अकोला,
मान्सूनपूर्व नाले सफाई (Pre Monsoon drains) करताना नाल्यांवर केलेले अतिक्रमण अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे मान्सून तोंडावर असताना अद्यापही शहरातील नाले सफाई पूर्ण झाली नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, मनपा प्रशासनाने नाले सफाईसाठी उत्तरझोन मधील अतिक्रमण हटविले. पण मुळात अतिक्रमण उभे राहत असताना संबंधित झोन मधील अधिकारी काय करीत होते, असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे.
मान्सूनपूर्व नाले सफाईकरिता (Pre Monsoon drains) मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांच्या आदेशाने उत्तर झोन येथील गवळीपुरा ते तपे हनुमान मंदिरापर्यंतच्या नाल्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले. यात टीन शेड, आवारभिंत, ओटे यासह इतर अतिक्रमण काढण्यात आले. तर वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्या रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई सहआयुक्त विठ्ठल देवकते, प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे यांनी केली. यावेळी रामदासपेठ पोलिस स्टेशनचे कर्मचारी अतिक्रमण विरोधी पथकासोबत होते.
मनपा हद्दीतील मान्सूनपूर्व नाले सफाईचे (Pre Monsoon drains) काम सुरू आहेत. मान्सूनच्या आगमनापूर्वी नाले सफाई करण्याचे आव्हान मनपा प्रशासनासमोर आहे. नाले सफाई मोहिमेत नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणाचा अडथळा असून काहींनी कच्चे तर काहींनी पक्के अतिक्रमण केले आहे. याबाबत मनपा आयुक्तांनी इशारा देऊनही काही अतिक्रमणधारकांनी प्रतिसाद दिला नाही. पण मुळात अतिक्रमण उभे राहत असताना त्या अतिक्रमणाला कुणाचे अभय होते. अतिक्रमित जागेत पक्के बांधकाम करण्याची हिंमत अशी होते, असा प्रश्न सामान्यजनांना पडला आहे. मनपा हद्दीत पूर्व झोन अंतर्गत 86, पश्चिम झोन अंतर्गत 56, उत्तर झोन अंतर्गत 59 तर दक्षिण झोनमध्ये 71 असे एकूण 272 नाल्यांची नाले सफाई अपेक्षित आहे. मान्सून काही दिवसातच धडकणार असून मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्यास नाले सफाईचे पितळ उघडे पडण्याची शक्यता आहे.