तभा वृत्तसेवा
अमरावती,
Majhi Vasundhara campaign : पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधीत पंचतत्वांवर आधारित माझी वसुंधरा अभियान राज्यात राबविण्यात आले होते. त्याचे निकाल घोषीत करण्यात आले असून विभागस्तरावर अमरावती मनपाने आणि वरूड नगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकविला आहे.

अमरावती महानगरपालिकेने 1 एप्रिल, 2022 ते 31 मार्च, 2023 या कालावधीत हे अभियान राबविले. माझी वसुंधरा अभियान 3.0 मध्ये अमृत गट अमरावती विभाग स्तरावर अमरावती महानगरपालिकेचा प्रथम क्रमांक आलेला आहे. मागील वर्षी सुध्दा अमरावती महानगरपालिका या गटात प्रथम क्रमांकावर होती. अमरावती महानगरपालिकेला आता 2 कोटी रुपयाचे बक्षिस जाहिर करण्यात आले आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी माझी वसुंधरा अभियान 3.0 यामध्ये महानगरपालिकेला जे यश मिळाले ते सर्व महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचा-यांच्या मेहनतीने मिळाले आहे. अमरावती महानगरपालिकेला केंद्र शासन व राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त होत आहे. त्याचा खुप अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. अमरावती शहरातील लोकप्रतिधींनी व नागरीकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्यामुळे महानगरपालिकेला यश मिळत आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व अमरावतीकर जनतेचे त्यांनी अभिनंदन केले आहे. डॉ. आष्टीकर यांच्या कार्यकाळात हा मनपाला मिळालेला चौथा मोठा पुरस्कार आहे. (Majhi Vasundhara campaign)
वरूड नगरपरिषदेचा प्रथम
वरूड पालिकेने पृथ्वी, जल, वायु, अग्नि, आकाश या घटकात केलेल्या उत्तम कार्यामुळे अमरावती विभागात प्रथम क्रमांक मिळाला आहे. या अभियानात महाराष्ट्र राज्यातील 411 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपला सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत नगर परिषदेने अमरावती विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. दीड कोटीचे बक्षीस मिळाले आहे. याबाबत नगर परिषद वरुडचे प्रशासाक तथा मुख्याधिकारी प्रवीण मानकर यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, नोडल अधिकारी रणजीत बिसेन, समन्वयक अधिकारी श्रीपाद भगत, कर व प्रशासकीय अधिकारी सागर ठाकरे, संगणक अभियंता विनय मालधुरे, आरोग्य विभाग प्रमुख बबलु नरहरे व शहरातील समस्त नागरीकांचे आभार मानले आहे. (Majhi Vasundhara campaign)
नांदगाव खंडेश्वर व जरूडला पुरस्कार
माझी वसुंधरा अभियान स्पर्धेच्या विभागस्तरावरचा नगरपंचायत गटातला पुरस्कार जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतला मिळाला आहे. तसेच ग्रामपंचायत गटातला पुरस्कार वरूड तालुक्यातल्या जरूड ग्रामपंचायतला मिळाला आहे. पुरस्कारा अंतर्गत रोख रक्कम देण्यात येणार आहे. विभागस्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणारे जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद म्हणून अमरावतीला गौरविण्यात येणार आहे. (Majhi Vasundhara campaign)