तभा वृत्तसेवा
पुसद,
जनता शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा संचालित वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय विद्यार्थिनी मंडळाच्या वतीने (Vasantrao Naik Jayanti) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री महानायक वसंतराव नाईक यांच्या 110 व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या नवनियुक्त प्राचार्य डॉ. वंदना वानखेडे यांनी वसंतराव नाईक यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित प्राध्यापक आणि कर्मचार्यांनीदेखील त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. वानखेडे यांनी मनोगत व्यक्त केले.
वसंतराव नाईक Vasantrao Naik Jayanti यांनी मुख्यमंत्रीपदावर असताना महाराष्ट्रातील गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी लोकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी भरभरून कार्य केले. त्यांचा राजकीय प्रवास म्हणजे हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरू शकतो. एका लहानशा खेडेगावातून राजकीय प्रवास करणारा व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर आरूढ होतो ही गोष्ट पाहिजे तितकी सोपी नाही. यासाठी त्यांनी केलेले परिश्रम, सेवा हेदेखील ध्यानात घेणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या. आज त्यांची एकशे दहावी जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे. त्यांचा आदर्श तरुणांनी डोळ्यांपुढे ठेवून मार्गक्रमण केले पाहिजे, असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन व आभारप्रदर्शन विद्यार्थिनी मंडळ समन्वयक प्रा. डॉ. स्वप्ना देशमुख यांनी केले.