तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली,
गुरुग्रामच्या हुडा सिटी सेंटरपासून (Cyber City Metro) सायबर सिटीपर्यंतच्या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी 5452 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 28.5 किमी लांबीच्या या मार्गावर मेट्रोची 27 स्थानक राहणार आहेत. बसई डेपोच्या माध्यमातून हा मेट्रो मार्ग पुढे द्वारका एक्स्प्रेसवेला जोडला जाणार आहे. स्टॅण्डर्ड गेजचा हा मेट्रो मार्ग पूर्णपणे एलिव्हेटेड राहणार आहे. बसई गावाजवळ हा डेपोशी जोडला जाणार आहे.
या मेट्रो मार्गाच्या निर्मिती आणि देखरेखीसाठी हरयाणा मास रॅपिड ट्रान्झिट कार्पोरेशनची स्थापना केली जाणार आहे. यात केंद्र आणि हरयाणा सरकारचा प्रत्येकी 50 टक्के हिस्सा राहणार आहे. 4 वर्षांच्या काळात ही (Cyber City Metro) मेट्रो लाईन पूर्ण होणार आहे. या मेट्रो मार्गाने जुन्या गुरुग्रामला नवीन गुरुग्रामशी जोडले जाणार आहे. पुढल्या टप्प्यात हा मेट्रोमार्ग इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडला जाणार आहे.
या मेट्रो मार्गावर (Cyber City Metro) हुडा सिटी सेंटर, सेक्टर 45, सायबर पार्क, सेक्टर 47, सुभाष चौक, सेक्टर 48, सेक्टर 72 ए, हीरो होंडा चौक, उद्योग विहार फेज 6, सेक्टर 10, सेक्टर 37, बसई गाव, सेक्टर 9, सेक्टर 7, सेक्टर 4, सेक्टर 5, अशोक विहार, सेक्टर 3, बझगेडा गाव, पालम विहार, सेक्टर 23 ए, सेक्टर 22, उद्योग विहार फेज 4, उद्योग विहार 5 आणि सायबर सिटी या स्थानकांचा समावेश राहणार आहे. गुरुग्राम हे माहिती तंत्रज्ञान आणि नवाचारचे केंद्र असून, मेट्रो मार्गाच्या विस्तारामुळे या परिसरात रोजगाराच्या आणखी संधी निर्माण होतील, अशी आशा आहे.