एम3एमचे संचालक रूपकुमार बन्सलला अटक

09 Jun 2023 18:07:14
-बेकायदेशीर सावकारी प्रकरण
- 60 कोटींच्या आलिशान कार जप्त
 
नवी दिल्ली, 
बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने गुरुग्राम येथील एम3एमचे समूहाचे संचालक ROOP BANSAL रूपकुमार बन्सल यांना अटक केली आहे. एम3एम आणि आयआरईओमधील 400 कोटी रुपयांच्या बेकायदेशीर व्यवहारांसह अनेक प्रकरणांची ईडी चौकशी करीत आहे. याअंतर्गत नुकतेच ईडीने दोन्ही गटांच्या ठिकाणांवर छापे टाकले असता फेरारी, लॅम्बोर्गिनी, रोल्स रॉयस, मर्सिडीज-बेंझ, बेंटले आणि लॅण्ड रोव्हरसह 60 कोटी रुपयांच्या आलिशान कार जप्त करण्यात आल्या तसेच सुमारे 5.75 कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले. बन्सल यांच्यासह कंपनीच्या संचालकांनी खटला रद्द करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आम्ही कोणतेही चुकीचे काम केले नाही, असेही त्यांनी म्हटले होते.
 
 
ROOP BANSAL
 
एम3एम समूहाचे मालक, नियंत्रक आणि प्रवर्तक बसंत बन्सल, ROOP BANSAL रूपकुमार बन्सल, पंकज बन्सल आणि इतर प्रमुख व्यक्तींनी छापेमारीदरम्यान तपास टाळल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्यांनी गुंतवणूकदार आणि ग्राहकांची रक्कम वळवून आणि फसवणूक केली. या प्रकरणी ईडी गेल्या काही वर्षांपासून आयआरईओ समूहाचीही चौकशी करीत आहे, ज्यामध्ये एम 3 एम समूहाच्या माध्यमातूनही कोट्यवधींचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. यात 400 कोटींचा मोठा व्यवहार झाल्याचा संशय आहे. काळा पैसा लपवण्यासाठी शेल कंपन्यांचा वापर करण्यात आल्याचा ईडीचा आरोप आहे.
 
 
 
एम3एम आणि आरआरईओ या रिअल इस्टेट कंपन्या आहेत. त्या प्रामुख्याने दिल्ली-एनसीआर आणि उत्तर भारतात काम करतात. गेल्या वर्षी ईडीने आपल्या आरोपपत्रात आयआरईओ समूहाचे मालक ललित गोयल यांचा 1,225 कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आणि 1,050 हून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. ज्या प्रकल्पांमध्ये लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे त्यात पंजाबमधील आयआरईओ फाईव्हरिव्हर, द कॉरिडोर, आयआरईओ सिटी आणि आयआरईओ वॉटरफ्रंट यांचा समावेश आहे.
Powered By Sangraha 9.0