल...बघा फोटो

पक्षी निरीक्षक व अभ्यासकांसाठी पर्वणी !

    दिनांक :05-Jun-2023
Total Views |
वाशीम, ५ जून
flamingos in Washim गुजरात राज्यातील कच्छच्या रणामधुन दक्षिण किनारपट्टीकडे स्थलांतरीत होत असताना फ्लेमिंगो पक्ष्यांचा वाशीम जिल्ह्यातील एकबुर्जी जलाशय हा महत्त्वाचा थांबा आहे. यावर्षी मार्च एप्रिल या महिन्यात दक्षिणेकडे मार्गक्रमण करतांना फ्लेमिंगो पक्षी वातावरणातील व जलाशयातील पाणी पातळीच्या बदलामुळे एकबुर्जी जलाशयावर विसावा घेतांना आढळले नाहीत. मात्र, दक्षिणेकडून पश्चिम किनारपट्टीकडे परतत असताना फ्लेमिंगो हे पक्षी एकबुर्जी जलाशयावर आढळल्याने पक्षीमित्र व अभ्यासकांकडून आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. वाशीम पासून १० किमी अंतरावर असलेल्या एकबुर्जी धरण प्रकल्पात वर्षभर पाणी राहत असल्याने येथे ग्रेटर प्लेमिंगो सह १७० प्रकारच्या स्थानिक आणि विदेशी पक्ष्यांचे आगमण होत असते.
 
 
flemingo
 
त्यामध्ये ग्रेटर फ्लेमिंगोसह अपट्टकादंब, काळा करकोचा, तरंग बदक, मळकट बदक, खापट्या बदक, तलवार बदक, चक्ररांग, लालसरी बदक, शेंडी बदक, दलदली भोवत्या, सर्पगरूड, पाणलावा, सामान्य टिलवा, चक्रवाक, सामान्य तुतारी, दलदली तुतारी, हिरवी तुतारी, ठिपकेदार तुतारी, छोटा टिलवा, शेकट्या, मोठा करनानक, छोटा अर्ली, पलासचा कुरव, कल्लेदार सुरथ, कुरव चोचीचा सुरथ, मासेमार घुबड, ढिवर आदी पक्ष्यांचा समावेश आहे. विदर्भात केवळ वाशीम मध्येच हे पक्षी येण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या तलावात पक्ष्याला लागणारे ‘अल्गी’ हे खाद्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे दरवर्षी या प्रकल्पावर हे विदेशी पाहुणे येतात. flamingos in Washim माळराण, पानपक्षी आणि जंगलपक्षी या तीनही प्रकारच्या अधिवासातील पक्ष्यांचा राबता एकबुर्जी जलाशय परिसरात असतो. दरम्यान, एकबुर्जी जलाशयात दरवर्षी विदेशी पक्षी येत असल्याने आमच्या साठी पक्षी निरीक्षणाची ही एक नामी संधी असून, जलाशयात अलीकडे झालेल्या खोलीकरणामुळे उथळ पाणी पातळीत घट झाल्याने जुनमध्ये हे पक्षी दिसल्याची माहिती अकोला येथील पक्षी अभ्यासक अमोल सावंत व वाशीम येथील वत्सगुल्म जैवविविधता संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम इंगळे यांनी दिली.