गडचिरोली,
Gond Gowari गोंड गोवारी समाज हा उपेक्षित व आदिवासींच्या रुढी-परंपरा जोपासणारा आहे. मात्र, या समाजाला आदिवासींचा दर्जा नसल्याने त्यांना विविध सोयी-सवलती व लाभांपासून वंचित राहावे लागत आहे. या समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी समाजबांधवांनी 5 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून लक्ष वेधले. ‘गोंड गोवारी’ जमातीतील अर्जदारांची संस्कृती व रुढी परंपरा ही सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेल्या निकालपत्रातील (परिच्छेद क्र. 83) मधील वर्णनानुसार असल्याचा दावा आंदोलकांनी केला. आदिवासी गोंड गोवारी संस्कृती व कल्याण मंडळाच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी गोंड गोवारी समाजातील बांधवांना अनुसूचित प्रमाणपत्र द्यावे, जात वैधता प्रमाणपत्र देऊन सर्व ते लाभ द्यावेत, अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली. संविधानिक व वैधानिक तरतुदीनुसार गोंड गोवारी जमातीचे जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यासंबंधीचे परिपत्रक सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना तत्काळ निर्गमित करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. Gond Gowari याबाबत प्रभारी जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कैलास राऊत, विनायक वाघाडे, डॉ. पूर्णा नेवारे, खुशाल राऊत व आंदोलक उपस्थित होते. मागण्यांबाबत तातडीने निर्णय न झाल्यास अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला.